तीन विद्यार्थी!!!(३)

त्या दिवशी रात्री आम्हाला जेवायला बराच उशीर झाला. आमचं जेवण झाल्यावर होम्स बराच वेळ विचार करत बसला होता पण या विषयाबद्दल त्याने चकार शब्द काढला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी आठच्या सुमाराला तो माझ्या खोलीत आला तेंव्हा माझी आन्हिकं नुकतीच आटोपली होती.
"वॉटसन, आपल्याला सेंट ल्यूक्स कॉलेजला भेट दिली पाहिजे. ब्रेकफास्टला उशीर झाला तर चालेल ना तुला?"
"हो. चालेल."
"आपण तिथे पोहोचेपर्यंत काळजीने सॉम्स निम्मे झाले असतील बहुधा."
"तुझ्याकडे चांगली बातमी आहे तर!"
"हो तसं म्हणायला हरकत नाही"
"कोडं सुटलं का?"
"होय! मी हे रहस्य उलगडलं आहे"
"पण तुला आणखी पुरावा कुठे मिळाला?"
"भल्या पहाटे सहा वाजता उठून दोन तास कष्ट केले आणि पाच एक मैल चालून आलं की पुरावा आपोआप मिळतो मित्रा! हे बघ"
त्याने त्याची मूठ उघडली. त्याच्या तळहातावर वाळलेले  मातीचे तीन  शंक्वाकृती डोंगर होते.
"अरे पण काल तर तुझ्याकडे दोन डोंगर होते"
"हो पण आत्ता सकाळी तीन आहेत. आणि असं म्हणायला निश्चितच जागा आहे की जिथून हे पहिले दोन नमुने आले तिथूनच हा तिसराही आला आहे. चल वॉटसन. सॉम्सची काळजी दूर करू"
जेंव्हा आम्ही सॉम्सच्या घरी पोहोचलो तेंव्हा काळजीने खरंच त्यांचा जीव अर्धा झाला होता. थोड्याच वेळात परीक्षा सुरू होणार होती. आणि ती पुढे ढकलावी की कसे  यावर त्यांना अजूनही मार्ग सापडला नव्हता. त्यांच्या अस्वस्थतेमुळे त्यांना एका जागी उभं राहणंही शक्य होत नव्हतं. आम्ही आत गेलो तेंव्हा ते धावतच होम्सपाशी आले. आपले दोन्ही हात त्यांनी असहायपणे होम्सपुढे पसरले.
"देवासारखे आलात हो! मला वाटलं तुमचाही आधार सुटतो आहे की काय. परीक्षेचं काय करायचं ते मला लौकर सांगा. "
"परीक्षा ठरल्याप्रमाणेच घ्यायला काहीच हरकत नाही."
"अहो पण तो भुरटा..."
"तो परीक्षेला बसणार नाही."
"चोर सापडला?"
" हे प्रकरण बाहेर जाणार नाहीये. त्यामुळे आता जरासा कायदा हातात घेऊन आपणच इथे एक छोटासा खटला चालवणार आहोत या आणि एका माणसाचं कोर्ट मार्शल करणार आहोत. सॉम्स तुम्ही इथे बसा. वॉटसन तू इथे बस. मी या खुर्चीत बसतो. चला झाली सगळी तयारी
वाजवा घंटा..."
बॅनिस्टर आत आला. आमच्याकडे पाहून त्याला धक्का बसलेला आम्हाला स्पष्ट दिसला .
"दार लावून घे." होम्स म्हणाला. " आता आम्हाला खरं खरं सांग काल काय झालं ते"
हे वाक्य ऐकल्यावर त्याचा चेहरा पांढरा फटक पडला.
"मी कालच तुम्हाला सगळं सांगितलंय साहेब"
"त्यात काही भर घालण्यासारखं काही नाही का तुझ्याकडे?"
" नाही. काहीच नाही."
