सावध! ऐका पुढल्या हाका - भाग ५

कचरा व्यवस्थापनातील अजून एक महत्वाचा विषय म्हणजे प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे कचरा व्यवस्थापन. गेल्या वर्षी प्रसिद्ध झालेला हा लेख त्याबद्दल पुरेशी माहिती देतो.


कचरा व्यवस्थापनासाठी समूहपातळीवर करता येणारे प्रकल्प

कचरा व्यवस्थापन विकेंद्रित असावे आणि कचरा व्यवस्थापनासाठी उपलब्ध तंत्रज्ञान हे आपण आधी बघितलेच आहे. आता विकेंद्रीकरण कुठल्या पातळीवर करावे/करता येईल हे जरा बघू.

उपलब्ध तंत्रज्ञानाचा आढावा घेऊ:

(अ) ओल्या कचऱ्यापासून मिथेन गॅस करणे

(आ) वर्गीकृत प्लास्टिकपासून हायड्रोकार्बन करणे

(इ) अवर्गीकृत प्लास्टिकपासून विटा/ब्लॉक्स करणे

विकेंद्रित कचरा व्यवस्थापन प्रकल्प ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण असावा आणि मिळणाऱ्या ऊर्जेचा/उत्पादनाचा समूहाला/समाजाला उपयोग व्हावा ह्या मुख्य गोष्टी आहेत. अशी एक कल्पना खाली मांडत आहे. सध्या ही निर्भेळ कविकल्पना आहे.

ओला कचरा नि वर्गीकृत घरगुती प्लास्टिक कचरा संयुक्त व्यवस्थापन

ओला कचरा मिथेनेशन यंत्रात घालून त्यापासून मिथेन करणे. वर्गीकृत घरगुती प्लास्टिक दळून पायरॉलिसिस रिऍक्टरमध्ये घालून हायड्रोकार्बन करणे. प्लास्टिक दळण्यासाठी आणि पायरॉलिसिस रिऍक्टरसाठी ऊर्जा म्हणून मिथेनचे ज्वलन करणे.

गणित केले तर सुमारे आठ ते दहा किलो ओल्या कचऱ्याचे मिथेनेशन केले तर मिळणारा मिथेन प्लास्टिक दळण्यासाठी नि पायरॉलिसिस रिऍक्टरसाठी पुरेसा होईल. घरगुती प्लास्टिक कचरा दर दिवशी दर माणशी पाच ग्रॅम नि घरगुती ओला कचरा दर दिवशी दर माणशी पन्नास ग्रॅम हे आकडे गृहित धरून हे गणित केले आहे. 

यातून एका वेळेस ८०० ग्रॅम द्रव हायड्रोकार्बन तयार होईल. ते ज्वलनासाठी वापरून पायरॉलिसिस रिऍक्टरला लागणारा मिथेन वाचवता येईल. मिथेन वापरून विद्युत जनरेटर चालवणे हे तंत्र वापरासाठी उपलब्ध आहे.

सुमारे दोनशे लोक, म्हणजे सुमारे सत्तर कुटुंबे, म्हणजे चौदा फ्लॅट्सची एक इमारत धरली तर पाच इमारती. एवढ्यांचा कचरा तिथल्या तिथे जिरेल, आणि त्यासाठी लागणारी ऊर्जा बाहेरून घ्यावी लागणार नाही. किंबहुना थोड्याफार प्रमाणात विद्युत निर्मितीही होईल, जी इमारतीच्या टाकीत पाणी चढवणे वा तत्सम कामांना वापरून टाकता येईल.


कचरा व्यवस्थापनाची चतुःसूत्री

समारोप करताना, कचरा व्यवस्थापनासाठी आपण काय करू शकतो याचा आढावा घेऊ. अर्थात हे करण्यासाठी आपल्या जीवनपद्धतीत काही बदल करावे लागतील. जेवढे जमतील तेवढे बदल करून सुरुवात करू. कचरामुक्त जीवन’ सारख्या अतिरेकी घोषणांच्या फंदात न पडता एका वेळेस एक पायरी या तत्त्वाने पुढे गेलेले बरे. तसेच, प्रत्येकाने किती बदल करावे याचे संपूर्ण स्वातंत्र्य प्रत्येक व्यक्तीला आहे हेही ध्यानात ठेवलेले बरे.

