जर्मनी विरूध्द पोलंड - अखेरचा क्षण!!
संपूर्ण सामना भर जर्मनीचे अयशस्वी ऍटॅक आणि पोलंडचा गोलकीपर बोराक याचा उत्कृष्ट बचाव याने 'गोलप्रेमीं'साठी काहीसा निराशाजनक ठरलेला हा सामना शेवटच्या मिनीटाला रंग बदलतो, आणि जर्मनीचा बरूशिया गोल ठोकण्यात यशस्वी होतो. यजमान जर्मनीच्या या १-० अशा विजयामुळे स्टेडियम मधल्या जवळजवळ पन्नास हजारांहून अधिक प्रेक्षकांची निराशा एका क्षणात कुठल्या कुठे पळून जाते.
तरीही शेवटचा काही वेळ सोडल्यास या सामन्याबद्दलच्या अपेक्षा फोल ठरल्या.
फाऊल्स, अनेक अयशस्वी कॉर्नर्स, पाडापाडी, खेळाडू बदल यासगळ्या मध्ये दोन्ही संघांना चेंडू स्वतःकडे राखता आला नाही. एका क्षणाला चेंडू एका टोकाला तर दुसऱ्या क्षणाला दुसऱ्या.
या सामन्यामुळे ग्रुप ए मध्ये जर्मनीचा सलग दुसरा विजय झाला आहे. जर्मनीचे दुसरी फेरी (नॉक आउट राउंड) मधले स्थान निश्चित झाले नसले तरी पहिले स्थान राखता आले आहे.
विशेष उल्लेखनीय
८० व्या मिनीटाला जर्मनीने केलेले दोन लगातार ऍटॅक आणि पोलंड गोलकीपर ने दाखवलेले प्रसंगावधान.
शिवाय जर्मनीकडून ऍटॅक करणारा फिलीप लाम (मॅन ऑफ द मॅच)
अवांतर
'स्वदेश' खेळणार असल्यामुळे स्टेडीअम खचाखच भरलेले आणि भारलेले होते. प्रेक्षकांचा गोंगाट आणि रंगीबेरंगी चेहरे क्षणाक्षणाला सळसळत्या उत्साहाची साक्ष देत होते. हे एक छायाचित्र जर्मनीच्या 'वेड्या' फुटबॉल शौकीनांचे जणू प्रतीक-
सामना सुरू होण्यापूर्वी खेळाडूंच्या बरोबर त्यांच्याच रंगात ओळीने मैदानात येणारी ती छोटी मुले! किती सुंदर दिसते ते दृश्य! शिवाय, थोड्याच वेळात 'लढाई' असताना, इतक्या मेहनतीचे फळ देणारा क्षण जवळ आला असताना एकमेकांच्या खांद्याला खांदे लावून राष्ट्रगीत म्हणताना काय वाटत असेल खेळाडूंना !
खेळापुढे जगभरातल्या देशादेशांमधल्या सीमारेषा विरघळून नाहीशा होतात हेच खरे. खेळामुळे मन विशाल होते असे म्हणतात ते काही उगीच नाही. ज्याने कोणी अशा खेळाचा शोध लावला असेल त्याला कोटी कोटी प्रणाम !
--मेघदूत.