शब्द माझे

फिरुनी तुझ्या सुरांना फसतील शब्द माझे
स्वरसाज लेवुनी अन् हसतील शब्द माझे


ठरवून एकट्याने जाशील तू, तरीही
वाटेत सोबतीला असतील शब्द माझे


या चिमुकल्या पिलांना फुटतील पंख तेव्हा
घरट्यात मावणारे नसतील शब्द माझे


समजेल सर्व-काही, काही न बोलताही!
डोळ्यांत मुग्धतेने वसतील शब्द माझे


व्यवहार रोज करतो भाषेत मीच परक्या
का सांग या जगावर ठसतील शब्द माझे?


- कुमार जावडेकर