शापित स्त्री
जमना उभी राहिली. अजून म्हात्रे बोलतच होते. "...... but Sir we have information from a social worker, who is with us." त्यावर शहा साहेब म्हणाले, "ते मला काय पन माहीत नाय. माज्याकडे कंप्लेंट नाय आली पायजे." आणि त्यांनी फोन जमनाला द्यायला सांगितला.
मग जमनाचं ऐकून घेत समजावणीच्या सुरात म्हणाले, "मै बैठा हूं ना." फोन बंद झाला.
मग ते सगळेच जमनाच्या मागे निघाले. काही अंतर गेल्यावर इन्स्पेक्टर शिंदेंना आणि एका कॉन्स्टेबलला डाव्या बाजूच्या खोल्या तपासायला सांगून उजव्या बाजूच्या खोल्या तपासण्यासाठी जमनाच्या मागे ते निघाले.
हे विद्युतबेनला आवडलं नाही. पण ती बोलली नाही.
प्रत्येक खोलीत जुन्याच पोरी होत्या. कुठेच काही सापडेना. तेव्हा ते विद्युतबेनला म्हणाले, "बघा बेन खात्रीची माहिती नसली म्हणजे असं होतं. आता आम्हाला वरिष्ठांचे चार शब्द ऐकावेच लागतील."
डावीकडील खोल्यांमध्ये काहीच न सापडल्याने शिंदे नाराज होऊन परत आले. तेव्हा म्हात्रे म्हणाले, "आपलं नशीब जोरावर नाही. ठीक आहे. चला जमनाबेन, दुसऱ्या मजल्यावर कोणत्या खोल्या आहेत, दाखवा."
त्यावेळी आलेले सगळेच जण जमनाच्या बाथरूम जवळ कंटाळून उभे होते. जमना त्यांना वरच्या मजल्यावर जाण्यासाठी मागे लागली.
तेवढ्यात नारायण आला. त्याला पाहून तिला राग आला. नेमका कामाच्या वेळेस कुठे होता हा?
तिने स्वतः:वर कंट्रोल ठेवून त्याला म्हंटले, "कहॉं मर रहे थे तुम? ऐसा साब लोग आयेगा तो उनको कौन देखेगा और जानकारी कौन देगा? मै धंदा थोडके ये काम करुं? अभी कमसे कम इनको दूसरे मालेपर तो ले जाव, कामचोर कहीं का?"
तो त्यांना घेऊन निघणार तेवढ्यात इन्स्पे. म्हात्रे म्हणाले, "अरे ये बाथरूम तो खोलो."
ते ऐकून वरच्या जिन्याकडे वळलेली जमना म्हणाली, "अरे साब, बाथरूम तो बाथरूम है. उधर क्या मिलेगा आपको? थोडा तो एतबार करो."
मग शिंदे तुसडेपणाने म्हणाले, "जहॉं नहीं देखेंगे, वही तो तुम लोग लाईन करते है. चलो, चलो, चलो, उशीर नहीं करनेका. बाथरूम खोलके दिखाना."
घाबरलेल्या जमनाने तसे न दाखवता लॉक उघडून, "मेरेकू क्या? देखके तसल्ली कर लो."
ते पाहून शिंदे म्हणाले, "बाथरूम कोई लॉक करता है क्या?"
.... "वो जमनका है. और वो अब जिंदा नहीं, इसलिए लॉक किया."
दरवाजातून आत शिरत सगळ्या भिंती वाजवून पाहत, एका ठिकाणी पोकळ भाग दिसताच खालच्या बाजूने जोरदार लाथ मारताच भिंतीच्या रंगात लपवलेला दरवाजा तुटून एका बाजूला धोंडू लागला. आतली डाळीची एक गोण बाहेर पडली.
"अरे, अरे साब ये क्या करते है, इधर तो हम धानका गोनी रखते हैं."
.. मग त्यांनी बरोबरच्या कॉन्स्टेबलकडून आतल्या गोणी काढायला सुरुवात केली.
ते पाहून जमना तिथून काढता पाय घेत म्हणाली, "उधर कुछ नहीं मिलनेवाला. फालतूमे धान खराब कर रहे है."
तेवढ्यात हवलदाराने दोन गोणींमधे अडकलेला लाल रंगाचा दुपट्टा जोरात ओढला. तशी आतून एक राजस्थानी बेशुद्धावस्थेतली मुलगी खाली पडली.
