वाचावे ते नवलच -४- प्रिन्सच्या निमित्ताने

रविवारी संध्याकाळी टी.व्ही. चॅनेल्स व सोमवारची वर्तमानपत्रे प्रिन्समय झाली होती. त्या गोजिरवाण्या व हिंमतीच्या बालकाच्या नाट्यमय यशस्वी मुक्ततेच्या गौरवगाथा पाहून व वाचून सर्वांची मने आनंदाने उचंबळून येत होती. ही आनंदाची बातमी एकमेकांना, बहुधा एकमेकींना, सांगून सर्वांना तोंडपाठ झाली असणार.
विज्ञानाच्या जगांत वावरलेल्या माझ्यासारख्यांची मात्र थोडी पंचाईत झाली. एका प्रमुख इंग्रजी पेपरात त्या विवराची रुंदी दोन जागी ९ इंच देऊन चित्रांत दीड फूट दाखवली होती तर एका जागी तीन फुटाच्या शाफ्टचा उल्लेख होता. त्याच्याच भावंडाने १६ इंच रुंदी दिली होती. एका मराठी वृत्तपत्रात मुख्य बातमीत दीड फूट रुंदी देऊन आतल्या बाजूला १६ इंच व्यास असे वर्णन केले होते, फक्त तेच बहुधा बरोबर असावे. दशमान पध्दतीचा स्वीकार करून पन्नास वर्षे होऊनसुध्दा इंच फूट शिल्लकच आहेत. कुठल्याही चित्रातील वेगवेगळी अंतरे प्रमाणशीर नव्हती. तीन साडेतीन फूट उंचीचा मुलगा एवढ्याशा जागेत चित्रात दाखवल्याप्रमाणे पाय पसरून बसलेला असणे शक्य वाटत वाही. मुख्य बातमी ठळकपणे देतांना तपशीलात घाईघाईत बारीकसारीक चुका होणे क्षम्य अमेलही. पण सुशिक्षित वार्ताहरांनी निदान मोजमापे व्यवस्थितपणे द्यायला नकोत कां? विज्ञानाचे प्राथमिक शिक्षण व्यवसायात सुध्दा उपयोगात आणावयाचे असते ना ?
इतर कांही बोलक्या बातम्याः
या वृत्ताला अमाप प्रसिध्दी मिळाली. पण त्या मुलाला या काळात नेमक्या कसल्या दुखापती झाल्या आहेत याबद्दल अवाक्षर नाही. लहानग्या प्रिन्सवर लक्षावधी रुपयांच्या देणग्यांची खैरात झाली. त्याच्या सुखरूप सुटकेकाठी भारतभर सर्व धर्मीयांनी सार्वजनिक प्रार्थना केल्या, कोणी कोणी अन्नपाणी वर्ज्य केले, कितीक लोकांनी त्याच्या वाढदिवसासाठी केक बनवले. त्याच्या भवितव्यावर कोट्यवधी रुपयांचा जुगार खेळला गेला. एका प्रसिध्दी अधिका-याची बदली करण्यात आली. वगैरे...


 यावर भाष्य करायला हवे कां?