मदार

उरात खुपसू नकोस माझ्या कट्यार तू
पुन्हा पुन्हा ग नकोस देऊ नकार तू

दिलेस तू मूर्तरूप स्वप्नांस साजिऱ्या
तुला न ठावे, अजाणती शिल्पकार तू

करे चहाडी सख्यास रोमांचिता तनू
दिलेस तोंडी जरी कितीही नकार तू

मनात वादळ, कभिन्न लाटा उधाणता
ढगांस तेव्हा जशी रुपेरी किनार तू

नशा अशी लाभली न द्राक्षामध्ये कधी
तृषार्त ओठांस वारुणीचा तुषार तू

तुझ्याविना पाहिले कधी का कुणाकडे
नकोस नजरेतुनी करू हद्दपार तू

लहानशी चूक प्रीतिची अन् सजा किती
स्वतः  स्वतःला, सखे,  जरा हे विचार तू

रुसून देते नकार ती मोहरावया
जिच्यावरी ठेवली,वसंता, मदार तू

भल्याभल्यांचे इमान ढळले तिच्यामुळे
मिलिंद खेळू नकास भलता जुगार तू