नाकारा - कमी करा - दुरुस्त करा नि पुन्हा वापरा - पुनःप्रक्रिया करा, अर्थात रिफ्यूज - रिड्यूस - रिपेअर & रियूज - रिसायकल ही चतुःसूत्री लक्षात घेऊ.

(अ) नाकारा (रिफ्यूज) म्हणजे काय? तर ज्या गोष्टींपासून निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे व्यवस्थापन त्या गोष्टीपासून मिळणाऱ्या सुविधेपेक्षा जास्ती त्रासाचे आहे अशा गोष्टी टाळू शकतो का याचा विचार करा. आपल्या जीवनात अशा गोष्टी कुठल्या हे प्रत्येकाने स्वतः ठरवलेले इष्ट.

सुचवणीदाखल एक उदाहरण - टेट्रापॅक. टेट्रापॅकमुळे होणारी सोय काय? तर आतील पदार्थ (दूध, फळांचा रस आदि) बाहेरच्या वातावरणाचा परिणाम न होता तीनेक महिने चांगला राहतो. प्रश्न असा आहे की असे पदार्थ (दूध, फळांचा रस आदि) सहजी मिळत नाहीत आणि त्यामुळे साठवून ठेवावे लागतात अशा ठिकाणी आपण राहतो का? म्हणजे उत्तराखंड वा हिमाचल प्रदेश वा काश्मीरच्या दुर्गम भागात? वा एखाद्या बेटावर? वा वाळवंटात खूप दूरवर? तिथे टेट्रापॅकचा उपयोग अर्थातचआहे. पण आपण जर मुंबई, नागपूर, सातारा, कणकवली, नाशिक या अथवा अशा ठिकाणी राहत असू तर आपल्याला टेट्रापॅकमधील पदार्थांची गरज किती हा प्रश्न स्वतःच सोडवावा.

टेट्रापॅकच्या चाकण येथील कारखान्यात काम करणाऱ्या एका माणसाने दिलेली माहिती मनोरंजक आहे. तिच्या सत्यतेबद्दल मी खात्री करून घेतलेली नाही. त्या माणसाच्या म्हणण्यानुसार टेट्रापॅकचा सुमारे तीन चतुर्थांश व्यवसाय हा दूध/फळांचे रस/शीतपेये याखेरीजच्या इतर व्यवसायातून येतो. स्पष्ट सांगायचे तर दारूच्या व्यवसायातून. कसे? तर टेट्रापॅकमध्ये बंदिस्त केलेल्या पदार्थात भेसळ करता येत नाही. त्यामुळे उत्तर भारतात दारूच्या कंपन्या आपला माल टेट्रापॅकमधून विकतात.

अजून एक उदाहरण. आयात केलेल्या एक्झॉटिक अथवा दुर्मिळ फळे/भाज्या. यांनी काय घोडे मारले आहे? तर अन्नाची वाहतूक हीसुद्धा हरितगृह वायू उत्सर्जनास कारणीभूत होते. सिडनी विद्यापीठातील अरुणिमा मलिक आणि मेंग्यू ली यांचे या विषयावरचे काम आंतरजालावर मिळेल. थोडक्यात, थायलंडमधील गोड चिंचा वापरून भेळेची चटणी करण्यापेक्षा स्थानिक चिंचेत स्थानिक गूळ घातला तर बरे.

(आ) कमी करा (रिड्यूस) म्हणजे काय? ज्या गोष्टींचा वापर कमी केल्याने होणाऱ्या असुविधेपेक्षा तो वापर कमी केल्याने होणाऱ्या कचरा व्यवस्थापनाची सुकरता जर जास्ती असेल तर असा वापर कमी करण्याचा विचार करा.

सुचवणीदाखल उदाहरणे - साखरेचे घातक प्रमाण असलेली कार्बोनेटेड शीतपेये कॅन अथवा पेट बाटल्यांत मिळतात. म्हणजे पिणाऱ्याच्या आरोग्याला आणि पर्यावरणाला दोघांनाही वाईट. अशी शीतपेये पिणे बंद नाही करता आले तरी कमी करता येऊ शकेल का याचा विचार करावा. खरेतर ही गोष्ट आरोग्याला घातक असलेल्या प्रत्येक खाद्य-पेयाला लागू आहे. जेवढे अशा खाद्यपेयांचे सेवन कमी तेवढा आरोग्याला नि पर्यावरणाला फायदा.