तिला पाहून त्यांनी जमनाला विचारलं, "आणखी किती मुली लपवल्येत?"
मुलीचा श्वास कोंडला होता. मुलीच्या तोंडावर पाणी मारून शुद्धीवर आणलं.
तिला पाहून जमनाला फेफरं यायचं बाकी राहिलं. तरीही ती दडपून बोलली, "अरे साब ये लडकी कल रात को डरी हुई आयी और उसके पिछे गुंडे पडे है और उसको छिपाव करके बोलने लगी. फिर मैने तो उसे निकल जानेको कहां. वो गिडगिडायी पॉंव पकडने लगी."
तेवढ्यात नारायणकडे पाहून तिने विचारले, "है ना नारायण?"
... नारायण मान डोलवत हो म्हणाला.
मग मात्र शिंदे नारायणच्या कानफटात मारीत ओरडले, "हो काय म्हणतो रे? तुम्ही दोघे म्हणजे उंदराला मांजर साक्षी."
आता मात्र जमनाची चुरुचुरु बोलणारी जीभ लुळी पडली. तिला घाम फुटायला लागला.
शिंदे विद्युतबेनकडे वळून म्हणाले, "आपली इन्फॉर्मेशन खरी निघाली. चला आता आणखी सर्च घ्या."
असं म्हणत आणखी गोणी बाहेर काढल्या. आणखीही पोरी सापडतील असं वाटलं. पण तसं काही झालं नाही.
मग त्यांनी पो. स्टेशनमधून पाच-सहा लेडीपोलीसना बोलावून घेतलं. रेडिंग पार्टी आणखी शोधाशोध करू लागली.
आता ते सगळे दुसऱ्या मजल्यावर गेले.
आता मात्र जमनाने अडवणूक करण्यासाठी स्वतःच डोकं फिरल्यासारख्या सगळ्या खोल्या उघड्या केल्या. फक्त एक रुम सोडून, जी तिची स्वतःची होती. कारण तिथल्या गुप्त खोलीत जावेद मियाने आणलेली पाच लाखांची बाई होती. काय वाट्टेल ते झालं तरी ती तिला हातची घालवणार नव्हती.
एकीकडे तिने शहा साहेबांना फोन लावला. आणि गुजराती मधे जमनाने कसा राजस्थानी मुलीला आश्रय दिला ते रंगवून सांगितलं. म्हणजे ती मुलगी धंद्यासाठी आणली नव्हती.
त्यावर साहेब म्हणाले, "उनको जो करना है करने दो. तुम बेफिक्र रहो. मै हूॅं ना?" असं म्हणत त्यांनी फोन बंद केला.
एकेक खोली उघडून पाहणं चालू होतं. आतल्या पोरी पोलीस दिसले की किंचाळत बाहेर यायच्या. खोल्यांमागून खोल्या तपासणं चाललं होतं.
तेवढ्यात जमनाला फोन आला. तो गोहरबाईचा होता. तिने जमनाला पाच लाखांच्या बाईबद्दल विचारलं.
त्यावर जमना म्हणाली, "अरे पपनस खाव नी. जुल्लाब एकदम बंद हो जाते है."
पोलीस आले की त्यांची ही सांकेतिक भाषा होती.
ते ऐकून म्हात्रे ओरडले, "एक कोणाशी बोलतेस?"
तिच्या हातातून फोन खेचून घेतला. पण तो बंद झाला होता.
मग त्यांनी तिच्या खोलीकडे जात तोच फोन पुन्हा लावीत म्हंटलं, "किसको बोल रही थी पपनस खाव?"
तेवढ्यात तीनचार लेडी कॉन्स्टेबल आल्या. त्यांनी तिच्या खोलीचं दार उघडलं.
तशी ती म्हणाली, "अरे मेरी सहेली है नी उसासे बात कर रही थी."
मग त्यांचा फोन लागला, पण कोणीच उचलला नाही.
त्यांनी तिला परत देत म्हंटलं, "चल, उघड ही खोली."
"अरे साब ये मेरा बेडरूम है. इसमे क्या देखनेका? आपने परमिशन ली है? एक औरतका बेडरूम चेक करना चाहते हो."
त्यावर शिंदेंनी लेडी कॉन्स्टेबलला खूण केली.
