कहाणी शुक्रवारची, देवीची ( धार्मिक कथा )

मित्रहो, ओळखा पाहू-


अशी कोणती गोष्ट आहे,


जी खूप पुरातन आहे,


जी खूप महान आहे,


जिच्यावर नेहमी आक्रमण होत असते,


जी नेहमी धोक्यात असते,


जिचे पुढील पिढीसाठी आपण जतन केले पाहिजे,


जिच्या नावाने अनेक बऱ्या-वाईट गोष्टी आपण खपवून नेतो,


बरोब्बर !! ( मग हुशारच आहे आमचे मनोगती !) तर ती गोष्ट म्हणजे आपली महान भारतीय संस्कृती ! तर ही कथा अर्पण आहे स्कॉलर , डॉलर ते व्हाईट कॉलर असा यशस्वी प्रवास करुन परदेशी स्थायिक होऊनही आपली संस्कृती जपणाऱ्या भारतीयांना. परदेशातही आपली संस्कृती जपण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना प्रणाम  घरातून अंगणातील तुळशीवृंदावनातील कोनाड्यापर्यंत तेवता दिवा घेऊन जाताना वाऱ्याने तो विझू नये म्हणून धडपडताना जी आपली, आपल्या मनाची अवस्था होते तीच अवस्था या परदेशीय भारतीयांची आपली संस्कृती पुढील पिढीच्या हाती देताना होते. पिढ्यान पिढ्या चालत आलेल्या या गरीबी श्रीमंतीतील सनातन भेद सांगणाऱ्या या कहाणीत मी नवे ते काय सांगणार,  पण नव्या पिढीला ही कहाणी व्यवस्थित, नीट कळावी म्हणून तपशीलात 'थोडेसे' बदल करून त्यांना त्यांच्या 'समजेल अशा भाषेत' सांगण्याचा हा  अल्पसा प्रयत्न.......


.................................................................


 देशपांडे काकूः अहो ऐकलत का गुरुजी निघालेत!


देशपांडे काकाः  अहो नारायणराव थांबा जाऊ नका आलोच; ( बाहेर येतात) अहो आमच्या आनंदाची पोरं आलीत अमे रकेहून जरा त्यांच्याही कानावर पडू द्या देवाधर्माच्या चार गोष्टी. थांबा बोलावतो अरे मॅक, अँड्रा या रे इकडे !


नारायणरावः  हे काय भलतेच आहो मकरंद आणि आर्द्रा आहेत ना त्यांची नावे. मग हे काय ?


देशपांडे काकाः आम्ही नाही हो त्यांच्या तिकडच्या मित्रांनीच केलेय हे सारे.


नारायणरावः बरं, बरं ! ही पुढची पिढी म्हणजे एकदम स्मार्ट आणि चुणचुणीत आहे बरं का. बरं मुलांनो मी आज तुम्हाला चातुर्मासातील 'शुक्रवारची कहाणी' सांगणार आहे. ऐका आणि अर्थ समजावून घ्या.


मॅकः ओके अंकल !


नारायणरावः अरे चातुर्मासात तरी गुरुजी म्हणा की अंsकल काय ? बरं ते जाऊ दे! तर,


एक आटपाट नगर होते. तिथे एक दरिद्री ब्राम्हण ( परिस्थितीने, वृत्तीने नव्हे !) रहात असे.


 मॅकः  ऍटपोस्ट नगर म्हणजे ? चुणचुणीत लोकांना शंका फार. 


नारायणरावः ऍटपोस्ट नाही आटपाट आणि त्याचा अर्थ मलाही माहीत नाही, आणि नगर म्हणजे बिग सिटी! हे बघा मुलांनो  या कहाण्या निमुटपणे ऐकायच्या असतात. का ? कसे ?? वैगरे प्रश्न विचारण्याची प्रथा नाही आणि उत्तरे देण्याची तर त्याहून नाही. सो नो मोअर क्वश्चन्स, जस्ट लिसन ! अँड बिलिव्ह मी इट वर्कस. ओके ?