इथे काही कंपन्या करीत असलेला एक विचित्र प्रकार नोंदवून ठेवतो. सहसा एकादी वस्तू/सुविधा जास्ती प्रमाणात घेतली तर ती स्वस्त पडते (इकॉनमी ऑफ स्केल). पण उदाहरणादाखल, ब्रू इन्स्टंट कॉफीची उलटीच खूण पाहू. ५०ग्रॅमच्या पाकिटाची किंमत ८० रुपये नि १०० ग्रॅमच्या पाकिटाची किंमत १८० रुपये.म्हणजे ५० ग्रॅमची दोन पाकिटे घेतल्यास चोख वीस रुपये वाचले नि कचरा वाढला.

(इ) दुरुस्त करा आणि पुन्हा वापरा (रिपेअर & रियूज) म्हणजे काय? तर ज्या गोष्टी पुनःपुन्हा वापरल्याने आरोग्याला बिलकूल अपाय होणार नाही त्या गोष्टी अदरेखून पुनःपुन्हा वापरणे.

याचे उत्तम उदाहरण म्हणजे पेट प्लास्टिकच्या बाटल्या. या तर दुरुस्तही कराव्या लागत नाहीत. एकदा विकत घेतलेली बाटली पुनःपुन्हा वापरली तर आरोग्याला काहीही धोका पोहोचत नाही. व्हॉट्सऍप विद्यापीठातील तशा बातम्या अग्रेषित करण्याआधी एक विचार करावा - जे प्लास्टिक कंपनीत पाणी भरताना आणि ते पाणी आपण पिताना विषारी नसते ते प्लास्टिक घरचे पाणी बाटलीत भरल्यावर विष सोडायला लागेल? धोका असतो तो बाटलीबंद पाणी विकणाऱ्या कंपन्यांच्या आर्थिक हितसंबंधांना. आपण तहान लागल्यावर पाणी प्यावे. बाटलीबंद पाण्याच्या कंपन्या चालाव्यात म्हणून नव्हे.

अशा पेटच्या बाटल्या किती काळ वापरता येतात? किमान वर्षभर. काही काळानंतर पाण्याच्या दर्जाप्रमाणे त्यावर साका जमून त्या थोड्या अपारदर्शक दिसू शकतात. त्यासाठी मूठभर जाड वाळू रिकाम्या बाटलीत घालावी, सुमारे पाव लिटर पाणी घालावे आणि झाकण घट्ट लावून ती बाटली पाच-सहा मिनिटे खूप जोराने खालीवर हलवावी. हातांना व्यायाम होईल इतक्या जोराने. घर्षणाने बराचसा साका निघून जाईल. गरज भासल्यास वेळ वाढवावी. नंतर वाळू-पाणी मिश्रण काढून घेऊन साध्या साबणाचे कपभर द्रावण घालून हाच व्यायाम पुन्हा करावा. म्हणजे वाळूत काही सूक्ष्म जीवजंतू असतील तर तो प्रश्न सुटेल. मग साध्या पाण्याने दोनतीनदा विसळून घ्यावी - साबणाचा वास जाईस्तोवर. बाटली पुन्हा वापरास तयार.

सध्या अनेक बाटलीबंद पाण्याच्या कंपन्या बाटल्यांचे प्लास्टिक इतके पातळ ठेवतात की पाणी पिऊन रिकामी झाल्यावर ती बाटली हाताने कुस्करता/चुरगळता येते. अशा बाटल्या पाणी पिण्यासाठी पुनःपुन्हा वापरावर अर्थातच मर्यादा येतात. काही टोकदार वस्तू लागल्यास भोक पडू शकते.

अशा बाटल्या बागकामाची आवड असणाऱ्यांसाठी उपयोगी पडतात. एक लिटरची बाटली गळ्यापासून दोनेक इंचावर कापली तर दंडगोल मिळतो. त्याला खालच्या बाजूला भोक पाडावे, जमिनीत पाच-सहा इंच बाटलीच्या व्यासाचा खड्डा खणून त्यात ही बाटली खुपसावी. भोकाच्या आकारानुसार या बाटलीत भरलेले पाणी जमिनीत झिरपत राहील. घरगुती ठिबक सिंचन.

