आहुती

तुझ्या स्वरांचा कसा रुचावा सनातन्यांना बाज नवा
हवे तयांना जुने बोल अन् तुझा गड्या पखवाज नवा


नकोस मांडू व्यथा-वेदना, मनोगतें वा यापुढती
रसिकजनांच्या अंगावरती पूर्वग्रहांचा साज नवा


नको रूपकें,अन्योक्ती वा, अलंकार नुमजे त्यांना
नका उभारू कोणी येथे प्रतिभेचा, रे, ताज नवा


भाट हवे दरबारी यांना, लुसलुशीतसे शब्द हवे
तप्त सळीसम कानी घुसतो सत्याचा आवाज नवा


शिकार करण्या माझी जमले पवित्रतेचे पाईक हे
मला पाहुनी इथे जन्मतो रोज एक नाराज नवा


पुन्हा होम शब्दांचा माझ्या मंबाजींनी मांडियला
पुन्हा आहुती माझी मागे दिवाभितांचा याज नवा