सावध! ऐका पुढल्या हाका
प्लास्टिकचा कचरा
प्लास्टिकच्या कचऱ्याकडे पाहण्याआधी ग्राहकोपयोगी प्लास्टिकचे (कमॉडिटी/कन्झ्यूमर प्लास्टिकचे) प्रकार किती ते पाहू.
असे उलगडून लिहिण्याचे कारण याखेरीज इंजिनिअरिंग प्लास्टिकचे ८ नि हाय परफॉर्मन्स प्लास्टिकचे ९ प्रकार आहेत. रासायनिक गुणधर्मांप्रमाणे प्रकार पाहिले तर अजून नवीन शब्द समोर येतात. आपण आपल्यापुरते पाहू.
कुठल्याही प्लास्टिकच्या वस्तूवर तीन वक्रबाणांनी दर्शवलेल्या एका त्रिकोनात एक क्रमांक असतो. असतो म्हणजे, असायला हवा.
खरे तर प्लास्टिक, कागद, धातू, सेंद्रीय पदार्थ, काच, संमिश्र पदार्थ अशा प्रत्येक वस्तूवर असा क्रमांक असायला हवा.
हा क्रमांक सेग्रिगेशन कोड (वर्गीकरण क्रमांक) असतो. एका विशिष्ट क्रमांकाच्या वस्तूंचा कचरा एकत्र केला तर त्या कचऱ्याचे व्यवस्थापन करणे सोपे जाते हा उद्देश.
तर क्रमांक १ ते ७ हे आपल्या नेहमीच्या वापरातल्या प्लास्टिकसाठी आहेत.
१: पीईटी (पेट - पॉलि एथिलीन टेराप्थलेट) - पारदर्शक पाण्याच्या बाटल्या [बिस्लरी/किन्ले वा तत्सम], स्ट्रॉबेरी पॅक केलेले पारदर्शक ट्रे, इ
२: एचडीपीई (हाय डेन्सिटी पॉली एथिलीन) - लिक्विड सोपच्या बाटल्या, खुर्च्या, इ
३: पीव्हीसी (पॉली व्हिनाईल क्लोराईड) - प्लंबिंग आणि इलेक्ट्रिकल कॉन्ड्यूट पाईप्स, खेळणी, इ
४: एलडीपीई (लो डेन्सिटी पॉली एथिलीन) [एलएलडीपीई - लिनिअर लो डेन्सिटी पॉली इथिलीन हेही यातच] - दुधाच्या पिशव्या, ब्रेडच्या पिशव्या, कचरा टाकायच्या पिशव्या इ
५: पीपी (पॉली प्रॉपिलीन) - पेटच्या पाण्याच्या बाटल्यांची झाकणे, औषधांच्या बाटल्या, गरम अन्नपदार्थ ठेवण्याचे डबे, मिठाईच्या दुकानातील लाडू-बर्फी आदि प्री-पॅक्ड मिठाईचे डबे इ
६: पीएस (पॉली स्टायरीन) - याचा इन्फ्लेटेड पॉली स्टायरीन हा प्रकार आपल्याला नीट माहीत आहे. त्याला आपण थर्मोकोल या नावाने ओळखतो. नॉन-इन्फ्लेटेड पॉली स्टायरीन म्हणजे चहा/कॉफी चे कप, आईस्क्रीम खाण्याचे चमचे इ
७: अदर्स - वरीलपैकी काही एकत्र, वा वरीलपैकी एकही नाही वा अजून वेगळे (उदा पॉलीयुरेथीन फोम, पॉलिकार्बोनेट,ऍक्रिलिक, एबोनाईट) असे काही. सगळ्यात कटकटीची श्रेणी.
याची सविस्तर माहिती इथे मिळेल.