"ठीक आहे. माझा अंदाज मी तुला सांगतो. काल संध्याकाळी इथे असलेली एखादी गोष्ट लपवायला म्हणून तू या खुर्चीत बसलास का?"
बॅनिस्टरचा चेहरा आणखी पडला.
"नाही साहेब तसं काही नाहीये"
"अर्थातच हा माझा एक अंदाज आहे. या गोष्टीचा माझ्याकडे काहीच पुरावा नाही. पण माझा अंदाज बरोबर ठरण्याची शक्यता बरीच जास्त आहे." होम्स मुत्सद्दीपणे म्हणाला.
" सॉम्स साहेबांची पाठ वळताच तू आतल्या खोलीत लपून बसलेल्या माणसाला बाहेर सोडलंस"
बॅनिस्टरच्या तोंडाला एव्हाना कोरड पडली होती.
"आत कोणीच नव्हतं साहेब"
"आता मात्र तू अडकलास बॅनिस्टर. आत्तापर्यंत तू कदाचित खरंही बोलला असशील पण तुझं हे वाक्य साफ खोटं आहे हे मला माहिती आहे."
"आत कोणीच नव्हतं साहेब" कसल्या तरी निश्चयाने तो ठामपणे म्हणाला.
"असं काय करतोस बॅनिस्टर? कबूल करून टाक"
"आत खरंच कोणीही नव्हतं साहेब"
"ठीक आहे. तू आम्हाला काही न सांगायचं ठरवलेलं दिसतंयस. हरकत नाही. त्या भिंतीशेजारी जाऊन उभा राहा. मि. सॉम्स तुम्ही वर जाऊन गिल्ख्रिस्टला इथे बोलावून आणू शकाल का?"
काही क्षणातच मि. सॉम्स परत आले. त्यांच्या मागोमाग गिल्ख्रिस्ट आत आला. त्याचा तरुण चेहरा प्रसन्न आणि उत्साही दिसत होता. उंच, सडपातळ , चपळ असा गिल्ख्रिस्ट म्हणजे तारुण्याचं मूर्त रूप असावा असं वाटत होतं. त्याच्या निळ्या डोळ्यांत मात्र प्रश्नचिन्हे होती. त्याने आम्हा सगळ्यांकडे नजर टाकली आणि कोपऱ्यात उभ्या असलेल्या बॅनिस्टरकडे तो अविश्वासाने पाहू लागला.
"मि. गिल्ख्रिस्ट ,जरा ते दार लावून घ्याल का? " होम्स म्हणाला. "हम्म. या खोलीत आपण मोजकीच लोकं आहोत. या खोलीत काय झालं हे या चार भिंतींच्या कधीही बाहेर जाणार नाही. आपण एकमेकांशी खरं बोलू शकतो. आता मला सांगा मि. गिल्ख्रिस्ट, तुमच्यासारख्या एका चांगल्या घरातल्या मुलाने कालचा प्रकार का करावा?"
एक क्षणभर तो हबकला आणि त्याने बॅनिस्टरकडे एक कटाक्ष टाकला. त्याचा संताप आणि त्याला बसलेला धक्का त्यातून स्पष्ट दिसत होता.
"गिल्ख्रिस्ट साहेब, मी एक शब्दही बाहेर पडू दिला नाही. मी त्यांना काहीही सांगितलं नाही."
"पण तू आत्ता हे वाक्य बोललास ना?
मि. गिल्ख्रिस्ट आता तुमच्यापुढे कबुलीजबाब देण्याशिवाय दुसरा मार्ग नाही." होम्स म्हणाला.
एक क्षणभर गिल्ख्रिस्ट आपल्या भावनांना आवर घालायचा आटोकाट प्रयत्न करत होता. पण नंतर अचानक तो खाली गुडघ्यांवर बसला आणि आपलं तोंड आपल्या ओंजळीत लपवून त्याने स्फुंदून स्फुंदून रडायला सुरुवात केली.
