सुनामी : ईश्वराचा कोप

सुनामीचे तांडव आपण सगळ्यांनी कुठल्या ना कुठल्या स्वरुपात पाहिले वा वाचले असेलच. मलाही ते बघून खूप वाईट वाटले. मी माझ्या परीने मदत करीनच. पण एक बातमी वाचण्यात आली की काही शंकराचार्यांचे भक्त असा दावा करत आहेत की जयललिताच्या सरकारने शंकराचार्याला अटक केली म्हणून देव रागावला आणि त्याने हा संहार घडवून आणला. असला माथेफिरु डोक्याचा देव असेल तर त्याला देव कशाला म्हणायचे? राक्षसच तो. नाहीतर त्या घटनेशी दुरान्वयाने संबंध नसणारे लाखो लोक का मेले? मेलेल्या निष्पाप बालकांचे काय? त्यांची काय चूक?



मागे १९३४ मधे बिहारमधे भूकंप होऊन अनेक लोक मेले आणि अनेक बेघर झाले तेव्हा मोहनदास करमचंद गांधीने असे विधान केले की हिंदू लोक अस्पृश्यता पाळतात म्हणून देवाने रागावून त्यांना ही शिक्षा दिली. तेही ह्याच जातकुळीतले विधान आहे.
ह्या घटना निसर्गनियमांप्रमाणे होतात. त्यांच्या अफाट ताकदीपुढे माणसाचे काही चालत नाही. ह्यात देवाचा काहीही संबंध नाही असे मला वाटते.



ता.क.  मी काही केऑस थिअरीचा उपासक नाही म्हणून जातिभेद मानणे वा धार्मिक नेत्याला छळणे ह्यामुळे भूकंप होत नाहीत असे मी मानतो. पण सदर दोन घटनांमुळेच भूकंप घडले असे कुणी केऑसपंथियाने समजावले तर मला ते समजून घ्यायला आवडेल. असो.