वरती ‘कुठल्याही प्लास्टिकच्या वस्तूवर तीन वक्रबाणांनी दर्शवलेल्या एका त्रिकोनात एक क्रमांक असतो. असतो म्हणजे, असायला हवा’ असे लिहिले त्याचे कारण अनेकदा असे क्रमांक देण्याचे कष्ट घेतले जात नाहीत. आणि हे कष्ट न घेणाऱ्या कंपन्या चांगल्या भल्याथोरल्या असतात. आपल्या आसपास निरखून पाहिले तर अनेक उदाहरणे सापडतील.
काही कंपन्या नुसतेच तीन बाणांचे चिन्ह छापून मोकळ्या होतात, काय अर्थ लावायचा तो लावा.
एका नामवंत कंपनीचे उदाहरण मनोरंजक आहे. त्यांच्या उत्पादनाच्या पाकिटावर असा क्रमांक नव्हता. मी पाकिटावर दिलेल्या ईमेल पत्त्यावर तक्रार केली. त्यांनी माझ्या खरेदीचे तपशील मागितले. मी दिले. त्यांनी मी खरेदी केलेल्या पाकिटाचा फोटो मागितला. मी दिला. मग दोन आठवडे शांतता पसरल्यावर स्मरणपत्र पाठवले. तर कंपनीकडून "असा क्रमांक छापणे कायदेशीररीत्या बंधनकारक नाही असे उत्तर आले. काही कायदेशीर कारवाई करता येईल का अशी चौकशी करण्यासाठी मी माझ्या वकीलमित्राला भेटलो. त्याचा व्यावहारिक सल्ला त्याच्याच शब्दांत असा, "कंपनीकडे प्रथितयश वकील मंडळींची फौज तयार आहे. तू किती वेळ नि पैसा खर्च करायला तयार आहेस? मित्र म्हणून सल्ला असा की तेवढा पैसा मला देऊन टाक नि विसरून जा. नाहीतरी कोर्टात तेवढा पैसा खर्च होईलच, शिवाय चकरा मारत बसावे लागेल. त्या चकरा टळतील. आणी पैसा मिळाल्याबद्दल मी आशिर्वाद देईन".
मला आशिर्वाद नको होते. गप्प बसलो.
थोडे प्लास्टिक-बंदीबद्दल परत. ही बंदी मनाच्या समाधानासाठी ठीक आहे, पण प्रत्यक्षात काय परिस्थिती आहे?
कुठल्याही ग्राहकोपयोगी यांत्रिक वस्तू (टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन इ) वा काचेच्या वस्तू पॅकिंग करण्यासाठी थर्मोकोल इतके परिणामकारक, कार्यक्षम नि परवडणारे पॅकिंग मटेरिअल दुसरे नाही. त्यामुळे त्यावर बंदी आणणे शक्य नाही. मग घरगुती सजावटीच्या थर्मोकोलवर बंदी आणून ‘पर्यावरण रक्षण’ करणे हा खेळ खेळला जातो.
कुठल्याही बंदीबाबत होते तसे समांतर अर्थव्यवस्था निर्माण करण्याव्यतिरिक्त या बंदीचा काहीही उपयोग नाही.
एकंदरीतच, प्लास्टिकचे सहजी विघटन होत नाही हा त्याचा गुण आहे. आणि प्लास्टिक कचऱ्याचे व्यवस्थापन करता येत नाही हा आपला अवगुण. प्लास्टिकबंदी म्हणजे गणितात कच्च्या असलेल्या विद्यार्थ्याने गणित शिकण्याऐवजी गणित विषयच अभ्यासक्रमातून काढून टाकावा तसे आहे.
आणि गणित अभ्यासक्रमातून काढून टाकले तरी आयुष्यातून काढून टाकता येत नाही तसे प्लास्टिकही पूर्णतया आयुष्यातून काढून टाकता येणार नाही.
वाहने, सेलफोन, क्रेडिट कार्ड्स, फ्रिज, टीव्ही, वॉशिंग मशीन, चष्मे, बूट-चपला.... कशात प्लास्टिक नाही हेच शोधावे लागेल. मग पिशव्यांसारख्या फुटकळ वस्तूंवर बंदी आणून स्वतःची समजूत घालून घेण्याची शहामृगी मानसिकता बोकाळते.