तिने, "तुमको परमिशन चाहिए? ये परमिशन," असं म्हणत फाटकन जमनाच्या कानफटात मारली.
त्यावर जमना म्हणाली, "आपको ये भारी पडेगा."
थरथरत तिने परत शहा साहेबांना फोन लावला.
"अरे साब देखोनी ये लोगोंका काम खतम हुवा है फिरभी ये तकलीफ दे रहे है."
असं म्हंटल्यावर शहा साहेबांनी फोन म्हात्रेना द्यायला सांगितला.
"अरे तुम्हारे पास जो इन्फॉर्मेशन है उसके मुताबिक मिल गया ना? बंद करो रेड. और स्टेशन पहुॅंच जावं. मै भी आ रहा हूॅं उधर. Come on, pack up the raid and come back. That's my order."
मग मात्र रेड बंद करण्याशिवाय उपायच राहिला नाही. मात्र त्यांनी सापडलेली मुलगी, नारायण आणि जमना यांना घेऊन ते पोलीस स्टेशनकडे निघाले.
धडधडत्या छातीने ते स्टेशनमधे प्रवेशले. पण शहा साहेबांची नामोनिशाण नव्हती.
मग त्यांना शंका आली, खरोखरच शहा साहेब फोनवर होते की दुसरं कोणी?
अशी शंका आल्याबरोबर स्वतःवर ताबा न राहिल्याने त्यांनी जमनाच्या सणकन कानफटात मारली.
"खोटं बोललीस माझ्याशी? कोण होता तो शहा साहेबांच्या आवाजात बोलत होता? बोल लवकर. नाहीतर आणखी मारीन?"
त्यावर जमना रडत रडत म्हणाली, "अरे साब, हूॅं झूठ बात नथी करती. और अपने कैसे मारा मुझे? सामने लेडी पोलीस है फिरभी?"
जमनाने रडणं थांबवलं. मोबाईलवरून तिने शहा साहेबांना फोन लावायचा प्रयत्न केला.
पण इन्स्पेक्टर म्हात्रेंनी तो तिच्याकडून खेचून घेतला.
"आत्ता कोणालाही फोन लावून देणार नाही. चल, बस आतमधे."
असं म्हणून तिला आणि बरोबरच्या राजस्थानी मुलीला त्यांनी कोठडीत ढकलले.
लॉक लावता लावता रागाने म्हणाले, "बस रात्रभर इथेच. मंदबुद्धी मुलीकडून धंदा करवते?"
नारायणलाही एका कोठडीत ढकललं.....
विद्युत बेनची अपेक्षा भलंमोठं रॅकेट सापडेल अशी होती. तक्रारवजा आवाजात ती म्हणाली, "बीजो छोकरीको भी लेके आना था."
"हे पाहा बेन, इन्फॉर्मेशनप्रमाणे पकडून आणलेलं आहे. आमचं काम आम्ही केलं, आता तुम्ही जाऊ शकता."
..... त्यावर त्या भडकून म्हणाल्या, "आपने काम आधाअधुरा कर दिया. इसका जवाब तो आपको प्रेस कॉन्फरन्समे देना पडेगा."
..... त्यावर म्हात्रे शांतपणे म्हणाले, "पाहू काय होतंय ते. सध्या तूम्ही निघा. आम्हाला जमना आणखी त्या पोरींचे जबाबजबाब घ्यायच्येत. आम्हाला आमचं काम करू द्या."
असं म्हंटल्यावर बेन नाराज होऊन निघून गेल्या.
*******************************
दुसऱ्याच दिवशी संध्याकाळी राजमानेना पोलीस स्टेशनला बोलवून सुराडकरांनी तक्रार नोंदवून घेतली.
राजमाने थोडे वैतागले होते. ते पाहून इन्स्पेक्टर साहेब म्हणाले, "काळजी करू नका. आम्ही लवकरात लवकर तुमच्या मिसेसचा शोध लावण्याचा प्रयत्न करू."
हे ऐकल्यावर राजमाने फक्त उपरोधिकपणे हसले आणि निघता निघता म्हणाले, "पाहू काय होतय ते."....
सुराडकर त्यावर काहीच बोलले नाही. सामान्य माणसाच्या प्रतिक्रिया अशाच असणार याची त्यांना कल्पना होती......
