प्लुटोला पृथ्वीवासीयांची महादशा

टीप - हा लेख प्रकाशित करायला उशीर केल्याबद्दल क्षमस्व. ग्रहदशा हा लेख लिहिल्यावर नवीन घडामोडींचा उल्लेख करणारा लेख लिहिणे हे माझे कर्तव्यच ठरते. मात्र अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यामध्ये अपेक्षेपेक्षा जास्त वेळ गेला आणि तरीही समाधानकारक उत्तरे मिळालेली नाहीत. भविष्यात ती मिळाल्यास आणि मिळतील त्यावेळी ती माहिती मनोगतावर देण्याचा प्रयत्न करेन.


आपल्या सौरमालेच्या सभासदसंख्येमध्ये वाढ होईल अशी आशा निर्माण केलेल्या खगोलविदांच्या संमेलनाने शेवटी सभासदसंख्या कमी करण्याचा निर्णय घेतला. प्लुटोला ग्रह म्हणावे अथवा नाही हा तसा जुनाच वाद. १९३० मध्ये प्लुटोचा शोध लागला तेव्हा तो किमान पृथ्वीच्या आकाराचा असावा असा प्राथमिक कयास होता. मात्र हळूहळू त्याच्याबद्दलची माहिती उजेडात आली. अभिजात ग्रहांच्या तुलनेत प्लुटोचा आकार खूपच लहान आहे. केवळ बुधापेक्षाच नाही तर काही मोठ्या ग्रहांच्या उपग्रहांपेक्षाही प्लुटो आकाराने लहान आहे. अभिजात अष्टग्रहांच्या कक्षा साधारण एकाच प्रतलात आहेत तर प्लुटोची कक्षा ह्या प्रतलाच्या तुलनेत बरीच कललेली आहे. त्यामुळे तसाही प्लुटो हा नेहमीच "ऑड मॅन आउट" होता.  


खगोलविदांनी दोन वर्षे खपून तयार केलेली ग्रहाची व्याख्या मान्य झाली असती तर सध्या प्लुटोचा उपग्रह शॅरन, लघुग्रहांच्या पट्ट्यातला सेरेस आणि प्लुटोपलिकडील अवकाशात असलेल्या २००३यूबी३१३ चा आणि भविष्यात आणखी बऱ्याचश्या अवकाशस्थ वस्तूंचा समावेश ग्रह म्हणून सौरमालेमध्ये झाला असता. थोड्याच वर्षात अशाप्रकारे सौरमालेतील ग्रहसंख्या पन्नासाच्या वर गेली असती. प्लुटोपलिकडील अवकाशातले नवेनवे शोध ह्या सदस्य संख्येत भर घालत राहिले असते आणि पाठ्यपुस्तकांमध्ये सतत बदल करावा लागला असता. आता अष्टग्रही सौरमालेसाठी पाठ्यपुस्तके एकदा बदलावी लागतील, मात्र तसे वारंवार होण्याचा धोका तरी तूर्तास टळला आहे.


ग्रहाची नवीन व्याख्या अशी - सूर्याभोवती फिरणारी अवकाशस्थ वस्तू, जिचे वस्तुमान द्रवस्थैतिक संतुलन (Hydrostatic Equilibrium) मिळवण्याएवढे असल्याने तिला गोलाकार/गोलसदृश आकार प्राप्त झाला आहे आणि जिने तिच्या शेजारचा परिसर मोकळा केला आहे अशा वस्तूला ग्रह म्हणावे. प्लुटोकडे पहिल्या दोन गोष्टी असल्या तरी तिसरी नाही, म्हणून प्लुटो हा ग्रह नाही. मात्र त्याला बटुग्रह वा ग्रहबटु (Dwarf Planet) असे म्हणण्यात येईल.


ही नवी व्याख्या वाचल्यावर अनेक प्रश्न मनांत येतात आणि त्यांची समाधानकारक उत्तरे मला सापडलेली नाहीत. पहिला प्रश्न 'शेजार मोकळा करणे म्हणजे नक्की काय? एखाद्या अवकाशस्थ वस्तूने शेजार मोकळा केला आहे वा नाही हे ठरवण्यासाठीचे निकष कोणते?' इंटरनॅशनल ऍस्टॉनमिकल युनियन ने ग्रहाची ही नवीन व्याख्या करताना मोकळ्या शेजाराची संकल्पना स्पष्ट केलेली नाही. मंगळ व गुरूदरम्यानचा लघुग्रहांचा पट्टा हा मोकळ्या नसलेल्या शेजाराचे उदाहरण म्हणता येईल. अनेक छोटे मोठे लघुग्रह ह्या पट्ट्यामध्ये फिरत आहेत. त्यातील सेरेससारख्याने ग्रहाच्या व्याख्येतील पहिल्या दोन अटींची पूर्तता केली असली तरी त्याला मोकळा शेजार नाही, म्हणून तो ग्रह नाही. ग्रहाचे उपग्रहही साधारण ग्रहाच्याच कक्षेत सूर्याभोवती फिरतात असे म्हणता येईल. अभिजात अष्टग्रहांपैकी बहुतेकांना उपग्रह आहेत, तरीही ते ग्रह आहेत. म्हणजेच आसपास फिरणाऱ्या वस्तूंना स्वतःच्या अंकित करून, उपग्रह म्हणून त्यांना स्वतःभोवती फिरवत ठेवणे, वा (शनीप्रमाणे)कड्यांच्या स्वरूपात स्वतःभोवती फिरत ठेवणे किंवा (नेपच्यूनने प्लुटोला भिरकावले तसे) त्या वस्तूंना वेगळ्या कक्षेत भिरकावून देणे ह्या शेजार मोकळा करण्यातील काही पायऱ्या असू शकतात.


