तुमच्या हे लक्षात आलंय का
की समाजात यशस्वी लोकांचा
असा एक भलताच यशस्वी वर्ग असतो
शाळाकॉलेजातही त्यांचा
मित्रच येतो हमखास निवडून
सेक्रेटरीच्या निवडणुकीला
क्रिकेटच्याही फायनलला
त्यांचेच चौकार बसतात अचूक
समोरच्याच्या गुगलीला
त्यांच्याशीच बोलते आपणहून
श्रीमंत बापाची उन्मत्त कॉलेजक्वीन
हातखंडा प्रश्नच त्यांचे
येतात परीक्षेत नेमके ओळीने
नोकरीतही त्यांच्याच मुगुटावर
फुलतात यशाचे गोंडेदार तुरे
आणि चवीपुरताच विरोध होतो
त्यांच्याच आदर्श प्रेमविवाहाला
सोसायटीच्या कोपऱ्यावरचा प्लॉट
त्यांनाच मिळतो स्वस्तात ओळखीने
आणि सिमेंटचे दरही वाढतात दुपटीने
त्यांच्याच बंगल्याच्या वास्तुशांतीनंतर
तीन मुलांनंतर फॉर्म टिकवून असते
त्यांचीच अधिक यशस्वी बायको
बागेतल्या गुलाबाला त्यांच्या
सहज मिळून जाते एखादे बक्षीसही
त्यांच्याच गाडीतून डोकावतात बाहेर
भलेथोरले केसाळ अल्सेशियन
गमतीने घेतलेले त्यांचेच शेअर्स
अस्मानी होतात बघताबघता
कुरूप, भेसूर, बीभत्स जग सगळं
त्यांच्या नक्षीदार मख्मली पडद्यापलीकडे
अलीकडे बेत त्यांचे
सिंगापूर, बँकॉक, पटायाचे
स्वस्थ, शांत, तृप्त हे गुणीजन
प्रसवतात उद्याच्या अधिकाधिक गुलाबजामी पिढ्या
परवाच्या उत्तुंग यशोमान समाजाचे
आजचे यशस्वी प्रेषित म्हणून....