शेवटची हाक - ३

मी माझी नोकरी बदलली होती त्यामुळे राहायसाठी फ्लॅट शोधत होते ऑफीसच्या जवळच्याच भागात. खूप मुश्किलीने मला एक घर मिळालं. तिथे आसपास राहणारी मंडळी ही जास्तकरून मध्यमवर्गीय किंवा त्याखालच्या वर्गातलीच होती. प्रत्येकाला शेजारच्या घरातलं सगळं माहिती असायचं. कोण कधी जातं.. कोण कधी येतं.. कोण आजारी आहे.. तुला तर माहिती आहे की मला या सगळ्या गोष्टींचा किती जबरदस्त राग यायचा ते. म्हणूनच की काय सुरूवातीपासूनच मी आसपासच्या सर्वांशीच अगदी तुटकतुटक वागायचे.. त्यांच्यात असूनही नसल्यासारखीच म्हण ना. माझ्याच रूमसमोर एक वयस्कर जोडपं एकटंच राहायचं. ऑफीसला जाताना किंवा परत येताना त्या काकूंशी नेहमीच नजरानजर व्हायची. त्या माझ्याशी बोलण्यासाठी आणि मी त्यांना चुकवण्यासाठी मनापासून हरेक असे ते शक्य प्रयत्न करायचो.

एकदा मला अगदी जबरदस्त ताप आला होता. माझ्या रूमच्या बाहेर पडून राहिलेल्या दूधाच्या पिशव्यांवरून की वर्तमानपत्रावरून माहिती नाही पण त्या काकूंना कळलं की माझी तब्ब्येत खराब आहे आणि माझी परिस्थिती इतकी खराब आहे की बाहेर येऊन मी माझ्यासाठी आलेली दुधाची पिशवी आत घेऊन जाऊन तेच का होईना पण पिऊ शकेन. तेव्हा आठवडाभर त्यांनी अगदी माझ्या आईने घेतली असती अशी काळजी घेतली माझी. माझी तब्ब्येत ठीक झाली तरीही त्यांना जेव्हा संधी मिळेल तेव्हा त्या काही ना काही माझ्या खाण्यासाठी बनवून आणायच्या आणि माझ्याजवळ बसून गप्पा मारायला लागायच्या. त्यांचं एकंदर वागणंच इतकं प्रेमळ होतं की बस्स ! त्यांचं मला 'बाळ' म्हणून संबोधणंही मला खूप आवडायला लागलं होतं... पण परत तेच प्रश्न.. घरचे कुठे असतात?.. लग्न का नाही करत?.. मुलींचं असं एकट्याने राहणं बरं नाही.. बस्स.. मला त्यांचा हळूहळू राग यायला लागला. मी त्यांना बघून न बघितल्यासारखं करायला लागले. घरी आल्यावर दरवाजा बंद करून घ्यायला लागले आणि त्यांनी २-३दा हाका मारल्या तरी दरवाजा उघडायचे नाही.. ४थ्यांदा उघडला तर उघडायचे.

एक दिवस असंच रविवार होता. मी सकाळी मस्त आरामात बसून नेहमीप्रमाणे वर्तमानपत्र वाचत बसले होते. तेवढ्यात दरवाजावर ठकठक आणि पाठोपाठ काकूंची हाक. सकाळी-सकाळी डोक्याला नसती किटकिट नको बुवा म्हणून मी दरवाजाच उघडला नाही. काहीवेळा हाका मारून त्या निघून गेल्या आणि मीपण ती गोष्ट विसरून गेले.

संध्याकाळी मी कुठे बाहेर निघाले होते, तेव्हा आमच्या बिल्डींगच्या वॉचमनने मला पाहून विचारलं,"मॅडम, ते तुमच्याशेजारी राहतात त्या काकांची तब्ब्येत आता कशी आहे?"
"का? काय झालं त्यांना?" मी घाबरून विचारलं.
"अरेच्चा ! तुम्हाला नाही माहिती? सकाळीच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. खूप वाईट परिस्थितीत होते ते जेव्हा त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं. अगदी पाण्याविना मासा तळमळावा तसे तडफडत होते ते. असं वाटत होतं जसं काही शेवटचेच क्षण मोजत आहेत. माहिती नाही वाचले तरी असतील की नाही ते.. मला वाटलं तुम्ही त्यांच्या शेजारीच राहता तर तुम्हाला कदाचित माहिती असेल त्यांच्या तब्ब्येतीबद्दल.."
हे सगळं ऐकून तर जणू काही माझ्या पायाखालची जमीनच सरकली. ओह गॉड.. सकाळी कदाचित काकू माझी मदतच मागायला आल्या असाव्यात.. आणि मी दरवाजाच उघडला नाही. माझ्या या निष्ठूर वागण्यावर माझा अंतरात्मा मला दूषणे द्यायला लागला. इकडूनतिकडून चौकशी करून खूप मुश्कीलीने मला त्या हॉस्पिटलचा पत्ता मिळाला. मी तिथे धावतपळत पोहोचले तर खरी... पण पोहोचल्यावर कळालं की काकांचा मृत्यू झाला होता.. काकांच्या पार्थिवाशेजारी काकू अगदी असहाय्य आणि अगदी एकट्याच पडल्यासारख्या बसल्या होत्या. त्यावेळी काकूंनी मला ज्या नजरेनी पाहिलं ती नजर मी या जन्मी कध्धीच विसरू शकत नाही.