"शांत हो" होम्स त्याला हलकेच म्हणाला. " अरे जो चुका करतो तोच माणूस असतो. आणि तू कोणी निर्ढावलेला गुन्हेगार नाहीस हे आम्हाला ठाऊक आहे. आपण असं करू या. काय झालं असेल हे मी सांगतो. त्यात काही तपशील चुकला असेल तर तू तो दुरुस्त कर. ते तुला जास्त सोपं जाईल. चालेल?  मी तुझ्यावर कुठे अन्याय तर करत नाही ना याकडे लक्ष दे  "
"मि. सॉम्स ,  तुम्ही म्हणालात की प्रश्नपत्रिका तुमच्या खोलीत आहेत हे कुठल्याही मार्गाने बाहेर कळणार नाही , अगदी बॅनिस्टरही ते सांगणार नाही तेंव्हाच काय झालं असेल याचा मला उलगडा व्हायला लागला. छापखानावाल्याला मी संशयितांमधून बाजूला केलं कारण त्याला त्या प्रश्नपत्रिका त्याच्या छापखान्यातच पाहता आल्या असत्या. त्या भारतीय विद्यार्थ्यालाही मी संशयातून बाहेर काढलं कारण जर प्रश्नपत्रिकांची गुंडाळी टेबलावर असेल तर त्यांच्याबद्दल त्याला काहीही माहीत नसावं. मी ही शक्यताही निकालात काढली की एखादा माणूस नेमका त्याच दिवशी या खोलीत घुसला ज्या दिवशी प्रश्नपत्रिका टेबलावर ठेवलेल्या होत्या. घुसखोराला हे माहीत असणार की त्या प्रश्नपत्रिका खात्रीने टेबलावर होत्या. पण त्याला ते कळलं कसं?"
"मी जेंव्हा तुमच्या खिडकीची तपासणी करत होतो तेंव्हा तुम्हाला असं वाटलं की तिथून कोणी आत आलं नाही ना हे मी पाहतोय. पण एखादा माणूस दिवसाढवळ्या , समोरच्या सगळ्या खोल्यांमधे जाग- वर्दळ असताना असं काहीतरी करेल हे मला शुद्ध वेडेपणाचं वाटलं. मी हे पहात होतो की खिडकीतून डोकावून पाहिल्यावर टेबलावर ठेवलेल्या प्रश्नपत्रिका पाहू शकण्यासाठी त्या माणसाची उंची किती असायला हवी. मी स्वतः सहा फूट उंच आहे आणि तरीही मला त्या खिडकीतून बाहेर पाहायला कष्ट पडत होते. म्हणजे तो जो कोणी असेल त्याची उंची माझ्यापेक्षा कमी निश्चितच नसणार. आता तुमच्या लक्षात आलं असेल की तुमच्या तीन विद्यार्थ्यांपैकी ज्याची उंची खूप जास्त आहे त्याचाच संशय घ्यायला हवा. "
"मी आत आलो आणि त्या कडेच्या लहान टेबलाबद्दल माझं मत मी तुम्हाला सांगितलं. तुमच्या मुख्य टेबलावरून मी काहीच निष्कर्ष काढू शकलो नाही. तेंव्हाच तुम्ही मला गिल्ख्रिस्ट बद्दल सांगितलंत की तो लांब उडीमधे भाग घेतो. त्याच क्षणी सगळा प्रकार माझ्या ध्यानात आला. आता मला फक्त काही छोटे पुरावे लागणार होते जे मी फारसा वेळ न दवडता मिळवले. "
" झालं असं होतं की हा मुलगा त्या दिवशी दुपारभर मैदानात लांब उडीचा सराव करत होता. त्याचे उडी मारताना घालायचे बूट हातात घेऊन तो इकडे परत आला. तुम्हाला माहीतच असेल की अशा प्रकारच्या बुटांना खाली मोठे अणकुचीदार खिळे असतात. खोलीत परत जात असताना त्याच्या उंचीचा फायदा मिळून त्याला खिडकीच्या चौकटीच्या फटीतून आतले कागद दिसले. ते कसले कागद होते हे त्याने लगेच ओळखलं. ही गोष्ट त्याला कळल्याने तसं म्हटलं तर काहीच फरक पडणार नव्हता. पण त्याला तुमच्या नोकराच्या निष्काळजीपणाने तुमच्या दरवाज्याच्या कुलुपाला तशीच  राहिलेली किल्ली दिसली. टेबलावरचे कागद म्हणजे खरोखरीच प्रश्नपत्रिका आहेत का हे बघण्याची उर्मी अनावर झाली. अर्थातच कोणी काही विचारलं असतं तर तो असं म्हणू शकणार होता की तो काहीतरी शंका विचारायला आत आला होता."

