इंग्रजी शाळांमध्ये पहिलीपासून मराठी!

बऱ्याच काळानंतर पुन्हा हा विषय म.टा. त वाचायला मिळाला. चर्चेसाठी योग्य वाटल्याने हा मूळ लेख येथे जसाच्या तसा उतरवून ठेवला आहे. महत्त्वाच्या वाटलेल्या मुद्द्यांना अधोरेखित केलेले आहे.

म.टा.तला मूळ लेख : इंग्रजी शाळांमध्ये पहिलीपासून मराठी!
ले. रेश्मा मुरकर
(म.टा. दि. २७ एप्रिल २००६)

मुंबई : इंग्रजी माध्यमात शिकल्याने आपल्या मुलांची मातृभाषेशी नाळ तुटण्याची भीती , ती तशी तुटू नये अशी इच्छा असणाऱ्या आणि घरात मराठी वातावरण ठेवणाऱ्या , मराठी पालकांना सतावणार नाही. कारण , आता पहिलीपासूनच इंग्रजीच्या बरोबरीने मराठी भाषा (प्रथम) शिकण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध झाली आहे. मराठी भाषा ऐच्छिक असणार असून २००६-०७ या शैक्षणिक वर्षापासून त्याची अंमलबजावणी करण्यात येईल. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या या निर्णयाविषयी मुंबईतील शाळांनी मात्र सावध पावित्रा घेतला आहे.

इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये पाचवीपासून मराठी भाषा हा विषय शिकवला जातो. आता पहिलीपासून प्रथम भाषा म्हणून मराठी विषय निवडता येईल. अर्थातच यात पालकांची भूमिका महत्त्वाची असेल. शाळांनी पालकांची बैठक बोलावून याविषयीचा निर्णय घ्यायचा आहे. मराठी माध्यमासाठीचा अभ्यासक्रम यासाठी लागू असेल. त्याचबरोबर नववी-दहावीसाठी मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी ही प्रथम भाषा म्हणून निवडण्याची मोकळीक देण्यात आली आहे.

पहिली ते चौथीपर्यंत मराठी भाषा अतिरिक्त असून कोणत्याही विषयाला पर्यायी नसेल. त्यासाठी जादा १०० मार्कांची परीक्षा होईल , असे मंडळाचे अध्यक्ष डॉ. वसंत काळपांडे यांनी ' मटा ' ला सांगितले. त्यासाठी , कार्यानुभवाच्या नऊ तासिकांपैकी पाच तासिका मराठीला दिल्या जाणार आहेत. पुण्यातील डेक्कन एज्युकेशन सोसायटी , शिक्षण प्रसारक मंडळ , मुंबईतील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी या मराठी व्यवस्थापकांच्या चालवल्या जाणाऱ्या शाळांकडून तसेच , मराठी पालकांकडून तशी मागणी सातत्याने होत होती.

सांताक्रूझच्या राजाराम पोद्दार शाळेच्या मुख्याध्यापिका अनुराधा गोरे याचे समर्थन करताना म्हणाल्या की , भावनिक आणि सामाजिक बुद्ध्यांक वाढवण्यासाठी उच्चस्तरावरील मराठी भाषेच्या अभ्यासाचा उपयोग होतो. तसेच , मराठीभाषक राज्यात मराठी भाषा शिकणे अनिवार्य असलेच पाहिजे. मात्र , पहिलीच्या विद्यार्थ्यांचे कार्यानुभवाचे तास कमी करण्याला त्यांनी विरोध दर्शवला. इतरभाषकांसाठी तो ऐच्छिक असावा किंवा अनिवार्य करायचा झाल्यास किमान द्वितीय भाषा म्हणून असावा , अशी सूचनाही त्यांनी केली.

पार्ले टिळक विद्यालयाच्या इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका शारदा लिमये यांनी या निर्णयाविषयी सावध पावित्रा घेतला. मराठी पालकांचा याला कितपत पाठिंबा मिळेल , अशी शंका त्यांनी व्यक्त केली. तसेच , त्यामुळे जादा शिक्षकांची नेमणूक करावी लागेल. त्यामुळे किती शाळांमधून हा विषय शिकवला जाईल , अशी शंकाही शाळांकडून व्यक्त होते आहे.


 १. पुण्यातल्या पालकांचा आग्रह आणि मुंबईतल्या पालकांचा विरोध हे पटण्यासारखे आहे का?

२. मराठी शिकवण्यासाठी जादा शिक्षकांची नेमणूक होईल का?

तुम्हाला काय वाटते?