शापित स्त्री
रंजीबाई अजूनही आली नाही म्हणून जमना धडपडत उठली. हॉल मध्ये येता येता रंजीबाई आणि तिची टक्कर थोडक्यात टळली. "अरे अरे ये क्या कर रही हैं, और ये आवाज कौनसी हैं?"
रंजी बाईने फ्रंट डोअर उघडला. जिथे रात्री वासिमची गाडी उभी होती, त्याच्या एका बाजूला राजस्थानी येडीचा तडफडणारा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. ते पाहून शांतपणे रंजी ला पाणी आणायला सांगितलं. पाणी घेऊन पोरीच्या तोंडावर मारलं, पण येडीने जीव सोडला होता. पोरींचे विस्फारलेले निश्चेष्ट डोळे जमना कडे पाहत होते. जणू काही तिला जाब विचारीत होते, "अशी मी काय चूक केली की मला उडी मारावी लागली?"
जमनाला काही सुचेना. ती तिथेच डोक्याला हात लावून बसली... आता पोलीस येणार...
त्यासरशी तिच्या अंगाला दरदरून घाम सुटला... त्यांच्या नकळत हिची विल्हेवाट लावता येईल का? प्रश्नच प्रश्न. उत्तरं तिला शोधायची होती आत्ताच आपण शहा साहेबांच्या मदतीने सुटून आलो आहोत. परत ते मदत करतील?... तिच्या डोक्यात फक्त प्रश्न होते. परत म्हात्रे साहेबांनी ताब्यात घेतलं तर ते सहजासहजी सोडतील? शहा साहेबांच तरी ऐकतील का?...
इतर पोरी उठायच्या आत हिला हालवली पाहिजे. रंजीबाईच्या मदतीने तिला उचलून स्वतःच्या खोलीत आणण्या शिवाय गत्यंतर नव्हतं. तिने जेमतेम तो मृतदेह तिच्या खोलीत आणला. आणि सैतानासारखी बेल वाजली. घाबरलेल्या तिला रंजीबाई म्हणाली, "आप घबरना नही. मै हूं ना? मै सब ठीक कर दूंगी."
दरवाज्यात कधी न पाहिलेला माणूस उभा होता. तो होता येडीचा "बाप"...
जमनाने त्याला ओळखलं नाही. कशी ओळखणार होती त्याला ती?"
------------------------------------------------------------
अचानक राजमानेना रात्रभराच्या श्रमाने डुलकी लागली. त्यांना दरवाजा वाजत असल्याचा भास झाला. त्यांनी लक्ष दिलं नाही. पण झोपमोड झाल्याने ते अर्धवट जागे झाले. पुन्हा दरवाजा वाजला. आता मात्र ते धडपडत दरवाज्याजवळ गेलं. दरवाजा अर्धवट उघडला गेला दारात विशाखा उभी होती. त्यांनी प्रश्नार्थक मुद्रेने तिच्याकडे पाहिलं. "मी शेजारीच राहते. दोनतीन दिवस तुम्हाला टेन्शन असल्याच दिसलं. म्हणून म्हटलं जेवणाबद्दल विचारावं. म्हणून आले होते." त्यांनी अनोळखी भाव डोळ्यात आणून म्हटलं, "काही लागलं तर सांगीन. तुम्ही निघा."
आणि दरवाजा लावून घेतला. विशाखाची निराशा झाली. नाक मुरडून ती आपल्या खोलीकडे वळली. मी घरी नव्हतोच. मला रात्रीच कळणार होतं...
राजमाने कपडे घालून जेवणासाठी बाहेर निघाले. दरवाज्याला परत कुलूप लागलं. विशाखाला राग आल्याने तिने लक्ष दिलं नाही. तसं हे फार मोठं गाव नसल्याने हॉटेल अगदी तीनचारच होती. त्यातल्या त्यात बऱ्यापैकी हॉटेल पाहून राजमानेनी जेवून घेतलं. आता मालतीचे वडील काय करतील. त्यांना आपल्या घरी आणावं काय? खरंतर तेच योग्य होतं. पण पूर्वग्रह असलेल्या राजमानेंनी तो विचार अमलात नं आणण्याचं ठरवलं. नाहीतरी म्हाताऱ्याने आपल्याला फसवलं आहे. खरं तसं नव्हतं. पण गैरसमज धरून ठेवणाऱ्याबद्दल काय बोलणार?
ते घरी आले तेव्हा तीन वाजत होते. त्यांनी दरवाजा लावला. पेंग येत होती...
तेवढ्यात दरवाज्याची कडी वाजली. राजमानेनी तिरसटपणे विचारलं, "कोण आहे?"
दरवाज्यात इन्स्पेक्टर सुराडकर उभे. त्यांना पाहून राजमाने वैतागून म्हणाले, "आता काय? आता कोणती बॉडी सापडली?"
"बॉडी नाही पण हे सापडलंय." असं म्हणून त्यांनी हातातला साडीच्या पदराचा तुकडा दाखवला. आणि म्हणाले, "ही त्यांचीच साडी आहे ना?"
अचानक राजमानेना दिवाळीत आणलेली साडी आठवली. आणि ते बारीक आवाजात म्हणाले, "होय, खरं आहे."
"हे आम्हाला गोरेगावच्या जंगलात सापडलं. त्या तिथे काय करायला गेल्या होत्या? जवळपास कोणी नातेवाईक राहतात की काय?"
थोडावेळ जाऊन देऊन राजमाने म्हणाले, "मला काहीच कल्पना नाही हो."
"मग या साडीवरचा ब्लाऊजही नसणार. तरीपण शोधा. दुसरा ब्लाऊज घातला असेल तर!"