असो.
प्लास्टिकचे प्रकार काय ते समजूनघेतल्यावर आता त्याच्या कचऱ्याच्या व्यवस्थापनाकडे वळू.
ही पहिल्या सहा प्रकारची प्लास्टिक जर वेगवेगळी केली तर पीईटी वितळवून परत पीईटी, एचडीपीई वितळवून परत एचडीपीई असे ‘रिसायकल’ करता येते का?
हो.
फक्त इथे दोन गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात.
पहिले म्हणजे पीईटी या एका शीर्षकाखाली मिळणारे प्लास्टिक वेगवेगळ्या दर्जाचे असते. उदाहरणार्थ, पाण्याच्या बाटल्या नि पॉलिएस्टरचे कापड हे दोन्हीही पीईटीच आहे, पण वेगवेगळ्या दर्जाचे. एका विशिष्ट दर्जाचेच पीईटी एकत्र करून रिसायकल केले तर इष्ट. जितक्या वेगवेगळ्या दर्जांचे पीईटी एकत्र करू तितकी रिसायकल केलेल्या पीईटीची रेण्विक ताकद (मॉलेक्यूलर स्ट्रेन्ग्थ) कमी होत जाते. हे सर्व सहा प्रकारच्या प्लास्टिकना लागूआहे.
दुसरे म्हणजे अगदी एकाच दर्जाचे प्लास्टिक - फक्त ‘गोकुळ’ गायीच्या दुधाच्या अर्ध्या लिटरच्या पिशव्या - घेऊन रिसायकल केले तरी त्यातली रेण्विक ताकद काही प्रमाणात कमी होतेच. त्यामुळे सेकंड रिसायकलच्या वस्तूंचा दर्जा शुद्ध वस्तूंच्या दर्जापेक्षा कमी असतोच. तो किती कमी असतो हे मूळ वस्तूचा दर्जा आणि रिसायकल पद्धत यावर अवलंबून असते.
थोडक्यात, प्लास्टिकच्या कचऱ्याचे पूर्ण वर्गीकरण केले तर रिसायकल करणे शक्य आहे. अर्थात त्यावरही मर्यादा असल्याने तिसऱ्या-चौथ्या रिसायकलनंतर जेव्हा ती वस्तू रिसायकल करणे शक्य होणार नाही तेव्हा काय करायचे हा विचार करावाच लागेल.
शहरी जीवनात प्लास्टिकचा कचरा किती प्रमाणात होतो? किती शहरीकरण वा ‘प्रगती’ झाली आहे त्यानुसार. पण कमीतकमी प्रत्येक माणसामागे प्रत्येक दिवशी पाच ग्रॅम प्लास्टिकचा कचरा तयार होतो. पर्यटनक्षेत्रात हे प्रमाण पार वीस ते पन्नास ग्रॅमच्या वर जाऊन पोहोचते.
तर या प्लास्टिक कचऱ्याचे काय करायचे?
‘प्लास्टिकचे रस्ते’ करण्याचापतंग काही जण हिरीरीने उडवतात त्याकडे जरा पाहू.
संपूर्णतया प्लास्टिकचे रस्ते करणे शक्य नाही. त्या गुळगुळीत रस्त्यांवर चाक वा पाय ठरणारच नाहीत. मग प्लास्टिक कशात तरी मिसळूनच रस्ते करावे लागतील. कशात तरी म्हणजे काँक्रीटमध्ये वा डांबरामध्ये. काँक्रीटमध्ये प्लास्टिक एकजीव होणार नाही त्यामुळे डांबर हाच पर्याय उरला.
मग डांबरी रस्त्यांत प्लास्टिक कचरा विरवून टाकायचा असल्यास डांबर-प्लास्टिक गुणोत्तर काय असावे? आंतरजालावर शोधले की मनोरंजन होते.
