प्रिय तू

प्रिय तू ,


आठवतं तुला मी म्हणलं होतं ,'तू जे म्हणशील तशीच वागीन मी' , पण त्याचा अर्थ तू असा घेशील असं कधी वाटलंच नव्हत मला. सुरुवात तशी खूप छान झाली आपल्या नात्याची. तुझी माझी ओळखच इतक्या नाट्यपूर्ण रितीने झाली होती...आठवतंय तुला? माझ्या १२ वी चा रिझल्ट होता त्यादिवशी  आरुष् बरोबर  आला होतास तू कॉलेजवर! त्यादिवशी खरं तर चुटपुटती ओळख झाली होती तुझी-माझी.मला आलेलं टेन्शन बघून म्हणाला होतास, "अगं १२ वी ची परीक्षा देणा-यांचं कौतुकच वाटतं बघ मला!! अगं आम्ही डिप्लोमा ला ऍडमिशन घेतली तीच मुळी १२ वी ला घाबरून!! एवढी परीक्षा दिलीस नेटाने आणि आता काय घाबरतेस? " रिझल्ट लागला माझं पुढचं कॉलेज सुरू झालं आणि त्याबरोबरच आपल्या भेटी गाठी पण. कधीतरी अगदी अचानक होणारी भेट, म्हणजे तू तासन् तास कॉलेज बाहेर उभा राहूनही अगदी नकळत घडली असं भासवणारी,कधी एखादी कॉफी of course आरुष् आणि आभा बरोबरची , कधी माझं सहज लांबच्या रस्त्याने क्लासला जाणं, तर कधी एकमेकांना उगीचच ब्लँक कॉल टाकणं. इतरांसमोर कबूल न करताही मनातनं मानलेलं एक अव्यक्त नातं दोघांच्याही नजरेत , वागण्या- बोलण्यात मिसळून गेलं होतं. किती सुरेख दिवस होते ते. थोडी थोडकी नाही चांगली ४ वर्ष. आता मी ही स्वप्न पाहत होते, नोकरी, लग्न.आपल्या नात्यानेही आता  समजूतदारपणा, प्रगल्भता धारण करायला सुरुवात केली होती आणि अचानक काय झालं कोणास ठाऊक , अगदी एखादा प्रसंग नाही सांगता येणार मला पण...तुझ्या नजरेतला संशय जाणवला मला.संशय?.आणि तोही आरुष् आणि माझ्याबद्दल? मला प्रथमच काहीतरी खटकलं.खरं तर तुझा संशय माझ्यासाठी नवीनं नव्हता, पण जशी नात्यातली नवी नव्हाळी संपून नात्याने समजूतदारपणा धारण करायला सुरुवात केली ,तसं तसं मला तुझं माझ्यावरचं लक्ष ठेवणं जाचक वाटायला लागलं.माझं कुठल्याही मित्राशी हसून-खेळून बोलणं तुला चुकीचं वाटायला लागलं. नात्याचं ओझं मला खांद्यावर, मनावर आणि आयुष्यावर जाणवायला लागलं.


तुझं कधीतरी अचानक फ्लॅट वर येणं, ऑफिस अवर्  मध्ये मुद्दाम मोबाईल असूनही मॅनेजर च्या केबिन मध्ये फोन करणं,  कधीतरी सकाळीच स्टेशन वर येऊन मी लेडीज डब्यातच चढते याची खात्री करणं तर कधी अचानक लंच टाइम मध्ये कँटिन ला येणं , त्रस्त त्रस्त करत होतं मला तुझं वागणं. मला तुझा विश्वास हवा होता आणि त्यासाठी मी अथक प्रयत्न करत होते , शक्यतो पुरुष मित्रांना टाळत होते. पण एक दिवस सगळं असह्य झालं मला आणि एक जाणीव झाली की तुला मी फक्त दिसायला चांगली म्हणून हवीय. तू कधीही माझ्या मनावर , विचारांवर प्रेम केलंच नाहीसं , प्रेम केलंस ते फक्त माझा दिसण्यावर आणि माझ्या त्याच सौंदर्याची भिती होती तुला.तू मला प्रेम आहे म्हणून भेटत नव्हतास, भेटत होतास ते फक्त मी तुझ्या हातातून निसटणार नाही ना, या भितीने. हे सगळं मला आणि माझ्याबरोबर इतरांनाही क्षणोक्षणी जाणवत होतं. कधीतरी जबाबदारीतून तुझीही सुटका करणं गरजेचं होतं आणि म्हणूनच मी हा निर्णय घेतला, अगदी पूर्ण विचार करून.कारण तू कितीही म्हणालास तरी स्वभाव बदलता येत नाही माणसाला, हे मला तुझ्या अनुभवावरुनच माहितिय. असंख्य चर्चा , भांडणं  यातुन किती दिवस फ़सवत राहणार आपण स्वतःलाच?


दोघांनीही हे ओझं सांभाळायच्या ऐवजी हे नातं इथंच संपवलं तर? आजपासून  नव्हे आत्ता ह्या क्षणापासून आपण एकमेकांना अनोळखी झालो तर? असं समजूया कधी भेटलोच नव्हतो एकमेकांना!! मला माहितिय, पुसून टाकू म्हणून पुसता येणार नाहीत ही ४ वर्ष, अरे कसंही असलं तरी प्रेम केलंय तुझ्यावर... पण खरं सांगू? मला नाही जमणार हे नातं असंच पुढे वागवायला.त्यापेक्षा मी जगीन पुन्हा त्या जुन्या क्षणांवरच !! पुढच्या आयुष्याची किंवा स्वतःला सावरेपर्यंतची ही पुंजी आहे हि माझी.


थांबते आता!! कळावे असं लिहीत नाही कारण आपण एकमेकांना भेटण्याची शक्यताच पुसून टाकलीय मी, हे घर, नोकरी आणि शहर सोडतांना.


तुझीच ,


मी.