भाग्य

काळोख पिंजण्याचे घेऊन भाग्य आलो
अवचित प्रकाशण्याचे घेऊन भाग्य आलो


हातावरील रेषा जुळवून शोधतो मी
कुठल्या सिकंदराचे घेऊन भाग्य आलो


हातात हात आला, आला, सुटून गेला
मी हात चोळण्याचे घेऊन भाग्य आलो


जगती नसेल उरले काहीच सर कराया
म्हणुनी पराभवांचे घेऊन भाग्य आलो


शरपंजरी न पडलो, ती थोरवी न माझी
अन् दक्षिणायनाचे घेऊन भाग्य आलो


पाताळलोक सांप्रत या भूवरी असावे
तेव्हां चिरंजीवांचे घेऊन भाग्य आलो


जगण्याशिवाय जमले नाही, मिलिंद, काही
सामान्य माणसांचे घेऊन भाग्य आलो