वेदकालीन देव-देवता

         दुर्वासजी ह्यांचा ॥यजुर्वेद॥ वाचला. त्यांत त्यांनी म्हटले आहे - प्रजापति, रुद्र, विष्णू वगैरे ऋग्वेदातले देव येथे यजुर्वेदात एवढे महत्त्वाचे नाहीत. तर शिव, शंकर, महादेव हे देव अधिक महत्त्वाचे ! - ह्यावरून ऋग्वेदीय देवतांबद्दल एखादवेळेस (गैर)समज होण्याची शक्यता आहे म्हणून हे निवेदन.
         सर्वप्रथम हे जाणून घेण्याची आवश्यक आहे की वैदिकांच्या वेदकालीन अमूर्त स्वरूपाच्या देवता वेगळ्या व पौराणिक मूर्त स्वरूपातील देवता वेगळ्या. विष्णू व महादेव (वेदकालीन रुद्र) ह्या वैदिक तशाच पौराणिक आहेत, पण दोघांचे स्वरूपांत फार अंतर आहे. ऋग्वेदात रुद्राच्या नांवावर फक्त तीन स्वतंत्र  सूक्ते आहेत तर विष्णूच्या नांवावर चार स्वतंत्र सूक्ते आहेत. इंद्र, वरुण, अग्नि, मित्र या देवतांच्या सूक्तांमधून कांही कांही ऋचा विष्णू व रुद्र ह्यांच्या नांवे आहेत पण त्या फारच थोड्या. ह्यावरून दिसून येईल की रुद्र / विष्णु म्हणजे महत्वाचे देव नव्हेत.
       ऋग्वेदांत एकूण दहा मंडळे, प्रत्येक मंडळांत कांही सूक्ते व प्रत्येक सूक्तांत कांही ऋचा म्हणजेच मंत्र आहेत. दश मंडळात एकूण १०२८ सूक्ते व १०५८० ऋचा आहेत.  सद्यकालीन देव देवतांबद्दल वर्तमान काळी जशी कल्पना आहे तशी वैदिकांची वेदकाळी नव्हती. ते मूर्ति पूजक नव्हते. त्यांचे देव अमूर्त पण सर्व विश्वांत घनदाट भरून राहिलेले होते. ते नित्य तरुण असून अजर अमर आहेत. ते आजही आहेत आणि ह्यापुढेही असणारे आहेत. त्या देवता म्हणजे अग्नि, इंद्र, वरुण, आदित्य, त्वष्टा, सोम, उषा - किती नावे द्यावी. अशा अमूर्त पण अमर देवांची उपासना करून प्राचीन वैदिक आर्य धन्य व कृतकृत्य झाले. हे देव आजच्या सारखे देवळांत नाहींत, मुर्तीत नाहीत, क्षेत्रांत नाहीत वा तीर्थात नाहीत. ते सर्वत्र आहेत. पण सर्वत्र म्हणावे तर कोठेंच नाहीत असे सू़क्ष्म व सर्वव्यापी आहेत.
          पण वरकरणी हे सर्व देव स्वतंत्र व वेगवेगळे वाटले तर तसे मात्र नव्हे. आता अग्नि वा सूर्यनारायण घेतला तर त्यालाच ऐश्वर्यसंपन्न इंद्र म्हणतात, तारण करणारा मित्र म्हणतात, त्यालाच पापापासून मुक्त करणारा वरुण म्हणतात, द्युलोकांत राहणारा सुंदर पंखांचा पक्षी म्हणतात, जगावर वृष्टी करणारा म्हणून विद्युत. ही अग्निदेवता म्हणजे सर्वव्यापी ENERGY आहे. फार काय पोटांतील अन्न पचविणारा वैश्वानरही तोच, प्राणिमात्रांचे नियमन करणारा यम तोच, त्यालाच अंतरिक्षांत राहून श्वसन करणारा म्हणून मातरिश्वा (वायु) म्हणतात. निरनिराळ्या नावाखाली, निरनिराळ्या प्रसंगी निरनिराळ्या रूपांत एकाच देवाची आराधना करण्यात आली आहे. इंद्र, अग्नि, वरुण  इत्यादि देव व्यवहारकाली कर्तव्यपरत्वे निरनिराळ्या शब्दांनी वर्णन करण्यात व आळविण्यात आले असले तरी ते सर्व वस्तुतः एकाच परब्रह्म वस्तूचे - सगुण प्रजापति देवाचे - निरनिराळे पर्याय आहेत. म्हणून ते परब्रह्म वस्तूहून निराळे व स्वतंत्र नाहीत. हीच भावना वैदिक ऋषींची अखंड होती आणि हाच आशय एका ऋचेंत देखील आला आहे - ' एकं सन्तं बहुधा कल्पयन्ति ' (१०.११४.५). आपल्या व्यवहारांत जसा एक मनुष्य मुलाच्या दृष्टीने बाप होतो, बहिणीच्या दृष्टीने भाऊ आणि तसेच पति, सखा, शिष्य, गुरु, मंत्री, पोलिस, साहेब इ. इ. होतो तसेच. 'त्याचे' वर्णन करतांना ऋषी काय म्हणतात ह्याचे दोन-तीन दाखले दिले तर वेदकालीन देव संकल्पना स्पष्ट होईल. ' एको विश्वस्य भुवनस्य राजा ' (३.४६.२) - तोच या सर्व भुवनांचा राजा आहे. ' मर्त्येषु आविशन् ' (५.२५.४) - मनुष्याच्या अंतःकरणांत तोच प्रविष्ट होऊन आहे. ' त्वं नः पिता वसो त्वं माता ' (८.९८.१०) - तूंच आमचा पिता आणि तूंच आमची माता.