हरवलेलेसे काही - भाग ४

तुझ्या भरवशाला पूर्ण करू शकलो नाही या अपराधी भावनेने मला जबरदस्त दुःखी करून सोडलं होतं. प्रत्येक क्षणी माझ्या मनात एकच विचार असायचा की मी तुझा भरोसा तोडला पीहू.. ! ज्या त्रासातून आणि वेदनांमधून तुला जावं लागलं असेल त्याचा विचारही करणं मला असह्य होत होतं. आजतागायत मी स्वतःला माफ नाही करू शकलो. कितीक वेळा मी देवाकडे प्रार्थना केली असेल माहीत नाही की मला एकदाच.. फक्त एकदाच पीहूशी भेटव ! तुला भेटू शकलो असतो तर म्हणू शकलो असतो की पीहू मला माफ कर ! मी खरंच भ्याड होतो.. जो काहीच करू शकलो नाही.. ना आपल्या प्रेमासाठी आणि ना तुझ्या विश्वासासाठी. जेव्हा मी पूर्ण मोडून गेलो तेव्हा एका रात्री मला कुठूनतरी तुझे शब्द ऐकू आले,"समीर, मी तर तुला नेहमीच एका चित्रकाराच्या रुपात पाहू इच्छिलंय.. माझं हे स्वप्न पूर्ण कर समीर.." आणि मग सकाळी मी उठलो ते तुझं स्वप्न पूर्ण करण्याचं ध्येय समोर ठेवूनच ! बस्स हाच आहे या मामुली चित्रकाराचा प्रवास.. पीहू !" इतकं बोलून तो शांत बसला. मी डोळ्यातले अश्रू पुसत,"इतकी मोठी शिक्षा का दिलीस समीर तू स्वतःला? का स्वतःबरोबर मलाही गुन्हेगार बनवून टाकलंस तू?"
समीर माझा हात पकडून,"माझी तुझ्याकडे काहीच तक्रार नाही पीहू. तो तर मी होतो जो चुकलो होतो, अपेक्षा पूर्ण करू शकलो नव्हतो.. जेव्हा माझ्या हे लक्षात आलं तेव्हा माझ्या हातातून वेळ निसटून गेली होती."
काही वेळाच्या शांततेनंतर," खूप बरं झालं तू भेटलीस. खूप इच्छा होती तुला भेटून माफी मागण्याची. तुला सांगायचं होतं की बघ पीहू मी तुझं स्वप्न पूर्ण करतोय.." तेव्हाच माझी ५ वर्षाची छोटी मुलगी,"आई आई.. " करत माझ्या गळ्यात पडली. मी समीरशी तिची ओळख करून देत म्हणाले,"समीर, ही आमची मुलगी, परी.."
परीला कडेवर उचलून घेत समीर म्हणाला," परी?"
"हो समीर.. परी.. तेच नाव जे तुला आपल्या मुलीचं ठेवायचं होतं. तुला तर नाही मिळवू शकले पण आमच्या मुलीचं नाव परी ठेवून तुझी आठवण नेहमी जवळ ठेवावी असं वाटलं म्हणून.."
यावर समीर हसला. दरवाजाची घंटी वाजली बघितलं तर नील होता. येताच म्हणाला,"समीर आला का?"
"हो.."
आत येताच समीरला म्हणाला,"माहिती आहे की तुम्हाला वाटत असेल की काहीही ओळखदेख नसताना मी तुम्हाला घरी जेवायला कसं काय बोलावलं. हो ना?" नीलच्या या बोलण्यावरून मी एकदम चमकून समीरकडे बघितलं. मग उत्सुकतेने नील काय म्हणतोय ते ऐकायची वाट पहायला लागले.