इथे आणि इथे दिलेल्या गणिताप्रमाणे दहा मीटर रुंदीच्या दहा सेंमी खोलीच्या एक किमी रस्त्यासाठी सुमारे २३०० ते २५०० टन मिश्रण लागते, ज्यात ५% डांबर असते. सोयीसाठी २४०० टन हा आकडा घेऊ. त्याचे ५% म्हणजे १२० टन.
इथली माहिती गणिताला निरर्थक ठरवणारी आहे. एक किलोमीटर रस्त्यात प्लास्टिक वापरले तर १ टन डांबर वाचते असे पेटंट घेतलेल्या तज्ञांचे म्हणणे. १२० पैकी एक म्हणजे सुमारे ०.८३%. पण लेखात ठोकले आहे की किंमत ८%नी वाचते. दशांशबिंदू इकडून तिकडे केल्याने फरक पडत नाही असे नवीन अंकगणित सांगते की काय माहीत नाही.
तेही ठीक. कदाचित '१ टन डांबर वाचते’ हीमुद्रणचूक असेल.
पण यावर खूष न राहता पुढच्याच परिच्छेदात रस्ते बांधकामाची किंमत ५०%नी कमी होते असे दिले आहे. आणि हे ‘गार्डियन’सारख्या वृत्तपत्रात दिलेले.
आनंद आहे.
दहा टक्के प्लास्टिक नि नव्वद टक्के डांबर असे धरून पुढे गेलो तरी दोन मुद्दे विचारात घ्यावे लागतील.
पहिला मुद्दा की प्लास्टिकचा कचरा पूर्ण वर्गीकरण केलेला नसेल, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे प्लास्टिक त्यात घुसडलेले असेल तर रस्त्याचा दर्जा एकजीव न झालेल्या प्लास्टिकने खालावणार. उपमुद्दा असा की प्लास्टिक हे पूर्णतया जलावरोधक आहे. डांबर खडी मिश्रण तसे नाही. त्यामुळे डांबर-खडी रस्त्यावरचे पाणी अगदी हळू का होईना, खाली झिरपते. प्लास्टिकमधून ते अजिबात झिरपत नाही. काँक्रीटमधून अजिबात झिरपत नाही तसे. म्हणजे रस्त्यावर पाणी साचण्याचा धोका. हा धोका आता मुंबई-पुणे-नागपूर इथल्या मंडळींना तरी नव्याने सांगण्याची गरज नाही.
दुसरा मुद्दा - दहा टक्के प्लास्टिक वापरले तर किती प्लास्टिक कचरा रिचेल? पुण्यात दिवसाला सुमारे २००० टन कचरा निर्माण होतो आणि त्यात ८ ते १५% दरम्यान प्लास्टिक कचरा असतो. म्हणजे सुमारे १६० टन. यात नऊपट म्हणजे १४४० टन डांबर घालावे लागणार. एकूण १६०० टन डांबर-प्लास्टिक. हे ५% आणि उरलेली खडी. म्हणजे ३२,००० टन मिश्रण. २४०० टन मिश्रण १ किमी रस्त्यासाठी, तर ३२,००० टन म्हणजे १३ किलोमीटरहून जास्ती रस्ते बांधावे लागतील. रोज. वर्षाला ४,७४५ किमी. तर प्लास्टिकच्या कचऱ्याचा प्रश्न सुटेल.
तुलनेसाठी आकडा- संपूर्ण पुणे जिल्ह्यातल्या रस्त्यांची लांबी आहे १३,६४२ किमी. म्हणजे फक्त पुण्यातल्या प्लास्टिक कचऱ्याचा वापर करून अख्ख्या जिल्ह्यातील रस्त्यांची लांबी तीन वर्षांत दुप्पट करावी लागेल. लांबीचा आकडा २००१ सालचा, अर्थातच अद्ययावत आहे असे सरकारी मत दिसते. नशीब १९४७ सालचा आकडा दिला नाही.