तर एक आटपाट नगर होते. तिथे एक दरिद्री ब्राम्हण रहात असे. तो दारिद्र्याने पिडला होता. त्याची बायको एकदा शेजारणीच्या घरी बसायला गेली. आपले गरिबीचे गाणे गायली. शेजारणीने तिला 'चातुर्मास डॉट कॉम' येथून डाऊनलोड केलेले 'शुक्रवारचे व्रत' सांगितले.  ती म्हणाली बाई, बाई शुक्रवारचे व्रत तू श्रावणापासून धर सारा दिवस उपवास करावा, संध्याकाळी सवाष्णीला बोलवावं, तिचे पाय धुवावे, तिला हळद कुंकू द्याव,तिची ओटी भरावी, साखर घालून दूध द्यावं  भाजलेल्या हरभऱ्याची खिरापत द्यावी नंतर आपण जेवाव. या प्रमाणे हे व्रत तू कर. ही घरी आली, देवाची प्रार्थना केली व शुक्रवारचे व्रत करू लागली.


    त्याच गावात तिचा भाऊ रहात असे. तो मोठा राजकारणी व श्रीमंत होता. एकदा त्याने 'सामुदायिक विवाह सोहळयाचे' आयोजन केले व साऱ्या गावाला सहस्त्रभोजनाला बोलावले पण बहीणीला बोलावले नाही कारण ती गरीब. तिला बोलवल तर लोक हसतील. बहीणीने विचार केला भाऊ सहस्त्रभोजन घालतो आहे. कामाच्या टेंशनमुळे विसरला असेल. पण आपण जेवायला गेल्यामुळे या सामाजिक कार्याला पाठिंबा दिल्यासारखेच होईल. असा विचार केला व मुलांना घेऊन ती कार्यालयात पोहचली व बुफेच्या रांगेत जाऊन जेवू लागली. भावाने बहीणीला पाहीले व तो म्हणाला ' ताई ताई, तुला डिझायर्न्स ड्रेस नाही, दाग नाही दागिना नाही. गाडी नाही बंगला नाही. तुझ्यामुळे माझी इमेज खराब होते. आज आलीत ते आलीस उद्या येऊ नकोस. बहीण हिरमुसली मुलांना घेऊन परतली.


     दुसऱ्या दिवशीही मुले म्हणाली आई मामाकडे जेवायला चल. बहिणीने विचार केला काय झाले शेवटी भाऊच तर आहे काय मनावर घ्यायचे ? भावाने बहिणीला मुलांसह पाहीले व तो म्हणाला, ' एकदा सांगून कळत नाही का ? उद्या आलीस तर हात धरुन घालवून देईन.


  तिसऱ्या दिवशीही मुलांनी हट्ट केला. आता बहीणीलाही या प्रकाराची सवयच झाली होती. तिने विचार केला काय हरकत आहे जायला आणि जरा बाजूला उभे राहीले की कोणाला कळणार ही नाही. नाही तरी बरेच लोक असे करतातच की. ती मुलांना घेऊन गेली व जेवू लागली. तिसऱ्या दिवशीही बहिणीने केलेली हद्द आणि हॅट्रीक पाहून भाऊ चिडला व त्याने बहीणीला हात धरून घालवून दिले.  सारा दिवस उपास घडला. देवीला तिची दया आली. दिवसानुदिवस सुखाचे दाखवू लागली. बहिणीची दोन्ही मुले सॉफ्टवेअर इंजिनिअर्स झाली. अमेरिकेतील 'वाळूच्या दरीत' जाऊन खोऱ्याने पैसा ओढू लागली. आणि एके दिवशी चक्क भारतात परत येऊन नोकरी करुन आई बरोबर राहू लागली. बहीणीने उद्यापनाचे ठरविले व भावाला जेवायला बोलावले. परंतु भावाने आधी माझ्याकडे जेवायला आलीस तरच येईन अशी अट घातली.बहिणीने जाण्याचे कबूल केले. भावाचे मन ओळखले.


   आज भाऊ शुक्रवारच्या संध्याकाळी म्हणजे विकएंडच्या सुरुवातीला बहिणीची वाट पाहू लागला. नव्या कोऱ्या होंडा सिटीतून बहिण व तिची मुले मोठी बॅग घेऊन उतरली.  बहीण दोन दिवस रहायला आली हे पाहून भाऊ आनंदला. त्याने जेवणाची तयारी केली.


