शांघाई की अंगडाई - भाग २

ह्या वेळेचा माझा प्रवास जरा सोपा होता. अशीया / औस्ट्रेलिया मधून आलेल्या चार टाळक्यांना दिवसभर बसून काही नवीन करामती तेवढ्या शिकवायच्या. बाकी संध्याकाळी काही होमवर्क नाही, अवघड निर्णय घेणे नाही कि रात्रीच्या जेवणाला भेटून कोणाशी रस्सीखेच करणं नाही. त्यातून एवढे जण एकत्र जमल्यामुळे दररोज संध्याकाळी कुठेतरी मजा करायला जाणे आलेच. आमचे शांघाईतले यजमान खूप उत्साहात होते - एक दिवस सर्वांना घेऊन तर एक दिवस फ़क्त मला घेऊन त्यांनी शांघाई दाखवण्याचं मनावरच घेतलं होतं.


दुसऱ्या दिवशी आम्ही अस्सल चीनी जेवण जेवायला शांघाईच्या आतल्या गोटात गेलो. हा शांघाईचा मध्यभाग म्हणे, एकेकाळचं ग्रामदैवत – आता कम्युनिस्ट असल्या मुळे कोणी देऊळ म्हणत नव्हतं, नुस्तं त्या जागेच्या नावाने सम्बोधत होतं – "चुंग हांव म्याओ". तो भाग म्हणजे पुण्याच्या तुळशीबागेसदृश पण बराच जास्त वीस्तीर्ण होता. आजुबाजुला तुळशीबागेप्रमाणेच छोट्यामोठ्या दुकानांची गर्दी होती. दुकानेही तुळशीबागेसारखीच बायकांना रुचतील अशा कपड्यालत्त्याची नाहीतर दागिन्यांची होती, शिवाय अनेक दुकानं घरगुती शोभेच्या वस्तूंची पण होती. पण तुळशीबागेशी साम्य इथेच संपलं. पायाखालचे सगळे रस्ते cobbled होते – म्हणजे दगडांच्या छोट्या ठोकळ्यांना एकमेकांत घट्ट बसवून तयार केले होते (ह्याला मराठीत काय म्हणतात?). आणि तोच मांस – मच्छीचा वास येऊनसुद्धा स्वच्छं होते. सर्व इमारती बैठ्या दोन मजली होत्या आणि त्यांच्या कौलांना एक विशिष्ठ चीनी लकब होती. कौलं संपतात तिथे छपरांच्या कोपऱ्यांवर एक वैशिष्ठ्यपूर्ण आकाशाकडे रोखलेलं बांकदार लाकडाचं शिंग होतं. सर्व इमारतींना पॉलिश केलेल्या लाकडाची तावदानं असलेल्या खिडक्या होत्या. इमारतींचा रंग नवीन होता तरी नागमोडी रस्त्यांना लागुन जवळ जवळ गर्दि करुन बांधलेल्या त्या इमारती जुन्या चिनी चित्रपटात खपतील इतक्या अस्सल दिसत होत्या. रात्र पडत होती, आमच्यासारखे पर्यटक, चिनी दुकानदार, खरेदी करण्यांत मग्न असलेले लोकं ह्या सगळ्यांची संख्या वाढत होती आणि रात्रीला रंग चढत होता. चीन मध्ये सर्वत्र पाहिलेला एक वेडा आणि थोडासा बालिश जोष इथे तर अधिकच जाणवत होता.


आम्ही इकडे तिकडे फ़िरुन एका कमळ तलांवावर बांधलेल्या रेखीव नागमोडी पुलावरुन अखेर आमच्या जेवणाच्या ठिकाणी पोहोचलो. अगोदर सूचना दिल्यामुळे आमचं एक मस्तं मोठं गोल टेबल मांडलेलं होतं. आजुबाजूला चिनी कारिगरी असलेले लाकडाची सुंदर चित्र होती. "शाकाहारी नमूना" म्हणून आधी हॉटेल मधले सर्व कर्मचारी एक एक् करुन मला बघुन गेले. शेजारी बासलेल्या चिनी गृहस्थाशी काहितरी बोलुन खात्री करुन गेले. क्वचित हसुन सुद्धा गेले. ह्या सगळ्या प्रकारानी माझ्या मनात धास्ति भरली. नक्की काय खायला मिळणार आहे हे कळत नव्हतें. अखेर जेवण आलं "डिम् सम्" चा बेत होता. म्हणजे एक एका लहानश्या – म्हणजे जेवणाच्या डब्याचा एक कप्पा असेल तेवढ्या - डब्यांमध्ये एक एक पदार्थाचे चार पाच एका घासात संपतील असे वडे, करंजी, मोदक सदृश पदार्थ ठेवतात.  अर्थात ह्या सगळ्यांत मांस असतं त्यामुळे मधल्या फ़िरत्या टेबलावरुन फ़क्त ते जातान बघायचे आणि मधुन मधुन आपण टेबल फ़िरवायला मदत करायची. अखेर माझा पदार्थ आला. शेपू नाहितर पालकाची मिश्र जुडी जर तासभर कुकर मध्ये शिजवून तशीच्या तशी जर पानात ओतली तर कसं दिसेल तसं ते दिसत होतं. म्हटलं बोंबला – आयला अधिच दिवसभर पकपक करुन भूक लागलीये त्यांत हे खायचं?! शेवटी त्यांच्या डिम्‌ सम्‌ मधले जे दुर्मिळ शाकाहारी पदार्थ होते ते संपवले आणि सूख मानून घेतले. त्यातुन एखाद्‌ दिवस जर कमी खायला मिळालं तर माझं वाईट नक्की होणार नाही.


रात्री पडलो असतां मनातुन चुंग हाउ म्याऊ चे चित्र सरत नव्हते. निरनिराळ्या अपरिचित वांसांत, आवाजांत, लोकांत आणि परिसरात बुडुन गेलेले इंद्रियानुभव मनाच्या एका कोपऱ्याचे घडण करत होते. वाटलं कि चीनच्या लोकांच्या अनेक शतकांच्या हालअपेश्टांअखेर सर्वस्वी त्यांनीच उभं केलेलं दिमाखदार विश्व जणु प्रत्येक अस्सल चिनी खिडकीतून अभिमानाने त्यांच्या अभिजात संस्कृतीचा वारसा देत होतं. नव्या यशाच्या नशेतल्या आमच्या चिनी सहकाऱ्यांचा उत्साहतर कधीच ओस्ररत नव्हता. आणि अशातच नकळत भारताबद्दलच्या किंवा निदान भारतीयांबद्दलच्या अशाच आशेत मला आपलेपणाची ऊब मिळालि.