कुठे तिचा देह चंदनाचा कुठे तिचे ओठ केशराचे

कुठे तिचा देह चंदनाचा कुठे तिचे ओठ केशराचे
उडून जाती तुला बघोनी असे कसे रंग अंबराचे?


सुगंध प्रत्येक भेटण्याचा जपून मी ठेवला मनाशी
असेच का हे तयार झाले खिशातले बोट अत्तराचे


म्हणून संसार आमचाही म्हणायला नेटकाच झाला
फिरून आलो कुठे तरीही खुले असे दार ह्या घराचे


निमूट नांदावया घरी ती कुणीतरी घरगडी हवा ना?
म्हणून करतो धुणी व भांडी करून काळीज पत्थराचे


क्वचित् कधी बायकोच दिसते खुशाल साक्षात मत्स्यगंधा
खिशात पैसा नसेल तेंव्हा घरात आभास सागराचे


हिच्यासवे राहतो जरी मी तिला कधी सोडलेच नाही
हिच्यात मी रुद्ररूप बघतो तिच्यात माधुर्य ईश्वराचे


तिच्या नि माझ्या क्षणाक्षणाची कशास सांगू हिला कहाणी?
कसे कळावे महत्त्व ह्या क्षुद्र वर्तुळाला समांतराचे?


- माफी


चित्त ह्यांच्या कधी तुझा देह चंदनाचा, कधी तुझे ओठ केशराचे! वर आधारित