     संपूर्ण पान भर लाडु, जिलबी, पेढे, पुरणपोळी, गुलाबजाम  सारे काही होते. बहिणीने पानाला नमस्कार केला व मुलांकडे पाहीले.  मुलाने 'उद्याला स्पर्श' करणाऱ्या सुप्रसिद्ध कंपनीचा ' नशिबा'चा लॅपटॉप टेबलावर ठेवला. मुलांनी आपली सुप्रसिध्द, आई. ग. आई. ग. आई आणि ह. स. ब. स. ब्यांकांची सोनेरी- चंदेरी क्रेडिट कार्डस व जिथे जेथे फक्त परदेशी पेय चालते त्या ' देशी क्लबची' कार्डस टेबलावर मांडून ठेवली. बहीणीने आपल्या गळ्यातील 'क' नावाच्या मालिकांतील स्त्रियांच्या वा क्वचित पोळ्याला बैंलाच्या गळ्यात असते तसे मोठे सोन्याचे पेंडॉल काढुन टेबलावर  ठेवले. भावाला वाटले जड वाटत असेल. बहीणीने गुलाबजाम घेतला  लॅपटॉपवर ठेवला. पेढे घेतले व एक एक असे कार्डांवर ठेवले. जिलबीचा तुकडा दागिन्यावर ठेवला. लाडु घेऊन बहीण बाहेर गेली. आश्चर्यचकित भाऊ धावतच मागे गेला. बहिणीने लाडु कारच्या बोनेटवर ठेवला आता मात्र न रहा वन भावाने विचारले ताई हे तू काय करते आहेस ? ताई म्हणाली ' दादा मी बरोबर कर त आहे जिला तू जेवायला बोलावले तिला जेवू घालत आहे. भाऊ म्हणाला ताई तू तरी जेव. ' ताई म्हणाली माझे जेवण मी त्या दिवशी सामुदायिक विवाहाच्या बुफेमध्येच जेवले. याच सिटीतून तू मला अपमान करून हाकलून दिलेस आणि आज होंडा-सिटीतून आले म्हणून माझा मान ठेवतोस ? भावाला फार वाईट वाटले त्याने बहीणीची क्षमा मागितली. बहीणीनेही त्याला क्षमा केले. बहिणीच्या मुलांनी मामाच्या मुलाला' चला पाहूया सी ' हे पुस्तक भेट दिले. भाऊ बहिणीकडे जेवायला गेला. दोघांनी देवीचे आभार मानले.  तेव्हा ( वाळूच्या दरीतील ) मराठी जनहो, ऊतू नका मातू नका घेतला ( आय. टी. चा ) वसा टाकू नका. साठा उत्तराची कहाणी पांचां उत्तरी सुफळ संप्रूण ( संपूर्ण ).


आर्द्राः वॉsव  किती छान मॉरल आहे या स्टोरिचं. आम्हाला सिनसिनाटीला अशा स्टोरिज कुणीच सांगत नाही.


 नारायणरावः  अरे मुलांनो तिकडे सनसनाटी स्टोरिज अस तात आपल्या सारख्या कहाण्या नाही. बरं असो. निघतो आता.


देशपांडे काकाः  नारायणराव, ' अन्नासाठी दाही दिशा आम्हा फिरविसी जगदीशा' म्हणत म्हणत आपण सारे आयुष्य एकाच जागी काढले आणि आपली पिल्ले मात्र काही न म्हणता गेली की हो दशदिशांना. आनंदा निघेल परवा.


नारायणरावः  अहो अण्णा, कालाय तस्मै नमः म्हणायचे आणि पुढे जायचे.


देशपांडे काकाः खरयं, बरं कमॉन बॉइज टच अंकल्स फिट, म्हणजे गुरुजींच्या पाया पडा.


नारायणरावः अरे असू द्या असू द्या. गुणी आहेत हा अण्णा आपली पोरे जगात देशाचे नाव काढतील. अरे बाळांनो जगाच्या पाठीवर कुठेही असा सुखी रहा. आपल्या मातीची आठवण ठेवा  म्हणजे झाले. चला येतो  वहीनी;


सारे जणः अच्छा !


                             (धार्मिक) अभिजित पापळकर