आणि हे फक्त पुणे शहरासाठी. आंबेगाव, बारामती, भोर, दौंड, हवेली, इंदापूर, जुन्नर, खेड, मावळ, मुळशी, पुरंदर, शिरूर आणि वेल्हे या सर्व तालुक्यांत त्यांचा स्वतःचा प्लास्टिक कचरा आहे. त्याचे काय करायचे?
थोडक्यात, प्लास्टिकच्या रस्त्यांच्या स्वप्नांत मश्गूल राहू इच्छिणाऱ्यांना सोडून पुढे जाऊ.
प्लास्टिक रिसायकलिंगबद्दल आधी लिहिलेच आहे. मग आता काय करायचे?
यातील #२, #४ नि #५ या प्रकारांचे प्लास्टिक (एचडीपीई, एलडीपीई, पीपी) हे ‘पॉलिओलेफिन्स’ या प्रकारात मोडते. या प्रकाराचे रासायनिक सूत्र आहे (CnH2n+2). या साखळीत कार्बन अणूंची संख्या दहा लाखांवर असते. ती साखळी मोडून कार्बन अणूंची संख्या ८ ते ३५ या दरम्यान आणली तर जे द्रवपदार्थ तयार होतात ते आपणा सर्वांना माहीत आहेत - पेट्रोल, रॉकेल नि डिझेल.
आता ही भलीमोठी साखळी कशी तोडायची? तर थर्मल पायरॉलिसीस, म्हणजे उष्णता देऊन.
ही उष्णता किती द्यावी लागते? पायरॉलिसिसच्या प्रकाराप्रमाणे २५० ते ११५० सेंटिग्रेड पर्यंत.
या छोट्या साखळ्यांनी तयार झालेल्या पदार्थाला तांत्रिक नांव हायड्रोकार्बन.
कॅटॅलिटिक पायरॉलिसिस (मिळणाऱ्या हायड्रोकार्बनची प्रत आणि प्रमाण वाढण्यासाठी कॅटॅलिस्ट वापरणे) करताना ३५० ते ४०० सेंटिग्रेड असा आमचा अनुभव आहे.
आधी पायरॉलिसिस रिऍक्टरची संपूर्ण यंत्रणा कशी असते ते पाहू.
प्लास्टिकची घनता कमी असतेच, पण जेव्हा त्याच्या पिशव्या वा इतर वस्तू होतात तेव्हा ती घनता फारच कमी होते. रिकाम्या दुधाच्या वा तत्सम पिशव्यांनी भरलेल्या पोत्याचे वजन दोन किलोही भरत नाही. त्यामुळे रिऍक्टरमध्ये पिशव्या वा इतर कचरा आहे तसा टाकला तर तीस लिटर क्षमतेच्या रिऍक्टरमध्ये दीडदोन किलोही कचरा मावणार नाही. त्यामुळे प्लास्टिकचा कचरा दळून घेणे इष्ट ठरते. हे प्लास्टिक वितळवून त्याच्या गोळ्या (पेलेट्स) केल्या तर अधिक उत्तम पण तेवढी ऊर्जाही जास्ती लागणार.
हे दळलेले/गोळीबंद प्लास्टिक हीटिंग चेंबरमध्ये भरून सर्व बाजूंनी सील करून (उष्णता वाया जाऊ नये म्हणून) ते तापवायचे. प्रक्रिया एकसमान व्हावी म्हणून हीटिंग चेंबरमध्ये घुसळायची वा ढवळायची काही सोय असल्यास अधिक चांगले. कार्बन अणूंची अजस्त्र साखळी तुटायला लागल्यावर हायड्रोकार्बन वायूरुपात बाहेर पडू लागतो. वॉटर कूल्ड कंडेन्सर वापरून तो वायू परत द्रवरूपात आणला जातो ते म्हणजे लिक्विड हायड्रोकार्बन (रॉकेल, डिझेल, पेट्रोल इ).