"जेंव्हा त्याला कळलं की ते कागद खरंच प्रश्नपत्रिकेचे आहेत तेंव्हा या गोष्टीचा फायदा घेण्याचा मोह वरचढ ठरला. त्याने आपले बूट टेबलावर ठेवले. खिडकीजवळच्या खुर्चीत तू काय ठेवलं होतंस?"
"हातमोजे" गिल्ख्रिस्ट उत्तरला.
होम्सने एक विजयी कटाक्ष बॅनिस्टरकडे टाकला."त्याने आपले हातमोजे त्या खुर्चीत ठेवले आणि प्रश्नपत्रिकेचे ताव एकामागून एक घेत ते उतरवून घ्यायला सुरुवात केली. त्याला वाटलं की त्याचे सर खोलीच्या मुख्य दाराने आत येतील आणितो त्यांना येताना सहज पाहू शकेल. पण तुम्ही या बाजूच्या दरवाज्याने आलात. अचानक इतक्या जवळून तुमची चाहूल लागल्यामुळे तो गडबडला.  त्याला पळून जायला काही मार्गच शिल्लक नव्हता. आपले बूट उचलून त्याने आतल्या खोलीकडे धाव घेतली. त्याचे हातमोजे घाईघाईत खुर्चीतच राहिले. तुम्ही जर नीट पाहिलंत तर तुमच्या लक्षात येईल की ही फाटण्याची खूण एकीकडे वरवर आहे तर आतल्या खोलीच्या दिशेने ती खोलवर जाते.  यावरून हे स्पष्ट होतं की बूट त्या दिशेने उचलला गेला होता. अर्थातच चोराने त्या दिशेने धाव घेतली होती. एका खिळ्याला लागलेली माती टेबलावर पडली होती आणि तसाच दुसरा ठसा आत सापडला होता. इथे मी असं सांगू इच्छितो की आज पहाटे खेळाच्या मैदानात जाऊन मी लांब उडीसाठी वापरली जाणारी काळी माती तपासली. उडी मारून झाल्यावर खेळाडूचा पाय घसरू नये म्हणून जो भुस्सा पसरलेला असतो तो मिसळून त्या मिश्रणाचा एक नमुना मी घेऊन आलो आणि माझ्याकडचा दोन जुन्या नमुन्यांशी तो मी ताडून पाहिला. मी बोलतो आहे ते बरोबर आहे ना मि. गिल्ख्रिस्ट?"
तो एव्हाना उठून उभा राहिला होता. मान हलवत तो म्हणाला " हो हे सगळं खरं आहे."
"देवा रे! तुला यावर काय म्हणायचंय?"