दुसरे उदाहरण म्हणजे वापरलेल्या ब्रेडच्या पिशव्या नि दुधाच्या पिशव्या. ब्रेडच्या पिशव्यांत (पिशव्यांना थोडी भोके पाडून) लांबट/मोठ्या भाज्या - मुळा, गाजर, शेवगा, बीट, कोथिंबीर, पालक, मेथी, कढीलिंब आदि - सुलभतेने फ्रीजमध्ये ठेवता येतात. दुधाच्या वापरलेल्या पिशव्यांत आले, लिंबे, मिरच्या फ्रीजमध्ये सुलभतेने ठेवता येतात. अर्थात एक ब्रेडची पिशवी नि एक दुधाची पिशवी सहज काही महिने टिकते त्यामुळे सगळ्या पिशव्यांचा वापर होत नाही.पण जमेल तेवढे करावे हे बरे. पावसाळ्यासाठी ब्रेडच्या पिशव्यांचा अजून एक वैयक्तिक उपयोग - बाहेर पडताना पैशाचे पाकीट, सेलफोन आदि अशा पिशवीत ठेवून मग सॅक/पर्समध्ये ठेवले तर पावसापासून अजून संरक्षण.

अजून एक उदाहरण म्हणजे बाहेरून खाद्यपदार्थ मागवल्यावर ते ज्या प्लास्टिक झाकणबंद डब्यांत येतात ते पांढऱ्या/काळ्या रंगाचे डबे. तसेच मिठाईच्या दुकानांतून मिळणारे डबे. स्वच्छ धुऊन घेतले की हे डबे डाळी, कडधान्ये, शेंगदाणे आदि पदार्थ ठेवायला उत्तम. इथेही एक डबा काही महिने टिकतो, म्हणजे सगळे डबे वापरणे अवघड आहे. पण परत जमेल तेवढे हा मंत्रजपावा.

अशा पुनर्वापराच्या वस्तू आपण विचारकरून आपणच वापरात आणाव्यात.

(ई) पुनःप्रक्रिया (रिसायकल) म्हणजेकाय? तर प्लास्टिकचे द्रवरूप हायड्रोकार्बन वा प्लास्टिकचे ब्लॉक्स करणे अशा तंत्रांचा वापर जर कुठे केला जात असेल तर अशा यंत्रणांना वर्गीकृत कचरा द्यावा. खरे तर अशा यंत्रणा समूह पातळीवर उभारण्यासाठी जनजागृती केली जात नाही हे मुख्य दुखणे आहे. कारण अशा यंत्रणा म्हणजे (आढ्यताखोर सुरात म्हणायचे तर) रॉकेट सायन्स नव्हेत.



ही लेखमाला लिहिण्यामागची कारणे आणी पार्श्वभूमी:

सुमारे आठ वर्षांपूर्वी मी कचरा व्यवस्थापनातील तंत्रांचे संशोधन करणाऱ्या एका प्रकल्पात अर्धवेळ सहभागी झालो. पाच वर्षांपूर्वी पूर्णवेळ सहभागी झालो. आम्ही ओला कचरा, सर्वप्रकारच्या प्लॅस्टिकचा कचरा, प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा कचरा, औद्योगिक रबर कचरा, मानवी केस आणि पक्ष्यांची पिसे यांचा कचरा, बागकामातील झाडोऱ्याचा कचरा, स्वयंपाकासाठी वापरून टाकून दिलेले वाशेळे तेल यावर काम केले. तसेच काही घातक रसायनांचा उपयोग करण्याला (उदाहरणार्थ बांबू 'क्युअर' करण्याची पद्धत) पर्याय शोधले. 

हे सर्व आम्ही स्वतःच्या खिशात हात घालून करीत होतो. गेल्या वर्षी खिसा रिकामा झाल्यावर थांबलो. आर्थिक मदतीसाठी सरकार, सेवाभावी संस्था यांच्याकडे सहा वर्षे वेगवेगळ्या पद्धतीने सादरीकरण करून पाहिले. गेल्या वर्षी थांबलो. त्या काळातले अनुभव म्हटले तर क्लेशकारक आणि म्हटले तर मनोरंजक आहेत.

गेल्या वर्षी मी निवृत्त झालो. माझा सहकारी काही खाजगी उद्योगप्रकल्पांना सल्ला देण्याचे काम करतो.

या क्षेत्रातील निवृत्तीतून चार दिवस बाहेर येऊन हे लिखाण केले. आता परत निवृत्तावस्थेत जातो.

रामराम (धर्मनिरपेक्ष मंडळींनी योग्य ते भाषांतर करून घ्यावे).