ही उष्णता कशी द्यायची? विद्युतशक्ती वापरून तापमान वाढवणे उचित नाही. आपली साधारण दोन तृतियांश विद्युतशक्ती औष्णिक वीजकेंद्रांतून येते. औष्णिक वीजकेंद्रांत काय होते? कोळसा जाळून पाणी तापवले जाते. त्या पाण्याच्या वाफेवर टर्बाईन चालवून त्यातून वीज निर्माण केली जाते. म्हणजे औष्णिक-गतिज-विद्युत ऊर्जा. ऊर्जा एका रूपातून दुसऱ्या रूपात जाताना काही ऊर्जा (साधारण १०%) वाया जाते. हा आकडा अतिउच्च कार्यक्षमतेच्या यंत्रांबद्दल आहे हे लक्षात घ्यावे. बरेचसे अभियंते एवढी कार्यक्षम यंत्रणा अस्तित्वात असणे शक्य नाही असे ठामपणे म्हणतील.
म्हणजे, औष्णिक १००% ते गतिज ९०% आणि गतिज ९०% ते विद्युत ८१%. ‘मराविमं’च्या दाव्यानुसार विद्युत वहनातील गळती साधारण १५% धरू.
म्हणजे विद्युत निर्मिती ८१% ते घरपोच विद्युत ६९%. आणि विद्युत ६९% ते औष्णिक ६२%.
म्हणजे इलेक्ट्रिकल हीटर्स हे मूळ उर्जेच्या दोन तृतियांशपेक्षा कमी ऊर्जा आपल्याला पुरवतात.
मग ही उष्णता कशी द्यायची? सर्वात स्वस्त इंधन म्हणजे लाकूड. पण लाकडाच्या ज्वलनातून निर्माण होणारी उष्णता नियंत्रित करणे अशक्य नसली तरी अवघड आहे.
उष्णता नियंत्रित का करायची? तर ४०० डिग्री सेंटिग्रेडच्या वर तपमान गेले की अणूंची साखळी जास्ती पटापट तुटून वायूरूप हायड्रोकार्बनचे प्रमाण वाढते. हा वायू ज्वलनशील आहे, पण साठवायचे म्हटले तर खर्च आणि कायद्याची बंधने या दोन्ही गोष्टी जाचक आहेत. तसेच, साखळी तुटून जे द्रवरूप हायड्रोकार्बन तयार होते ते जास्ती उष्णता दिली की जळते नि त्याचा कार्बन तयार होतो. परिणामी, मिळणाऱ्या हायड्रोकार्बनमध्ये काजळी येते.
अशा हायड्रोकार्बनला आरडीएफ (रिफ्यूजडिराईव्हड फ्युएल) म्हणतात आणि ते सध्या किलोमागे चाळीस रुपयांच्या आसपास विकले जाते. ज्या कारखान्यांना मोठ्या प्रमाणावर ऊर्जा लागते पण ऊर्जा नियंत्रितही असावी लागते असे कारखाने बर्नर्स वापरून हे आरडीएफ जाळतात.
हायड्रोकार्बन जाळूनच जर पायरॉलिसिसची ऊर्जा मिळवली तर? हे शक्य आहे, पण मग दुसरा मुद्दा विचारात घ्यावा लागतो. हायड्रोकार्बन जाळल्यावर धूर आणि फ्लू गॅसेस बाहेर पडतात. फ्लू गॅसेस म्हणजे नायट्रोजन, कार्बन डायॉक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, काजळी यांचे मिश्रण. इंधन कुठले जाळले जात आहे त्यावर यात सल्फर ऑक्साईड नि नायट्रोजन ऑक्साईडही आहे की नाही हे ठरते. तर हे धूर-फ्लू गॅस हवेत तसेच सोडणे आरोग्याला घातक आहे. त्यामुळे त्याला स्क्रबर नामक एक यंत्र जोडून तो धूर-फ्लू गॅस पुरेसा शुद्ध करून घ्यावा लागतो.