"काल जेव्हा मी तुमची चित्रं बघत होतो तेव्हा मला पीहूचंही एक चित्र तिथे दिसलं. ते पाहून मी अगदी आश्चर्यचकित झालो. तुमच्या सेक्रेटरीला जेव्हा मी ते चित्र विकत घेण्याबद्दल विचारलं तेव्हा तिने तुम्ही हे चित्र विकण्यासाठी नाही असे सांगितलं आहे असं म्हणाली. तिच्याकडून तुमच्या लग्न न करण्याच्या निर्णयाबद्दल, तुमच्या चांगली नोकरी सोडून देण्याबद्दल कळलं... मग वाटलं की याचा संबंध पीहूशीच तर नसेल? प्रेम मग ते कोणाचंही असो,सन्माननीयच असतं. जे काही तुम्ही तुमच्या प्रेमासाठी केलंत ते पाहता तर तुमच्या प्रेमाला तुम्ही खूप उंचीवर नेऊन पोहोचवलंय माझ्या नजरेत. जिच्यासाठी इतकं सगळं केलं जातं आहे तिला कल्पना तर यावी या सगळ्याची असं वाटलं आणि म्हणूनच मी तुम्हाला घरी बोलावलं. आशा करतो की तुम्हाला यात काही गैर वाटलं नसेल."
समीरने नीलचा हात पकडून म्हटलं,"तुम्ही विचारही नाही करू शकत नीलजी की तुम्ही आज माझ्यावर किती मोठे उपकार केलेत ते. आठ वर्ष मी माझ्या मनावर एक ओझं घेऊन जगत होतो.. ज्यापासून आज कुठे मला मुक्तता मिळाली आहे. हे सगळं तुमच्यामुळेच मिळालं आहे नीलजी ! जर पीहूची माफी नसतो मागू शकलो तर कदाचित सुखाने मरूही नसतो शकलो. नीलजी, कित्येकवेळा आपल्या असमजूतदारपणामुळे माणसाला कळतच नाही की त्याच्याकडे जे काही आहे ते किती अनमोल आहे.. हातातून निघून गेल्यावर कुठे कळतं की ते अनमोल होतं.. तुम्ही खरंच खूप नशिबवान आहात जे तुम्हाला पीहूसारखी बायको मिळाली आहे."
नील हसत मला जवळ घेत,"तो तर मी आहेच.. काय गं पीहू?" त्याच्या या बोलण्यावर आम्ही हसायला लागलो.
समीर म्हणाला,"चला आता मी निघतो. आजची संध्याकाळ आयुष्यभर एक गोड आठवण म्हणून राहील माझ्यासोबत." त्याला सोडायला मी आणि नील दरवाजापर्यंत गेलो. मी समीरला म्हणाले,"समीर, खूप झालं स्वतःला शिक्षा देणं आता, स्वतःसाठी एखादी झकास बायको शोध आता."
समीर हसत म्हणाला,"पीहू, तू नशीबवान आहेस म्हणून तुला नीलसारखा समजूतदार नवरा मिळाला आहे. जो सन्मान, जे प्रेम तुझा हक्क होता तो नील तुला देतो आहे.. पण जर माझी बायको आपल्या दोघांमधल्या भावनांना तोच सन्मान देऊ शकली नाही तर? मी एकटाच ठीक आहे... बस्स एकच इच्छा आहे.. पूर्ण करशील का?"
मी प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिले.
"एकदा.. फक्त एकदाच.. तू माझी चित्रं बघायला ये.. बघ की मी तुझं स्वप्न पूर्ण करू शकलो की नाही ते.. येशील ना पीहू?"
"येईन.. नक्की येईन समीर.." माझा होकार ऐकून समीरच्या चेहऱ्यावर एक प्रकारच्या तृप्तीचे भाव तरळून गेले. आम्ही दोघं दूर जाणाऱ्या समीरला पहात राहिलो. मी हळूच माझं डोकं नीलच्या खांद्यावर टेकवलं आणि नीलने मला हलकेच आपल्या कुशीत घेतलं.

मूळ कथा - खोया हुआ-सा कुछ
मूळ कथाकार - कृत्तिका केशरी
स्वैर अनुवाद - वेदश्री