दोष

काळोख मातला होता, बेहोष चांदणी होती

ना दोष सर्वथा माझा, ती वेळ निसरडी होती


ही सभ्य रीत, मर्यादा, लंघून आज मी आलो

झाला प्रमाद हा माझा, पण रेष पुसटशी होती


नाकारले कितीही तू, तुज भावली धिटाई ती

ओठात लाजरी लटकी तक्रार कालची होती


ना झुळुक एक वाऱ्याची, ना थेंब पावसाचाही

स्मरणातली तुझ्या-माझ्या पण रात्र वादळी होती


झाली पहाट केंव्हा ते कलिके तुला न कळले पण

न्हाली दवात अंगाची एकेक पाकळी होती