राजमाने उठून कपाटाकडे गेले. कपाट उघडल्यावर त्यांच्या हाताला फाटलेल्या तुकड्या बरोबर मॅच होणारा ब्लाऊज सापडला. म्हणजे हा तुकडा त्यांच्या साडीचाच आहे. तरी प्रश्न उरतो त्या जंगलात का गेल्या? का पळवणाऱ्याने त्यांना तिकडे नेल्या.
"ठीक आहे. आम्ही निघतो. तो ब्लाऊज तेवढा द्या. Thanks for coperation." असं म्हणून ते निघून गेले.
राजमानेच्या डोक्यात वेगळंच विचारचक्र चालू झालं. खूप डोकं पिंजून झालं. पण त्यांना उत्तर काही सापडेना...
आता प्रश्न तिच्या वडिलांचा होता. ते राहणार कुठे... एकट्याने राहणं कठीण. आपल्याकडे राहणंही कठीण. आपल्याकडे राहिलं तर अनाथाश्रमात असलेल्या मालतीच्या मुलीकडे लक्ष कसं ठेवणार?... तसेही मालतीचे वडील नकोच होते. परिस्थितीने कारण तयार केलंच होतं. आणि म्हाताऱ्याने आपल्याला फसवलंपण आहेच. अशा रीतीने कोणाही बद्दल जराही प्रेम नसलेल्या त्यांनी मालतीच्या वडिलांचा विषय बाजूला सारला.
------------------------------------------------------------
दारात उभ्या असलेल्या म्हाताऱ्याला आत येऊ न देता, आणि आपदमस्तक न्याहाळून झाल्यावर तोंड वाकडं करीत जमनाने त्याला विचारलं, "हो कौन तुम? कहासे और किसलीये आये हो?"...
तो म्हणाला, "देखिये मेरी बेटी लापता हैं. उसका नाम "परी" हैं. शायद आपके यहाँ आई होगी."
त्यावर भडकून जमना म्हणाली, "यहाँ परी वरी कोई नही हैं. ये क्या धरमशाला हैं क्या? जावं! लापता बेटी को ढुंढना हैं तो पुलिस मे जावं. यहांका पता किसने दिया? चलो चलो निकलो." असं म्हणून ती दरवाजा लावायला लागली.
तेवढ्यात तो म्हणाला ते ऐकून जमनावर वीज कोसळायचीच बाकी होती. त्याने नावं सांगितले ते "गोहर बाई" चं होतं. जमनाने कपाळाला हात लावला. तिने ताबडतोब गोहरबाईला फोन लावला. "अरे गोहरजान तू मुझे मरवाएगी क्या? अरे ये बुढेको कायकु भेजा?"...
"अरे उसे जावेद मिया लेके आया था मुझे उसपर दया आई इसलिये मैने उसे दोचार और कोठोका भी पता दिया हैं."
अचानक म्हाताऱ्याचं लक्ष तारेवर वाळत असलेल्या कपड्यांकडे गेलं. तिथे वाळत असलेला पिवळा ड्रेस पाहून तो ओरडला. "वो देखो मेरे परिका ड्रेस सूख राहा हैं." असं म्हणून त्याने परिच्या नावाने दरवाज्यात बसून गळा काढला.
आता तर जमनाला जास्तीच राग आला. "अरे, अरे हम रोज रहे हैं क्या?" ती कशाला रडेल? तिची मुलगी थोडीच हरवली होती?... तिने "नारायण, नारायण!" अशा जोरात हाका मारल्या. पण ओ द्यायला नारायण होताच कुठे? तो होता पोलिसांच्या ताब्यात. फक्त येडीला आणि जमनालाच च सोडलं होतं.
आता या म्हाताऱ्याला कोण घालवणार? शेवटी रंजीबाईच्या मदतीने त्याला घराबाहेर काढण्यात ती यशस्वी झाली. तरीही तो तिच्या घरासमोर रडत बसला होता. काहीही असो सध्या त्याची बला टळली होती. आता तिने आपला मोर्चा येडीच्या देहाकडे वळवला. फार वेळ मृतदेह आपल्या खोलीत ठेवून चालणार नाही. आणि एक मृतदेह घरात असल्याची जाणीव होऊन तिच्या अंगावर सर्रकन काटा आला. आयुष्यात कधीही घाबरली नव्हती, तेवढी ती आत्ता घाबरली. अशा वेळेला जमनने काय केलं असतं? तिच्या मनात आलं.
ती तशीच उठली आणि जमनच्या फोटोपुढे जाऊन डोळे मिटून उभी राहिली. अशा गळ्याला फास लावणाऱ्या स्थितीत ती असं करायची आणि तिला मार्ग सुचायचा.
अचानक तिला मोमीन भाई ची आठवण झाली. तिने त्याला फोन लावला. पलीकडून ओळखीचा आवाज आला. "अरे मेरी जम्मो जान. कैसे याद किया?"...
जमनाचा गळा भरून आला. रडत रडत तिने सगळी कहाणी सांगितली. शेवटी म्हणाली, "आओगे ना?"...
"जरूर आऊंगा. लेकिन तुझे तो अपनी शर्त मालूम हैं ना?" जमनाने होकार भरला. "आता हूं शामतक, बिलकुल डारना नाही."
त्याची अट तिला माहीत होती.
तिचं ओझं उतरलं होतं. येडीला कशीतरी गुंडाळून ठेवून ती बाहेरच्या हॉल मध्ये येऊन बसली. गेल्या आठवड्या पासून तिच नाहीस झालेलं चैन थोडंतरी परत आलं होतं.
(क्रमशः)
अरुण कोर्डे ©®