चित्रपटगृहातील दोन तास

चाळीसएक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे.मी मे महिन्याच्या सुट्टीत बोईसरला माझ्या आतेच्या घरी रहायला गेले होते. तिचं खूप मोठं कुटुंब होतं.तीन भावांच्या तीन तीन पिढ्या एका छताखाली नांदत होत्या. घरातलीच माणसं २५-३०. त्यात सुट्टीच्या दिवसात माहेरवाशिणींच्या भरीला सुनांच्या माहेरची माणसंही यायची.माणसंच माणसं चहुकडे अशी परिस्थिती असायची. घरची आणि पाहुणी मिळून माझ्या वयाची १०-१२ मुलं होती. लगोरी, आटापाट्या, सागरगोटे, पत्ते यात दिवस मजेत जायचा. रात्री अंगणात शिळोप्याच्या गप्पा आणि गाण्याच्या भेंड्या रंगायच्या. एके दिवशी तात्यांनी म्हणजे आतेच्या सासऱ्यांनी सुनांना
      सांगितलं, "आज रात्री मुलांना लवकर जेवायला वाढून सिनेमाला पाठवा."
       त्या वेळी बोईसरमध्ये पक्कं चित्रपटगृह नव्हतं. घराच्या पाठीमागे खूप मोकळी जागा होती. तिथे बांबू आणि पडद्यांच्या सहाय्याने  एक तात्पुरतं थिएटर उभं केलं होतं. त्याला टूरिंग थिएटर म्हणत. वर छप्पर नसल्यामुळे पूर्ण काळोख झाल्याशिवाय सिनेमा सुरु करता येत नसे. त्यामुळे एका रात्री एकच खेळ आणि दर आठवड्याला नवा सिनेमा असा प्रघात होता. आम्ही थिएटरमध्ये गेलो. पडद्यापासून सुमारे ७-८ फुटांवर जाजमं अंथरली होती त्यावर १५-२० वारली जमातीचे लोक सिनेमाच्या प्रतिक्षेत बसले होते. हा लोअर स्टॉल. आणखी ४-५ फुटांवर वेगवेगळ्या प्रकारच्या १५-१६ खुर्च्या ठेवल्या होत्या. उंच सखल जमिनीमुळे कललेल्या खुर्च्यांवर बसून सिनेमा बघणं म्हणजे दिव्यच होतं.आम्ही अप्पर स्टॉलवर स्थानापन्न झालो.
      'बहुरानी' सुरु झाला.आम्ही गेलो तो त्या सिनेमाचा शेवटचा दिवस होता. आमच्या कंपूतल्या मुलांनी कोटावर (घरामागच्या कंपाउंडची भिंत) बसून आदल्या सहा रात्री तो सिनेमा बघितला होता. त्यामुळे त्यांना जवळ जवळ पुरा सिनेमा पाठ होता. त्यांच्यातला एक मुलगा टग्या होता. (आपला टग्या नाही हो. हा दुसरा.) उत्तम नकलाकार होता. त्याने पडद्यावरच्या पात्रांचे संवाद त्यांच्या अगोदरच म्हणायला सुरवात केली. तेही साभिनय.म्हणजे हा जे काही आणि जसं काही बोलायचा त्याचं पडद्यावरची पात्रं अनुकरण करायची. आम्हाला या प्रकाराची खूप मजा वाटली. आमच्या प्रतिसादाने टग्या आणखिनच चेकाळला. सुरवातीला तात्यांचे पाहुणे म्हणून मॅनेजरने आमच्याकडे कानाडोळा केला. पण दंगा जसा वाढला तसा लोअर स्टॉलमधून निषेध व्यक्त होऊ लागला. मग मॅनेजरने आम्हाला थोपवण्याचा मुळमुळीत प्रयत्न केला. पण तोपर्यंत परिस्थिती हाताबाहेर गेली होती.
      मला पिक्चर नीटसा आठवत नाही पण त्यात एक सिन असा होता की मंदबुद्धीच्या गुरुदत्तला त्याचा सावत्र भाऊ फिरोझखान चाबकाने फटकावतो. हे बघून गुरुदत्तची बायको माला सिन्हा फिरोझखानला त्याच्याच चाबकाने फटकावते. या सिनच्या वेळी तर क्लायमॅक्सच झाला. गुरुदत्तला फिरोझखानने फटकावून झालेलं आहे. माला सिन्हाचा प्रवेश झाला आहे. ती क्षणभर रागाने बघत उभी आहे. अशावेळी टग्या ओरडतो,"बघत काय राहीलीस? खोच तो पदर." माला सिन्हा पदर खोचते. टग्या म्हणतो,"उचल तो चाबूक." ती चाबूक उचलते.टग्या म्हणतो,"लगाव फटके" ती लगावते. टग्या मोजतोय,"एक, दोन, तीन" आमची हसून हसून मुरकुंडी वळली.एकजण तर हसता हसता कलत्या खुर्चीसकट जमिनीवर आली त्यामुळे गोंधळात अधिकच भर पडली.
      आता लोअर स्टॉलच्या सहनशक्तीचा अंत झाला.  मॅनेजरला घेराव घालून ते तिकिटाचे पैसे परत मागू लागले. त्याने गोंधळून जाऊन सिनेमा दाखवायचंच बंद केलं. आम्ही काहीतरी दिव्य भव्य केल्याच्या धुंदीत घरी परतलो.
      दुसरे दिवशी सकाळी हँग ओव्हर होताच. टग्या तर हिरोच्या थाटातच वावरत होता. चहा घेत असतांना तात्यांचा 'बुलावा' आला. अर्धी नशा खाडकन उतरली. भिजल्या मांजरींसारखे आम्ही सगळे तात्यांच्या समोर उभे होतो.मॅनेजरने तात्यांकडे आमची तक्रार केली होती. तात्या म्हणाले,"सिनेमाला जाऊन जो गोंधळ घातलात ते तुम्हाला शोभलं का? चांगल्या घरची मुलं ना तुम्ही? आपल्यापासून दुसऱ्याला त्रास होऊ नये याची खबरदारी घ्यायचं भान राहू नये तुम्हाला? गरीबांच्या आनंदावर विरजण घातलंत तुम्ही. पुन्हा असं होऊ देऊ  नका. " तात्यांचा दम ऐकून उरली सुरली नशा सुद्धा उतरली पण 'आपल्यापासून दुसऱ्याला त्रास होऊ न देण्याची खबरदारी घेण्याचा तात्यांचा उपदेश मात्र माझ्या कायम स्मरणात राहीला.


                                                         वैशाली विलास