होते कुरूप वेडे - (अंतिम भाग)

परंतु यामुळे गावात एक वेगळीच समस्या निर्माण झाली...(पुढे चालू)


तो प्रामाणिक माणूस इतर कोणाचेही घर न लुटता स्वतःचे घर मात्र लुटू देत होता. त्यामुळे दररोज पहाटे गावात एक माणूस असा असे की जो इतर कोणाचे घर लुटून घरी परते तेंव्हा आपले घर लुटले गेलेले नाही असे त्याला दिसून येई. हे घर खरेतर त्या प्रामाणिक माणसाने लुटणे अपेक्षित होते आणि आपले हे 'काम' त्याने केलेले नसे. अशा तऱ्हेने ज्यांचे घर लुटले जात नव्हते ते इतरांपेक्षा अधिक श्रीमंत झाले. आता इतरांपेक्षा अधिक पैसा जमा झाल्याने त्यांना इतरांचे घर लुटण्यासाठी जाण्याची गरज वाटेनाशी झाली. तसेच या परिस्थितीचा आणखी एक परिणाम म्हणजे जे लोक त्या प्रामाणिक माणसाचे घर लुटण्यास येत, त्यांना तिथे लुटण्यासारखे काहीच मिळत नसे. त्यामुळे त्या रात्री त्यांना हात हलवित परत जावे लागे. त्यामुळे असे लोक इतरांपेक्षा अधिक गरीब झाले.


दरम्यान जे अधिक श्रीमंत झाले होते त्यापैकी काहीना रात्री पुलावर फिरायला जाणे हे प्रतिष्ठेचे वाटू लागले. त्यांनीही मग रात्री पुलावर जाऊन चांदण्यातील नदीचा प्रवाह न्याहाळत बसायला सुरवात केली. यामुळे तर गोंधळात अधिकच भर पडली. पुलावर जाऊन बसणाऱ्यांची घरे वारंवार लुटली गेल्यामुळे आणखी काही लोक श्रीमंत झाले, तसेच उरलेले श्रीमंत अधिक श्रीमंत झाले. याचा परिणाम असा झाला की आणखी काही लोक गरीब झाले. पण अजूनही ते सर्व चोर होते आणि एकमेकाना लुटत होते.


आता आणखी श्रीमंत झालेल्यांनाही पुलावर फिरायला जावेसे वाटू लागले. पण त्यांच्या हे ही लक्षात आले की जर आपण तसे केले तर आपणही गरीब होऊ. त्यावर त्यांनी एक तोडगा शोधून काढला. आधीच गरीब झालेल्या काही जणांना त्यांनी आपल्यासाठी लुटण्यास पाठवायला सुरवात केली. त्यासाठी त्या गरीबांना त्यांनी वेतन, भत्ता इ. देऊ केले. आता ते निश्चिंतपणे पुलावर फिरायला जाऊ लागले. यामुळे श्रीमंत अधिक श्रीमंत झाले आणि गरीब अधिक गरीब. पण अजूनही ते सर्व चोरच होते आणि एकमेकाना लुटत होते.


असेच काही दिवस गेल्यानंतर काही श्रीमंत इतके श्रीमंत झाले की त्यांना स्वतः लुटायला जाण्याची वा इतरांना त्यासाठी पाठवण्याची गरजच उरली नाही. पण जर त्यांनी इतरांना लुटणे थांबवले तर ते स्वतः गरीब होण्याचा धोका होता. कारण ते इतरांना लुटणार नसले ती इतर लोक त्यांना लुटणारच होते. हे टाळण्यासाठी त्यांनी एक नामी उपाय शोधून काढला. काही अगदी गरीब लोकाना शोधून काढून त्यानी आपल्या घराची निगराणी करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविली. याची परिणती पोलिस यंत्रणा निर्माण करण्यात आणि तुरुंग बांधण्यात झाली.


अशा तऱ्हेने तो प्रामाणिक माणूस त्या गावात आल्यानंतर काही वर्षातच लोक लुटण्याचे वा लुटले जाण्याचे नाव काढेनासे झाले. आता ते फक्त श्रीमंती आणि गरीबीबद्दल बोलत. पण अजूनही ते सर्व चोरच होते.


त्या प्रामाणिक माणसाचे प्राण मात्र उपासमारीने पूर्वीच लुटून नेले होते.


(समाप्त)