कवितेचा अपूर्ण शेला

नमन अनंतरूपा गुणातीता
दर्शने चित्त मुदिते श्रीगणेशा


श्रीगणेशा केला खरा, पण कविता पूर्ण काही होईना. एखाद्या ध्वनिमुद्रिकेत स्वर्गातील गंधर्वाप्रमाणे स्वर लागावा आणि मध्येच वीज जावी तसे झाले. जणू, ती मुद्रिका आहे तेथेच थांबवून ठेवली. वीज आल्यावर जेथवर पोहोचली होती तेथून पुढे सुरू होईल. अगदी तसेच या कवितेचे झाले. एक विचार मनात येतोय.


काही शिल्प प्रत्यक्ष पूर्ण करायच्या आधीच मनावर कोरल्या जातात. मग, त्यांस पूर्ण करण्याचा जो प्रवास आहे तो आनंद आधीच मिळाल्यासारखा वाटतो. त्यानंतर सुचणारा प्रत्येक शब्द एक आगळा संघर्ष घेऊन येतो. सुचलेला शब्द चपखल बसतो काय हा प्रश्न पडतो. मग वाटते की मनातील जी प्रतिमा आहे त्या शिल्पात तो काही बसत नाही. दुसरे काही लिहायला घ्यावे तर कविता डोक्यातून काही जात नाही.


कल्पनेच्या नदीला बांध पडतो. तो मोकळा करून पुन्हा रचनांचा प्रवाह सुरू करायची ऊर्मी दाटते. अशा वेळेस काहीच न लिहिणे हा उपाय योग्य आहे आणि नाही असे दोन्ही विचार एकाच वेळेस मनात येतात! त्यात कार्यबाहुल्याचा फेरा हे निमित्तमात्र होते. अक्षरशः दिवसांमागून दिवस सरतात. स्वतःलाच चकित करण्याचा मनाचा गुणधर्म हा एक अद्भुत अनुभव आहे.


ज्ञानेश्वरांनी मोगरा फुलला म्हणताना "मनाचिये गुंती, गुंफियला शेला" असे सांगितले आहे. एखादा शेला गुंतताना धाग्यांचा गुंता होतो. तो सोडवताना खरोखरच सुख-दुःख हे दोन्ही मनाचिये गुंती आहेत ही प्रचिती येते. धाग्यांचा गुंता झाला की तो गुंता सोडवण्यास वेळ द्यावा की दुसरे शेले गुंफावे हा खूप अवघड प्रश्न आहे. कारण, सहसा अशा वेळेस सगळ्याच शेल्यांच्या धाग्यांचा गुंता होतो.


एके दिवशी सहज आपण पुन्हा अनुदिनी पाहतो आणि कुतूहल वाटतं. "इतक्या दिवसात आपण काहीच कसं लिहिलं नाही?"


तत्काळ बांध ढेपाळतो आणि नदी वाहू लागते. एक रचना मूर्त स्वरूपात प्रकटते. बहुधा असे होणे हाही सृजनाचाच भाग असेल. सांप्रत बरेच शेले गुंफले आणि गुंतले आहेत. आता जेव्हा कविता पूर्ण होईल तो सुदिन. तोवर बाकी रचना वाहतील, :)


असे अनुभव तुम्हालाही आले असतील. त्यावर तुम्ही काय उपाय करता हे जाणून घ्यायला मला आवडेल.