प्लुटोच्या कक्षेवर युरेनसच्या गुरुत्वाकर्षणाचा मोठा परिणाम होतो. प्लुटोची कक्षा नेपच्यूनच्या कक्षेला छेदते. म्हणजेच प्लुटोचा शेजार मोकळा नाही म्हणून तो ग्रह नाही. पण मग त्याच न्यायाने नेपच्यूनलाही ग्रह म्हणता कामा नये, नाही का? प्लुटोची कक्षा नेपच्यूनच्या कक्षेला छेदते हेच वाक्य नेपच्यूनची कक्षा प्लुटोच्या कक्षेला छेदते असे उलटे म्हटले तर नेपच्यूननेही त्याचा शेजार मोकळा केलेला नाही असा त्याचा अर्थ होत नाही का? त्यावर असे म्हणता येईल की नेपच्यून आणि प्लुटोची तुलना करता प्लुटो नेपच्यूनपेक्षा खूपच लहान आहे.  प्लुटोची कक्षा नेपच्यूनच्या गुरुत्वाकर्षणाने प्रभावित झालेली आहे, नेपच्यूनची कक्षा प्लुटोच्या गुरुत्वाकर्षणाने प्रभावित झालेली नाही, सबब प्लुटो ग्रह नाही.


मात्र नवीन व्याखेनुसार नेपच्यूनपलिकडील अवकाशातील कोणत्याच वस्तू (ज्यांना कायपर पट्ट्यातील वस्तू म्हणतात) ग्रह होऊ शकत नाही. २००३यूबी३१३ ने त्याचा शेजार मोकळा केलेला नाही कशावरून? प्लुटोची कक्षा नेपच्यूनच्या कक्षेला छेदते, तशी ह्या २००३यूबी३१३ ची छेदत नाही. तरीही २००३यूबी३१३ हा ग्रह नाही, असे का? आजपर्यंत सापडलेल्या कायपर पट्टीय वस्तू  आकाराने व वस्तुमानाने खूपच लहान, बुधाहूनही लहान आहेत. त्या वस्तू लहान म्हणून त्यांना ग्रह म्हणायचे नसेल, तर वस्तुमान वा आकारमानाचा निकष व्याख्येत का लिहिलेला नाही? उदाहरणार्थ, ताऱ्याभोवती फिरणारी आणि द्रवस्थैतिक संतुलन असणारी वस्तू जिचे वस्तुमान क्ष किलोग्रॅमपेक्षा जास्त आहे (किंवा किमान बुधाएवढे आहे) वा व्यास य किलोमीटरपेक्षा जास्त आहे अशाच वस्तूला ग्रह म्हणावे' अशाप्रकारे व्याख्या करता आली नसती का? प्लुटोची कक्षा अभिजात ग्रहांच्या कक्षांच्या प्रतलात नाही, तर ती कललेली आहे. कायपर पट्ट्यातील अनेक वस्तूंच्या कक्षाही ह्या प्रतलात नाहीत. ह्या कारणाने जर त्यांना ग्रह म्हणायचे नाही असे असते तर हीच व्याख्या 'ताऱ्याभोवती फिरणारी आणि द्रवस्थैतिक संतुलन असणारी वस्तू जिची सूर्याभोवती फिरण्याची कक्षा अभिजात ग्रहांच्या कक्षेच्या प्रतलात आहे अशाच वस्तूला ग्रह म्हणावे' अशी व्याख्या करता आली नसती का? पण अशाने सेरेस ह्या लघुग्रहाला ग्रह म्हणावे लागले असते. मग वस्तुमानाचा आणि कक्षेच्या प्रतलाचा असे दोन्ही निकष ह्या व्याख्येत घातले असते तर ही व्याख्या पुरेशी स्पष्ट झाली नसती का?


आपल्या सौरमालेमध्ये कायपर पट्ट्यातील वस्तू बुधाहून लहान आहेत. समजा इतर सौरमालांमध्ये कायपर पट्ट्यामध्ये मोठ्या वस्तू असतील, तर त्यांना ग्रह म्हणणार की नाही? असा प्रश्न उरतोच. थोडक्यात काय तर "मोकळा शेजार" म्हणजे नक्की काय हे जोपर्यंत स्पष्ट होत नाही तोपर्यंत ह्या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळणार नाहीत.


द्वादश ग्रहांच्या प्रस्तावामध्ये असलेली ग्रहांची व्याख्या स्पष्ट, निःसंदिग्ध होती. त्या प्रस्तावामध्ये उपग्रहाचीही स्पष्ट व्याख्या केलेली होती, ज्यानुसार शॅरन हा प्लुटोचा उपग्रह न राहता जोडग्रह झाला असता. मात्र ग्रहाच्या नवीन व्याख्येमध्ये उपग्रहाच्या व्याख्येचा अंतर्भाव नाही. त्यामुळे शॅरनला प्लुटोचा उपग्रहच मानायचे काय? हाही आणखी एक प्रश्न, ज्याचे उत्तर होकारार्थी मानायला हरकत नसावी.


नवी सौरमाला - (सौजन्य इंटरनॅशनल ऍस्ट्रॉनमिकल युनियन चे संकेतस्थळ)



 


भविष्यकाळात ग्रहाची व्याख्या अधिक स्पष्ट, निःसंदिग्ध होईल अशी आशा करू या.  तूर्तास प्लुटोला पृथ्वीवासीयांची महादशा चालू आहे असे दिसते!! (त्यासाठी एखादी शांत करण्याचा उपाय माहीत असल्यास कृपया प्लुटोला कळवा.)


-वरदा