कमलिनी

मी पहाटवारा होऊन तुज झोंबावे
तव तनुस बिलगून रोमांच की फुलवावे
मज समजून दुलई लपेटून तू घ्यावे
होऊनी धुंद मग देहभान विसरावे
कैद मला, कमलिनी, भृंगापरी करावे


डोळ्यांवरी अलम अजून तुझ्या निद्रेचा
रम्य निशेचा आणि प्रणयाच्या मदिरेचा
दरवळ फुललेल्या जाईचा, कस्तुरीचा
तव तृप्त लोचनी सुखद स्वप्न तरळावे
कैद मला, कमलिनी, भृंगापरी करावे


अध्याय आपल्या संसाराचा पहिला
आवेग अनावर संकोचाला भिडला
हळुवारपणे मग पृथक-भाव विरघळला
सिद्धीस कार्य त्या पंचशराचे न्यावे
कैद मला, कमलिनी, भृंगापरी करावे


गुंफले येथुनी जीवन तुझे नी माझे
कानात चौघडा अजुनी कालचा वाजे
कृष्णमणी तुझ्या कंठात यापुढे साजे
मी तुजला अन् तू सौभाग्या मिरवावे
कैद मला, कमलिनी, भृंगापरी करावे