उचलेगिरी किंवा प्लेजरिज़म

उचलेगिरी किंवा प्लेजरिज़म



प्लेजरिज़म किंवा उचलेगिरी म्हणजे नक्की काय? कुठलेही श्रेय न देता साहित्याची  शब्दशः नक्कल करून आपल्या नावावर खपवणे हा ढोबळ अर्थ सर्वांना माहीत आहे. पण उचलेगिरीची व्याख्या अधिक व्यापक आहे.  आपल्या लिखाणात मूळ स्रोतास श्रेय न देता दुसऱ्या व्यक्तीच्या कल्पना किंवा अभिव्यक्ती वापरणे म्हणजे उचलेगिरी.

 थोडक्यात,  लिखाण किंवा व्यक्त केलेले विचार उसनवारीचे असूनही आपलेच आहेत अशी छाप सोडणे म्हणजे उचलेगिरी होय.ह्याचाच अर्थ दुसऱ्याच्या शब्दांचे सोपीकरण(पॅरफ़्रेज़िंग) करताना त्याचा उल्लेख न करणेखील उचलेगिरीस पात्र होऊ शकते. वाक्यविन्यासात(सिंटॅक्स) आणि शब्दांत लहानसहान बदल करून लेखन करणाराही उचलेगीरच.

कॉपीराइट हक्कांचे उल्लंघन आणि उचलेगिरी किंवा प्लेजरिज़म ह्यांत नेहमी गल्लत होते. हे दोन्ही  शब्द समानार्थी  नाहीत.  प्लेजरिज़म हा नैतिक मुद्दा आहे आणि उचलेगिरी करणे म्हणजे नैतिकतेचे उल्लंघन म्हणता येईल.

 कॉपीराइट हक्क घेऊन सुरक्षित केलेल्या साहित्याची उचलेगिरी  केल्यास मात्र ते कायद्याचेही उल्लंघन ठरेल. अर्थात, केशवसुतांच्या एखाद्या अपरिचित कवितेत थातुरमातुर बदल करून ती आपल्या नावे खपवल्यास ती उचलेगिरी आहे. पण केशवसुतांचे लेखन आता सार्वजनिक झाल्यामुळे कॉपीराइट हक्कांचे ते उल्लंघन ठरणार नाही. सार्वजनिक झालेल्या कुठल्याही लेखनाला कॉपीराइट कायद्याचे संरक्षण मिळत नाही.



आधार:

सटक्लिफ़, एँड्रिया जे. द न्यूयॉर्क पब्लिक लायब्ररी. रायटर्ज़ गाइड टू स्टाइल एँड यूसेज. हार्परकॉलिन्ज़ १९९९.

स्ट्राँग, विल्यम एस. द कॉपीराइट बुक: ए प्रॅक्टिकल गाइड. एमआयटी प्रेस १९९२.