नाव सुचत नाही

पंत गेले, राव गेले, चोर गेले, साव गेले,
जे उतरले खेळण्याला शेवटी निर्धाव गेले

चार  भिंतींचे रणांगण, बाण थोडे, फार काटे
जिंकल्या काही लढाया, फोल काही डाव गेले

नोंद नाही ठेवली मी, ना सुखांची, ना क्षणांची
कोणते रेंगाळले अन् कोणते भरधाव गेले

भेटली परक्याप्रमाणे पण दगा देऊन गेले
क्षणभरी डोळ्यांतुनी त्या तरळुनी जे भाव गेले

औपचारिक कौतुकाचा गुच्छ ती देऊन गेली
खवळलेले त्यात भुंगे सांगुनी सद्भाव गेले

शोधतो माझी मुळं मी जी कधी मातीत होती
दूर गेलो मी जरासा, दूर थोडे गाव गेले

का असा आटापिटा हा, आरशाची का गुलामी
वर्तनाने माणसाचे नाव टिकले, नाव गेले

 ह्या गझलेसाठी मला नाव सुचत नाही. वाचकांनी नावं सुचवावी (वाटल्यास    ठेवावी!) ही विनंती.