हे हायड्रोकार्बन किती मिळते? तर लाकूड जाळून अनिर्बंध प्रमाणात उष्णता पुरवली तर सुमारे ३५ टक्के. म्हणजे एक किलो प्लास्टिकमधून ३५० ग्रॅम. नियंत्रित प्रमाणात उष्णता पुरवली तर हे प्रमाण ५० ते ५५ टक्क्यांपर्यंत जाऊ शकते. इथे पायरॉलिसिस रिऍक्टरची रचना, त्यातून वायूगळती होते का आणि असल्यास किती, आदि मुद्दे येतात. कॅटॅलिटिक पायरॉलिसिसमध्ये हायड्रोकार्बनचे प्रमाण ६५ ते ८० टक्क्यांपर्यंत गेलेले आम्ही अनुभवले आहे.
पूर्ण कार्यक्षम रिऍक्टर असेल तर ९०ते ९२ टक्के द्रव हायड्रोकार्बन आणि ८ ते १० टक्के घन कार्बन असे यायला हवे.
आता हे झाले प्लास्टिक क्रमांक २, ४ नि ५ (एचडीपीई, एलडीपीई आणि पीपी) यांच्याबाबत. उरलेल्या प्रकारांचे काय? तेही या रिऍक्टरमध्ये घातले तर चालते का?
नाही.
पीईटी - प्लास्टिक क्र १ - जर पायरॉलिसिस रिऍक्टरमध्ये घातले तर ऍसिटाल्डिहाईड नामक द्रवपदार्थ बाहेर पडतो जो कॅन्सरकारक असतो. म्हणजे रिऍक्टरपाशी काम करणारा आणि नंतर द्रवरूप हायड्रोकार्बन वापरणारा दोघांनाही धोका.
पीव्हीसी - प्लास्टिक क्र ३ - जर पायरॉलिसिस रिऍक्टरमध्ये घातले तर थेट एचसीएल (हायड्रोक्लोरिक ऍसिड) च्या वाफा येतात. या वाफा श्वासावाटे फुप्फुसात गेल्या तर काही सेकंदांतच डोकेदुखी, मळमळणे नि चक्कर येणे सुरू होते. काही मिनिटे गेली तर बेशुद्धी आणि मृत्यू.
एका प्रयोगात कचऱ्यात प्लास्टिसाईज्ड पीव्हीसी होते आणि ते रिऍक्टरमध्ये भरले गेले. पायरॉलिसिस सुरू झाला नि सुमारे तीन मिनिटांत हा डोकेदुखी-मळमळणे-चक्कर अनुभव मी नीट घेतला आहे. नाकाला रुमाल लावून रिऍक्टर बंद करून लॅबमधून तत्परतेने बाहेर पडलो म्हणून टिकलो.
पीएस - प्लास्टिक क्र. ६ - जर पायरॉलिसिस रिऍक्टरमध्ये घातले तर घातक धूर सोडणारे द्रवपदार्थ (ऍरोमॅटिककंपाऊंड्स) निर्माण होतात. शिवाय स्टायरिन निर्माण होते, जे श्वसनाला घातक आहे -एचसीएल इतके नसले तरी.
इथे एक अनुभव नोंदवून ठेवतो. हे असे पायरॉलिसिससाठी घातक प्लास्टिक वापरून निर्विकारपणे चालवले जाणारे पायरॉलिसिस रिऍक्टर पुणे परिसरात डझनांनी आहेत. तिथे काम करणाऱ्यांचा नाईलाज नि यंत्रमालकांची निर्लज्ज हाव यांचा संयोग. अर्थात ते पोल्यूशन कंट्रोल बोर्डाला दिसत नाही.
एकूणच, भारतात कचरा व्यवस्थापन हे एक काळ्या-पांढऱ्याच्या सीमारेषेवर खेळणारे करडे मार्केट आहे. रुपयांत मोजल्यास न मिळणारा आरओआय (रिटर्न्स ऑन इन्व्हेस्ट्मेंट) हे एक महत्वाचे कारण. तसेच कचऱ्याच्या बदलत्या स्वरूपामुळे त्यातून मिळणाऱ्या उत्पादनाच्या (इथे हायड्रोकार्बनच्या) दर्जाबद्दल अजिबात खात्री नसणे हे दुसरे कारण. आणि सर्वात महत्वाचे कारण म्हणजे सरकार दरबारी आणि शैक्षणिक संस्थांमध्ये या विषयाबद्दल असलेली पराकोटीची अनास्था.
