श्वास

पौर्णिमेची, सख्या, रात्र जागून जा
धुंद डोळे जरासे जडावून जा


राजसा,ओठ दे बासरीला असे
मूक गात्रातले सूर छेडून जा


या मिठीला किती बोलकी मी करू
अंग-अंगातला नाद ऐकून जा


आवरू मी तुला ही न वेळा अशी
भान उरले जरासे, हिरावून जा


ये पहाटेस तू घेउनी गारवा
उष्ण श्वासातली आच देऊन जा


श्वास माझे अडू लागले, रे, पुन्हा
ये, पुन्हा प्राण माझ्यात फुंकून जा