स्सो ची

म्हणजे भ्रमणध्वनी! तसे चीनी भाषेत दूरध्वनीला त्येन व्हा (इंग्रजी शब्दरचनेनुसार तिएन हुआ) म्हणतात आणि भ्रमणध्वनीला स्सो ची. आता प्रांत, व्यक्ती, लकबी नुसार याचा उच्चार स्सो ची, सो ची, शो ची असे होतात. तर सांगायचे असे की चीनी जीवनाचे भ्रमणध्वनी हे एक अविभाज्य अंग आहे असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरू नये. अन्न, वस्त्र व निवारा या बरोबर चिन्यांची; विशेषतः तरुण पिढीची भ्रमणध्वनी ही एक मूलभूत गरज झाली आहे.


कधीही, कुठेही पाहा; साधारण आजूबाजूचे किमान ३०% चीनी आपल्या हस्तसंचावर मग्न आढळतील. नव्या पिढीला हे एक व्यसनच आहे म्हणाना. काही गोड तरुणी हळुवारपणे बोलत असतात, काही तरुण बेदरकार पणे घरात असल्यागत मोठ्याने बोलत असतात तर काही जण तावातावाने मोठमोठ्याने ओरडत असतात, अगदी समोर उभ्या असलेल्याला झाडावे वा त्याच्याशी भांडावे तसे. अगदी लहान गावातल्या सायकल रिक्शावाल्यापासून ते बड्या आसामीपर्यंत सर्वांकडे हा असलाच पाहिजे! इथे संभाषण अविरत आणि अव्याहत चालू असणे हे प्राणवायू मिळण्याइतके आवश्यक. अगदी हॉटेलचे तळघर वा उदवाहनात देखिल संभाषणात खंड पडता कामा नये. अनेक उदवाहनात चायना टेलिकॉम चे चिन्ह असलेल्या पाट्या  दिसून येतात, म्हणजे उदवाहनात शिरल्यानंतरही संभाषणात व्यत्यय येणार नाही याची हमी.


प्रत्येक प्रांताची, देशाची, दूरध्वनीवर बोलायची एक खास पद्धत वा लकब असते. पाश्चिमात्य देशात दूरध्वनी घेणारा लगेच आपण कोण ते जाहीर करून कोण बोलताय ते विचारतो. कुठे फक्त हॅलो म्हणून पलीकडून संभाषण सुरू होण्याची वाट पाहतात, तर पुण्यात पु̮लं. नी सांगितल्याप्रमाणे 'कोण बोलताय' म्हणून खेकसतात. गुजराथी तर खासच! स्वतः दूरध्वनी संपर्क जोडतात आणि पलीकडून उचलल्यावर स्वतःच 'कॉण' म्हणून विचारतात. आपल्या महाराष्ट्रात एकूण अतिशय मग्रूर समजल्या जाणाऱ्या पोलिसांना कधी दूरध्वनी करून पाहा, तुम्हाला धक्काच बसेल. घंटा वाजताच पोलीस स्थानकातून "नमस्कार, वांद्रा पोलीस स्टेशन, कॉन्स्टेबल शिंदे बोलतोय' असा अगदी स्नेहार्द्र आणि नम्र प्रतिसाद मिळतो. जणू तो भगवंतासारखा तुमच्या हाकेला धावूनच येणार आहे.


इथे चीनमध्ये हाक देताच पलीकडून 'वेऽय' असा प्रतिसाद येतो. पलिकडच्या व्यक्तीचे संभाषण ऐकताना आ आ, हॉ, होदा-होदा असे उद्गार निघत असतात. खाण्याखालोखाल चीनी माणूस जर कशात रममाण होत असेल तर तो भ्रमणध्वनीवर. इथे साधारण प्रत्येकाकडे दोन हस्तसंच आणि दोन क्रमांक असतात. मग एक सिडीएमए व एक जिएसेम असे असते की एक आवडत्यांसाठी आणि एक नावडत्यांसाठी हे तेच जाणोत. घडीचे वा वरचे झाकण सरकवून संभाषण करायचे हस्तसंच विशेष लोकप्रिय. दुचाकीवरून जाताना खांदा आणि कान यांच्यामध्ये हस्तसंच धरून धावते संभाषण करणारे भरपूर दिसतात. काल चावझाव मधून फिरत असताना मामा लोक शिरस्त्राण न घालता दुचाकीवरून फिरणाऱ्यांना अडवून दंड वसूल करताना दिसले. आमचा चालक ही गंमत पाहायला पोलिसांच्या समोरच थांबला होता, मात्र वाहन चालवत असताना बेटा बिनधास्त भ्रमणध्वनीवर बोलत होता. ज्याअर्थी त्याला हटकले नाही त्या अर्थी तिथे वाहन चालवताना भ्रमणध्वनी वापरणे हे निषिद्ध नसावे.


पहिल्यांदा गेलो तेंव्हा इथले स्थानिक संजिवनपत्र (सिम कार्ड)विकत घेणे अधिक इष्ट हा साक्षात्कार झाला. यामुळे सर्व चीनी संबंधित आपल्याला व आपण त्यांना सहज व कमी खर्चात गाठू शकतो. पुढच्या वेळेपासून शहाणा झालो. कार्यक्रम ठरला, की जिथे प्रथम पोहोचणार तिथल्या ठकिला आपले संजिवनपत्र आगाऊ विकत घेऊन आपला भावी क्रमांक इ-टपालाने कळवायला सांगतो. यामुळे जायच्या आधी सर्व संबंधितांना तिथे दाखल होण्यापूर्वीच माझा 'चुंग क्वो हाव' म्हणजे चीनी क्रमांक आगाऊ कळवता येतो. तिथे उतरताच प्रथम स्वागताला आलेली मंडळी घेऊन ठेवलेले पत्र सादर करतात. जाताना एक अतिरिक्त हस्तसंच घेऊन जायचा. म्हणजे भारतीय व चीनी असे दोन्ही संपर्क जिवंत राहतात.


मग त्यानंतर जसा देश तसा वेष या नात्याने मीही दोन हस्तसंच घेऊन फिरतो. चीनी परंपरेला जागून मीही विमान उतरताच घाईघाईने ते थांबायच्या आतच हस्तसंच चालू करतो, आणायला आलेले मला उतावळेपणाने साद देतात आणि मीही मोठ्याने 'वेऽई' असा प्रतिसाद देतो.