काकूंना हॉस्पिटलमधल्या फॉर्मॅलिटीज समजत नव्हत्या. मी ते सगळं बघितलं.. त्यांना काही मुलबाळ नव्हतं. कुठल्या नातेवाईकांना बोलवायला त्यांनी नकार दिला...म्हणाल्या,"जिवंतपणी कोणी विचारलं नाही मग आता त्यांच्या मृत्यूनंतर तरी कशाला कोणाचे उपकार घेऊ मी?" काकांचा अंतिमसंस्कार विद्युतदाहिनीत करवला गेला...

माझ्या हृदयावर केल्या गुन्ह्याचं ओझं वागवत मी त्यांच्यासोबत एक आठवडाभर राहिले आणि त्यांची काळजी घेतली. बोलताबोलता त्यांनी मला सांगितलं,"जेव्हा तुझ्या काकांना हृदयविकाराचा झटका आला तेव्हाच नेमका आमचा फोन खराब झालेला होता. मी तुझ्याकडे मदत मागायला आले होते. दरवाजा ठोठावला होता.. तुला हाकाही मारल्या होत्या. वाटलं होतं, तू तुझ्या कारमध्ये त्यांना हॉस्पिटलमध्ये पोहोचवू शकशील किंवा किमान फोन करून अंब्युलन्स तरी बोलावशील... पण माझं दुर्भाग्य बघ की तूही घरी नव्हतीस.. बाहेरून फोन करण्यात आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यात झालेल्या काही मिनटांच्या विलंबानेच त्यांचा जीव गेला. डोक्टर म्हणत होते की १० मिनिट जरी आधी आले असते तरी ते नक्कीच वाचले असते.. जाऊ दे.. नियतीचा खेळ आहे हा.. कोण वाचू शकलंय यातून.."

"मी त्यांना काय म्हणू शकत होते.. कसं सांगू शकणार होते की त्या निर्मम क्षणी मी घरीच होते पण माझ्या क्षणैक स्वार्थाने मी दरवाजा उघडला नाही आणि नाहूतपणे त्यांच्या सौभाग्याला मृत्यूच्या अक्राळविक्राळ जबड्यात ढकललं होतं..." अर्पिता धाय मोकलून रडत होती. तिची ही एकंदर कहाणी ऐकून मलाही गहिवरून आलं होतं.

"काय सांगू तुला नीलू, आजही माझ्या मनावर त्या गुन्ह्याचं ओझं मी वाहते आहे. काकू जेव्हापर्यंत या जगात होत्या तेव्हापर्यंत मला त्यांची सगळ्यात जवळची हितचिंतक मानत राहिल्या आणि मी... मीच त्यांचं सर्वस्व हिरावलं होतं त्यांच्यापासून.."

"असं नको बोलूस गं अर्पिता.. तुला काय माहिती होतं की त्या संकटात आहेत म्हणून.."

"याचंच तर दुःखं आहे ना नीलू.. संकट आधी सांगून थोडीच येतं.... जेव्हा त्या मला आपलं समजून माझ्याकडे मदत मागायला आल्या तेव्हा मी त्यांना माझ्यापर्यंत पोहोचायची संधीच दिली नाही.. त्या दिवसानंतर त्या कधीच माझ्या घरी आल्या नहईत.. माझ्या दरवाजावरची त्यांची ती शेवटची हाक आजही माझ्या कानात घुमते.. त्या हाकेने माझं सग्गळं आयुष्य पाऽऽर बदलवून टाकलं.. आयुष्याकडे बघण्याचा माझा दृष्टीकोनच पार बदलला. ज्या सामाजिक मूल्यांची मी खिल्ली उडवायचे, त्यांचाच गहिरा अर्थ उलगडून माझ्यासमोर आला होता जणू काही.. हळूहळू मी माझ्या आसपासच्या लोकांना सन्मानाच्या नजरेनी बघायला लागले आणि मग मला कळायला लागलं की एकमेकांच्या सुखदुःखात एकमेकांच्या उपयोगी पडून, दुसऱ्यांच्या कामात हातभार लावल्याने जीवनात किती आनंद प्राप्त होतो.."
"काहीशी त्याचवेळी माझी ओळख राजशी झाली. माझ्याच ऑफीसमध्ये नव्यानेच रुजू झालेला राज दिसायला ठीकठाकच पण उच्चविचार आणि दुसऱ्यांना मदत करणे वगैरेसारख्या त्याच्या गुणांमुळे मला तो खूपच आवडला. आम्ही जवळ येत गेलो आणि मग घरच्यांच्या संमतीने नवराबायको झालो. आज मी माझ्या संसारात आणि आजूबाजूच्या सर्वांमध्ये खूप खूप सुखी आहे.. पण त्या काकूंची ती शेवटची हाक आजही एका गळफासाप्रमाणे माझ्या मनाला जीवघेणी आवळत जाते, आणि काही केल्या मी त्यातून सुटका मिळवू शकत नाही." मी अर्पिताच्या हातावर सहानुभूतीने हात ठेवले.

३-४ दिवस कसे भुर्रकन् उडून गेले काही पत्ताच लागला नाही. आम्ही कित्ती मनसोक्त गप्पा मारल्या, कडूगोड अनुभव दिलेघेतले.... पण अर्पिताच्या मनाला डाचणारी ती 'शेवटची हाक' मी नाही घालवू शकले.


मूळ कथालेखिका - दीप्ति मित्तल
स्वैर अनुवाद - वेदश्री.