भारतभेट

भारतात जायचा दिवस ठरल्यापासूनच मन तिकडे केंव्हाच जाऊन पोहोचलं होतं. अखेर जायचा दिवस उजाडला. लंडन-मुंबई असा थेट ९ तासाचा प्रवास करून श्री छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलो तेंव्हा मुंबईतले दुपारचे १२ वाजले होते. विमान उतरायच्या आधी खिडकीतून बघताना असंख्य इमारतींची गर्दी, समुद्र दिसायला लागल्यावर छातीत आनंदाने धडधडायला लागलं. कित्येक महिन्याने आपल्या भारतात पाऊल ठेवणार! कोण कोण न्यायला आले असेल? कधी एकदा सगळे सोपस्कार करून बाहेर पडतोय असे झाले होते. त्या फिरणाऱ्या पट्ट्यावरून आमच्या भल्यामोठ्या बॅगा कितीवेळ आल्याच नाहीत. सर्वात शेवटपर्यंत आम्हीच दोघे थांबलो होतो. अखेर त्या हातात आल्यावर दोन ट्रॉलीवर सामान लादून arrivals च्या दिशेने चालू लागलो.
थोड्याच अंतरावर घ्यायला आलेल्या माणसांची गर्दी दिसायला लागली. हारतुरे, फुलांचे गुच्छ, माणसांच्या नावाच्या पाट्या, आनंदाचे चित्कार या सगळ्या गोंधळातून माझे सासरे, दीर, नणंद सगळे दिसले. कोण किती जाड, बारीक, गोरे, काळे झाले याची चर्चा करत गाडीपाशी जाऊन पोहोचलो.

आता मुंबई-पुणे ३-४ तासाचा प्रवास! भर एप्रिल-मे महिन्यातला उन्हाळा! रणरणतं ऊन! आता पुण्याकडे वाटचाल सुरू झाली. कधी एकदा आम्हाला वडापाव आणि चहाचा आस्वाद घेतोय असं झालं होतं. एका फ़ुडमॉल मध्ये थांबून दोन वडापाव आणि चहा प्याल्यावर खरं भारतात आलो असं वाटायला लागलं. (भारतातल्या चहाची सर कुठेच नाही. )
घरी जाईपर्यंत आमचे चेहरे उन्हाने अगदी काळवंडून गेले होते. त्यामुळे आईला आणि आजीला आमच्यात फार काही बदल झाला नाही असेच वाटले. मग गप्पाटप्पा, चहा-खाणे, आणलेल्या भेटवस्तू दाखवणे यात ती संध्याकाळ कशी गेली ते कळलंच नाही.

आता एक महिना आमच्या हातात होता. सगळ्या नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना भेटणे, जवळपास रोज आमरस-पुरी चापणे, चैत्रगौरीचे हळदीकुंकू इ. चालूच होते. या सगळ्या धबडग्यात १०-१५ दिवस गेले. नंतर ठरल्याप्रमाणे आम्हाला कुलदेवतेला जायचे होते. मग काय? लाल डब्याचे आरक्षण करून आमची चौघांची वरात निघाली कर्नाटकात! मुद्दाम रात्रीचा प्रवास करायचे असे ठरले म्हणजे उन्हाचा त्रास नको. स्वारगेटवरून १० वाजता आमची पुणे-जमखंडी एस.टी. निघाली. झोप बऱ्यापैकी लागली. पहाटे चहासाठी कोठेतरी थांबलो. तर तिथल्या उपाहारगृहात कानडी भाषेतली गाणी जोरात लावली होती. पुन्हा पुढचा प्रवास सुरू झाला. सहा वाजत आले. आता एस.टी. चांगलीच उडायला लागली होती. धूळ पण आत येत होती. सगळीकडे कानडी पाट्या दिसत होत्या. मला काहीच कळत नसल्याने मी नुसती गोल गोल अक्षरं बघत बसून होते. अखेर ८ वाजता जमखंडीत पोहोचलो. थोडा वेळ लॉजवर थांबून, नाश्ता करून मग देवदर्शनाला जायचे असे ठरले. नाश्त्यासाठी इडली, मेदूवडा-सांबार, डोसा एवढेच ! पण इतका मऊसूत डोसा मी प्रथमच खाल्ला. मग तिथून देवळात! तिकडे जाण्यासाठी नदी पार करावी लागते असे सांगितले होते पण उन्हाळा असल्याने नदीचे पात्र पूर्णपणे कोरडे होते. मग काय चालतच गेलो की लगेच समोर देऊळ. तिथे अभिषेक, प्रसाद सगळे यथासांग पार पडले. आता कर्नाटकात प्रसाद म्हणजे भाताशिवाय दुसरे काय असणार? चार वेळा भात वाढतात. पहिल्यांदा भाजीभात, मग सारभात, मग मसालेभात, शेवटी ताकभात! पण चव छानच होती.

आता परतीचा प्रवास! मध्ये आम्ही रामदुर्ग या ठिकाणी मुक्काम करणार होतो जिथे सासूबाईंचे माहेर आहे. ते घर म्हणजे अगदी 'स्वदेस' मधल्या कावेरीअम्माचे होते ना! अगदी तस्सेच आहे. आत गेल्या गेल्या डाव्या बाजूला दोन पायऱ्या चढल्या की पडवी, मध्ये चौक, तिथे नळ, घरातल्या खुंट्या, कोनाडे बघून मला खूप छान आणि वेगळं वाटलं.

तिथून दुसऱ्या दिवशी सकाळी निघून कोल्हापूर, गणपतीपुळे करून मग पुण्याला आलो. यात जवळपास एक आठवडा गेला होता. पुण्यात आल्यावर लक्षात आले अरे आता फक्त ८ च दिवस राहिलेत परत जायला.
मग परत धावपळ, खरेदी, राहिलेल्या लोकांच्या भेटीगाठी ! या गडबडीत एक दिवस cyber cafet जाऊन म्हटले जरा मनोगतवर एक चक्कर मारावी. बघते तर काय? मनोगतचे रूप पालटलेले!! जणू आपल्याच एखाद्या रोजच्या भेटणाऱ्या जवळच्या माणसाला खूप दिवसांनी बघितले की कसे होते तसेच माझे झाले.

एव्हाना बॅग भरायला सुरुवात केली होती. आता त्यांना पिल्ले झाली होती. अचानक दोन डाग वाढले. 'तिकडे आंबे कुठे मिळणार, एक डझन तरी घेऊन जा.. पापड-कुरडया घ्या, भाजणी, तांदळाची पिठी, वेगवेगळ्या चटण्या, मसाले, अशी यादी वाढतच होती.
कसेबसे सगळे सामान एकदाचे बॅगेत जाऊन बसले आणि आमचा निघायचा दिवसही जवळ येऊन ठेपला. सकाळचे विमान असल्याने पुण्यातून रात्रीच निघायला लागणार होते. विमानतळावर सोडायला शक्यतो कोणी आले नाही तर बरे असते कारण ती निरोप घेण्याची वेळ अगदी नकोशी वाटत असते. आम्हाला बाय करवत नाही असे सांगून माझे आई-बाबा कधीच येत नाहीत.
अखेर तो क्षण आला. औक्षण करून, ओटी भरून, आता कायमचेच इकडे या असे सगळ्यांचेच पाणावलेले डोळे सांगत होते.
पुढचे दीड-दोन वर्षे पुरतील इतक्या गोड आठवणी घेऊन आम्ही जड पावलाने आणि जड मनाने विमानतळावर जायला निघालो.