"माझा गुन्हा उघडकीला आल्यामुळे मी जरासा भांबावलो आहे पण सर, मला तुम्हाला हे पत्र द्यायचंय. मी रात्रभर अस्वस्थ आहे आणि माझ्या डोळ्याला डोळा लागलेला नाही. मी हे आज पहाटे तुम्हाला देण्यासाठी लिहिलं. हे लिहिताना माझी चोरी पकडली गेली आहे हे मला माहीत नव्हतं. हे घ्या सर. मी त्यात लिहिलं आहे की मला या परीक्षेला बसायची इच्छा नाही. मला ऱ्होडेशिअन पोलिसांकडे एक चांगली नोकरी मिळालेली आहे आणि ती स्वीकारून मी लगोलग दक्षिण आफ्रिकेला चाललो आहे."
"तू खोटेपणाने न वागायचा आणि परिस्थितीचा गैरफायदा  न घेण्याचा निर्णय घेतलास हे पाहून मला खूप आनंद झाला. पण तुझा निर्णय कसा काय बदलला?"
गिल्ख्रिस्टने बॅनिस्टरकडे हात केला. "या माणसाने मला योग्य मार्ग दाखवला." "बॅनिस्टर, तुझ्या लक्षात आलं असेल की मला हे कळलं होतं की तूच त्या माणसाला जाऊ दिलंस कारण तूच इथे होतास आणि तूच खोलीला कुलूप लावलंस. कारण तो त्या खिडकीतून बाहेर पडणं अशक्य होतं.  आता तू तुझ्या वागण्याचं कारण आम्हाला सांग आणि हे रहस्य पूर्णपणे सोडव बरं."
"जर तुम्हाला माहीत असतं तर तुम्हाला हे सगळं सोपं वाटलं असतं पण जरी  तुम्ही अतिशय हुशार असलात तरी तुम्हाला हे माहीत असणं शक्य नाही. एके काळी या मुलाच्या वडिलांकडे , मि. जॅबेझ गिल्ख्रिस्ट साहेबांकडे मी बटलर होतो.  ते दिवाळखोर झाले आणि मी या कॉलेजमधे नोकरी करू लागलो.पण माझ्या जुन्या मालकांचे उपकार मी विसरू शकलो नाही. ते या जगात नव्हते पण त्यांच्या मुलावर माझं बारीक लक्ष होतं.. काल जेंव्हा सॉम्स साहेबांनी मला हाक मारली तेंव्हा आत आल्या आल्या मला कोपऱ्यातल्या खुर्चीतले गिल्ख्रिस्ट साहेबांचे हातमोजे दिसले. मी ते मोजे चांगले ओळखत होतो आणि ते इथे असण्याचा अर्थ मला चटकन समजला. जर सॉम्स साहेबांना ते दिसले असते तर सगळा खेळ खलास झाला असता. मी त्या खुर्चीत बसकण मारली आणि तोपर्यंत ढिम्म हललो नाही जोवर सॉम्स साहेब तुम्हाला भेटायला बाहेर पडले नाहीत.  तेवढ्यात आतून हे साहेब बाहेर आले. मी त्यांना एके काळी माझ्या अंगाखांद्यावर खेळवलंय हो. त्यांनी झाल्या प्रकाराची कबुली माझ्यापाशी दिल्यावर माझं मन द्रवलं. मी त्यांना त्यांच्या वडिलांनी सांगितल्या असत्या त्या चार समजुतीच्या गोष्टी सांगितल्या आणि त्यांच्या हातून झालेल्या चुकीची जाणीव करून दिली. आता मला सांगा माझं काही चुकलं का?"
"मुळीच नाही" असं म्हणत होम्स आपल्या खुर्चीतून उठला. तो आनंदाने हसत होता.
"मि. सॉम्स, तुमचा प्रश्न आता सुटला आहे आणि आम्हालाही भुका लागल्या आहेत त्यामुळे आता आम्ही निघतो . चल वॉटसन!"
आणि मग गिल्ख्रिस्टकडे वळून तो म्हणाला," तुमच्या ऱ्होडेन्शियामधील उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा. एकदा तुम्ही तोंडघशी पडता पडता वाचला आहात. आता तुम्ही खूप मोठे होऊन दाखवा...."


(समाप्त)
--अदिती