राजमाने घरी आले. विशाखाने त्यांना येताना पाहून दरवाजा मुद्दामच उघडला आणि दारात उभी राहिली.
राजमानेंनी एकदा तिच्याकडे अनोळखी नजरेने पाहिलं आणि आपल्या खोलीकडे निघाले.
वास्तविक पाहता तिला त्यांना विचारायचं होतं, "तुमची बायको सापडली का?" पण त्यांचा मख्ख चेहरा पाहून तिने शब्द आतल्या आत गिळले.
राजमाने आत शिरले आणि त्यांना जाणवलं की खूपच पसारा पडलाय. त्यांनी तो जेमतेमच आवरला. थोडक्यात आवरण्याचा निष्फळ प्रयत्न केला.
आता परत जेवायला बाहेरच जावं लागेल. बायको असली की चहा, नाश्ता, जेवण आयतं समोर येतं.
मग ते आरामखुर्चीत बसून विचार करू लागले. हे नक्की काय चाललंय कळेना.
त्यांना मालतीच्या वडलांचा उगाचच राग येऊ लागला. म्हातारा नक्कीच तिला घेऊन गेला असला पाहिजे. असा विचार करून ते तिच्या वडलांचा राग राग करू लागले.
मग ते उद्या बघू असा विचार करून झोपण्याच्या तयारीला लागले. जेवणाला सुट्टी देऊन ते झोपण्याचा प्रयत्न करू लागले.
पोट रिकामं असलं तरी झोपेची पेंग येऊ लागली...........
रात्रीचा दीड वाजत होता. अचानक दरवाज्याची कडी वाजली.
राजमानेना आवाज अर्धवट ऐकू आला. थोड्या वेळाने कडी हलकेच वाजली.
आता मात्र ते खडबडून जागे झाले. ते धडपडत उठले. आवाज न करता ते दरवाज्याजवळ पोहोचले.
दरवाजा किलकिला करून त्यांनी बाहेर पाहिले. बाहेर गुडुप्प अंधार होता. त्यात त्यांना मानवी आकृती दिसली.
मग त्यांनी सताड दरवाजा उघडला.
समोर मालतीचे वडील हात जोडून उभे होते. ते अत्यंत खालच्या आवाजात विव्हळत होते.
राजमानेना जबरदस्त राग आला.
पण वडील म्हणाले, "जावंईबापू, मालतीची आई थोड्याच वेळापूर्वी हॉस्पिटलात गेली हो. तुम्ही तिला घेऊन येता का माझ्या बरोबर?"
आधी आलेला राग गिळून राजमानेंनी लाईट लावला. त्यांना घरात घेत म्हणाले, "मालती घरात नाही. तिला कोणीतरी पळवून नेली आहे. किंवा ती तुमच्याकडेच आली असणार. तिची आई गेल्याचा बहाणा करून ती घरी आहे की नाही हे पाहायला आलात का?"....
त्यावर काकुळतीला येऊन वडील म्हणाले, "नाही हो. मी खोटं कशाला बोलेन? ती घरी आली असती तर मी तिला न्यायला आलो असतो का? विश्वास ठेवा माझ्यावर."
"..... आणि हो, ती घरी नाही?"
......., मग कुत्सितपणे राजमाने म्हणाले, "लग्नाच्या वेळीही सगळं खरं सांगितलं नाहीत. तिला मुलगी आहे, हे लपवून ठेवलंत. आत्ता तरी मी विश्वास का ठेवायचा? बोला."
असं म्हंटल्यावर ते हुंदके देत म्हणाले, "देव कोणती परीक्षा घेतोय, काही कळत नाही."
आणि ते डोळे पुसीत दरवाज्याबाहेर पडले. आणि अंधारात दिसेनासे झाले.
राजमानेना हे सर्व खोटं वाटलं आणि ते अंथरुणावर पडले. पण झोप लागेचना.
मग ते उठले. लाईट लावून आरामखुर्चीत बसले.
अचानक ते धडपडत उठले आणि मालतीची आई खरंच गेली तर नसेल असा विचार करून जेमतेम हाताला येतील ते कपडे चढवून बाहेर पडले. खोलीतला लाईट तसाच होता.
मग त्यांच्या मनात आलं, निदान आपण हॉस्पिटलचं नाव तरी विचारायला पाहिजे होतं.
वडील नक्कीच फार लांब गेले नसतील असा विचार करून रस्त्यावर धावत सुटले.
