आठवण गौरीगणपतीची

गणपतीचे दिवस जवळ आले की पुण्यातले खाऊवाले पाटणकर यांचे माझ्या बाबांना एक पत्र यायचे की "पेणवरून गणपतींच्या सुंदर व सुबक मूर्ती आल्या आहेत."


गणपतीच्या दिवशी सकाळी आम्ही दोघी बहिणी बाबांबरोबर गणपती आणायला जायचो. बाबांच्या हातामध्ये ताम्हण व त्यात आमच्या गणपतीची सुरेख मूर्ती असायची. त्या गणपतीचे डोळे रेखीव व बोलके असायचे. त्याच्याकडे पाहिले की तो आपल्याकडे बघून हसतो आहे की काय असा भास व्हायचा. शेंदरी रंगाचे पितांबर आणि आकाशी रंगाचे उपरणे. सोंडेवरचे नक्षीकाम जणुकाही चांदी सोन्याचे आहे की काय असे वाटे. गणपतीच्या खांद्यावरती आमच्या घरचे एक अबोली रंगाचे पारदर्शक उपरणे असायचे.


गणपतीचे आगमन होताना आई आमच्या तिघांचे औक्षण करायची. आमच्या तिघांच्या पायांवर आधी थोडे गरम पाणी, मग थोडे दूध व परत थोडे गरम पाणी ओतून तिघांच्या पायावर कुंकवाचे स्वस्तिक काढून औक्षण करायची. "गणपती बाप्पा मोरया" असे म्हणत गणपतीचे आगमन व्हायचे.


गणपतीच्या गळ्यात आम्ही सोन्याची साखळी घालायचो व त्याच्या बोटात बदामाच्या आकाराची व त्यावर छोटे घुंगरु अशी अंगठी. माझे बाबा गणपतीच्या हातावर थोडे सुंगधी अत्तरही लावायचे. गणपतीला चंदनाचे गंध लावून त्यावर अक्षदा व गुलाबाची पाकळी. आमच्या घरी जाईच्या फुलांचा मोठा वेल आहे. गडद लाल रंगाचे जास्वंदीच्या फुलांचे झाड आहे व अंगणात अगणित दूर्वा. जाईची थोडी फुले, त्यानंतर हिरव्या गर्द दूर्वांची जुडी व त्यानंतर एक गडद लाल रंगाचे जास्वंदीचे फूल अशा क्रमाने भरगच्च हार गणपतीला खूप शोभून दिसायचा. छोटा सुबक लाकडी देव्हारा, त्यात गणपतीची मूर्ती, भरगच्च हार व सप्तरंगी दिव्यांची झगमगती माळ. अशा गणपतीचे रूप डोळ्यात साठवून आम्ही सर्व त्याला मनोभावे नमस्कार करायचो.


आमच्याकडे दीड दिवसाचा गणपती असल्याने दुसऱ्या दिवशी त्याची निघण्याची तयारी. निघताना गणपतीला माझी आई केळीच्या पानामध्ये दही पोह्याचा खाऊ द्यायची आणि म्हणायची, " पुढच्या वर्षी लवकर येरे बाबा." त्याला निरोप देताना आमच्या डोळ्यात पाणी यायचे.


आमच्याकडे गौरी खड्याच्या. बागेतून खड्याच्या गौरी आणायला आम्हा बहिणींना खूप मजा वाटायची. आई आम्हाला बागेतून गौरी आणायला सांगायची. पूजेचे सर्व साहित्य घेऊन जायचो. त्यात गंध, अक्षदा, कापसाचे हळदीकुंकू लावून बनवलेले वस्त्र, उदबत्ती, निरांजन अशी सगळी तयारी घेऊन खास गौरी गणपतीला शिवलेले फ्रॉक घालून जायचो बागेत.


मातीचे अंगण असल्यामुळे त्यात बरेच खडे पण असायचे. मग त्यातल्या त्यात चांगले पाच खडे घेवून त्याची पूजा करून चांदीच्या कमळामध्ये त्या खड्यांची गौरी म्हणून स्थापना व्हायची. सुवासिक फुलांबरोवर गुलबक्षीच्या फुलांची हाताने विणलेली वेणी पण असायची. बागेतच मग हातातली घंटा वाजवून आरती म्हणायचो. नंतर तोंडात पाणी घेऊन  गौरींना घरी घेऊन यायचो. तोंडात पाणी अशाकरता की गौरी घेऊन जाताना बोलायचे नसते.


आई आमच्या दोघींचे व गौरींचे औक्षण करायची. रांगोळीच्या छोट्या पाउलांवरून चालत येऊन गौरी देव्हाऱ्यात स्थानापन्न व्हायच्या. गौरींचा खास नैवेद्य म्हणजे घावन घाटले. घावन म्हणजे तांदुळाच्या पिठीचे धिरडे. घाटले म्हणजे नारळाच्या दूधात गूळ व वेलची घालणे. त्यादिवशी आमच्या घरी एक मामेबहीण माहेरवाशीण म्हणून जेवायला असायची.


अशी ही गौरी गणपतीची आठवण मनात कायमची कोरली गेली आहे.


रोहिणी