असो.
मग या तीन प्रकारच्या प्लास्टिकचे काय करायचे?
यावर आम्ही करून पाहिलेला एक उपाय म्हणजे हे प्लास्टिक १८० ते २०० डिग्री सेंटिग्रेड पर्यंत तापवायचे म्हणजे ते वितळते. मग त्यात घनता आणि ताकद वाढवण्यासाठी राख, माती असे पदार्थ घालून साच्यात ओतायचे नि विटा/ब्लॉक्स करायचे. प्लास्टिकचे असल्यामुळे ते जलरोधक असतातच. त्यात पीव्हीसी जर दळून घातले तर ते आग प्रतिरोधकही होतात. साचा बदलला तर अशा ब्लॉक्सचे खांबही करता येतात नि पत्रेही.
तसेच, अजून एक प्रकारचे प्लास्टिक - रफिया बॅग्ज. म्हणजे सिमेंटची, खताची, साखरेची पोती. पूर्वी असणारे गोणपाट आता हद्दपार झालेले आहेत नि त्या जागी प्लास्टिकची पण जरा वेगळी वाटणारी पोती आलीआहेत. जरा वेगळी म्हणजे काय, तर या पोत्यांसाठीच्या प्लास्टिकमध्ये मोठ्या प्रमाणात फिलर मटेरिअल ऊर्फ भरताड घातलेली असते. बहुतांशी ही भरताड म्हणजे बांधकामाचा चुना (कॅल्शियम कार्बोनेट) असतो. सुमारे शंभर रुपये किलो व्हर्जिन प्लास्टिक ग्रॅन्यूल्सची किंमत आणि सुमारे पाच रुपये किलो चुन्याची किंमत पाहिली की भरताड घालण्यामागचे कारण कळते. ही भरताड ४०% एवढी असल्याचे आम्हांला आढळून आले आहे.
आता या रफिया बॅग्स वापरून पायरॉलिसिस करणे परवडत नाही. दहा किलो रफिया बॅग्स म्हणजे सहा किलो प्लास्टिक. अगदी ८०% कार्यक्षमता म्हटली तरी ४.८ किलो हायड्रोकार्बन. आणि रिऍक्टरमध्ये साठणार चार किलो चुना, जो रिऍक्शन वेगात होण्यास प्रतिबंध करतो.
अशा रफिया बॅग्सही विटा/ब्लॉक/खांब/पत्रे करण्यासाठी वापरणे इष्ट, कारण एरवीही राख/माती मिसळावी लागते ती इथे रफिया बॅग्सच्या चुन्यातून येतेच.
अशा विटा/ब्लॉक्स करवतीने कापता येतात नि ड्रिलिंग यंत्राने त्याला भोकेही पाडता येतात. म्हणजे ज्याला ‘मशिनिंग’ म्हणतात ते करता येते. पण नेहमीच्या विटांसारख्या या विटा सिमेंटने जोडता येत नाहीत. काही रसायने वापरून चिकटवायचे म्हटले तर महागात पडते. त्यामुळे या विटा/ब्लॉक्स जोडायचेअसल्यास खाचा करून (इंटरलॉकिंग) वा भोके पाडून त्यात सळया घालून जोडाव्या लागतील.
प्लास्टिक कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी 'प्लास्टिक बंदी'च्या वाळूत डोके खुपसून बसण्यापेक्षा डोळे उघडे ठेवून उपलब्ध तंत्रज्ञान वापरणे हाच शाश्वत उपाय आहे हे मान्य करणे जड जाईल, पण दुसरा इलाज नाही.