मग जवळच असलेल्या एसटी स्टँडवर ते मालतीच्या वडलांना शोधू लागले.
एका बाकड्यावर ते उदासपणे बसलेले दिसले. त्यांनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवून सगळ्या घटना वडलांना सांगितल्या.
रात्रीची बस नसल्याने ते मालतीच्या बाबांना घरी घेऊन आले.
आत शिरल्या शिरल्या बाबा म्हणाले, "हॉस्पिटलचं बिल वगैरे सगळं भरलंय तरी बॉडी बाहेर काढून ठेवल्ये. काय सांगणार. म्हणून तर तुमच्या कडे आलो."
"नाहीतर नसता आलात नाही का?" राजमाने तिरकसपणे बोलले.
त्यावर मालतीचे बाबा काहीच बोलले नाही.
"सकाळपर्यंत तरी बॉडी घेऊन जायला हवी. तसं सांगितलंय."
...... "बरोबर, पण चार वाजल्याशिवाय बस नाही. तोपर्यंत थांबावं लागेल."
असं म्हणून राजमाने आपल्या अंथरुणावर पडले.
मालतीचे बाबा मात्र भिंतीला टेकून बसले. काय करणार बिचारे.
........
घड्याळात तीनचे टोले पडले. बाबांना जेमतेमच डुलकी लागली.
त्यातही स्वप्नात त्यांना मालतीच्या आईने हालवले. "अहो उठा, झोपलाय काय? नदीवर जायला वेळ होतोय. चला, चला, ....."
असं म्हंटल्यावर ते जागे झाले. आणि त्यांना स्वप्न पडल्याचे लक्षात आलं.
राजमाने घोरत होते. आपण जावं की काय या विचारात ते होते. पण आपल्या एकट्याच्याने पुढची तयारी कशी होणार?
मुलगा नसल्याची जाणीव त्यांना प्रकर्षानं झाली. पण परिस्थिती वेगळी होती.
अचानक राजमाने घोरण्याचे थांबले आणि उठून बसले.
त्यांनी बाबांना विचारले, "किती वाजले?"
साडेतीन वाजत होते. मोबाईलमधे पाहिल्यावर ते उठून बसले.
आत्ता खरंतर त्यांना चहा हवा होता. खरंतर भूकही लागली होती.
स्वयंपाकघरात जाऊन त्यांनी दूध आहे का ते पाहिलं. फ्रीजमधून दूध काढून तापवण्यासाठी भांडं पाहिलं. लवकरच चहा केला.
दोन कप घेऊन ते बाहेर आले.
चहा घेता घेता बाबा म्हणाले, "निघायला हवं. मला वाटतं, मी निघालेलं बरं."
..... राजमाने भडकून म्हणाले, "मी नको येऊ का? ...."
त्यावर बाबा म्हणाले, "नाही हो, तसं नाही. म्हणजे आपण लवकर निघायला हवं. एवढंच."
यांच्याशी जास्त बोलण्यात अर्थ नाही, असा विचार करून त्यांनी कपडे घालायला सुरुवात केली.
........ दहा-पंधरा मिनिटातच ते घराबाहेर पडले.
........
*******************************
विशाखा केव्हाच झोपली होती. मी घरी आलो तेव्हा काहीच दिसलं नाही. त्यामुळे शेजारी काय घडलंय हे समजायला मार्ग नव्हता.
त्यांच्या घराला कुलूप होतं.
पुढचे दोन दिवस काहीच घडलं नाही.........
*******************************
सासरे-जावई दोघे एसटी स्टँडवर पोहोचले. चारची बस जेमतेमच मिळाली.
सकाळी साडेसहाला दोघे गावी पोहोचले.
हॉस्पिटल अथॉरिटीजबरोबर थोडी वादावादी झाली. पण एकदाच दाहसंस्कार आटपला.
दहा वाजत होते.
राजमानेंनी बस पकडली. त्या आधी त्यांनी स्टँडवर जेवून घेतले.
त्यांच्या गावी उतरले, तर समोर इन्स्पेक्टर सुराडकर उभे. जणू राजमाने केव्हा येणार हे माहित होतं.
त्यांना पाहून राजमाने म्हणाले, "तुम्हाला खाजगी आयुष्य नसतं का हो?"
(क्रमशः)
अरुण कोर्डे ©®