काही वेगळ्या महत्त्वाकांक्षा

काहीतरी भव्यदिव्य करण्याची महत्त्वाकांक्षा प्रत्येकालाच असते. त्याचप्रमाणे काही अचंबित करणाऱ्या वेगळ्या महत्त्वाकांक्षा आपल्यापैकी बऱ्याच लोकांना असते. काही जणांना त्या पूर्णत्वास नेणेही साधते. तर काही आकांक्षा अपूर्णच राहतात. हे असले तरी या आकांक्षा मांडणे हासुद्धा एक आगळाच अनुभव असतो ना? चला तर मग, वेगळेपणाचे दर्शन घडवणाऱ्या महत्त्वाकांक्षा मांडू या. येथे निखळ आनंद अपेक्षित आहे, कुणावरही कसलीही टिका करण्याचा उद्देश नाही. सर्वांनी हलकेच घ्यावे ह्या विनंतीसह सुरुवात माझ्यापासूनच करतो.

 

१. हिंदी चित्रपटातील टपोरी गाणी भजनी ठेक्यावर घेणे.
२. पानवाल्याच्या आजूबाजूला टाकलेल्या पिंकांची छायाचित्रे मॉडर्न आर्ट म्हणून लिलावासाठी ठेवणे.
३. पुण्यातील खड्ड्यांमध्ये नौकायनाचे वर्ग चालवणे.
४. विरोप टेनिस (ई-मेल टेनिस) ह्या स्पर्धाप्रकारास ऑलिंपिकमध्ये मान्यता मिळवून देणे. (टेनिस या खेळात जसे चेंडू प्रतिस्पर्ध्याच्या गोटात टोलवायचा असतो तसेच कुठलीही जबाबदारी दुसऱ्याच्या गळ्यात मारून कागदी घोडे नाचवण्याच्या प्रकारास विरोप टेनिस म्हणतात).
५. कुडमुड्या ज्योतिष्यांची समभाग बाजारामध्ये (शेअर मार्केट) वित्त विश्लेषणासाठी नियुक्ती करणे.
६. वाद्य हा वाजवण्याचा प्रकार नसून श्रोत्यांना छळायचे अमोघ शस्त्र आहे ह्या शोधास कृतीत आणणाऱ्या संगितमल्लांना संगितरत्न पुरस्कार देणे.
७. धर्म ही अफूची गोळी असल्याचा प्रवाद आहे. त्यामुळे, राजकारणात अधिकृतरीत्या अधर्म करण्याची अनुमती देणारा कायदा पारित करणे. (अवांतर - तशी कायद्याची आवश्यकता आहे का?)
८. कीटकनाशकांना शीतपेये म्हणून घोषित करणे.
९. क्रिकेटमध्ये लगेचच बाद होण्याचा विक्रम करणाऱ्या खेळाडूंसाठी काष्ठमहर्षी हा नवीन पुरस्कार सुरू करणे. (काष्ठ म्हणजे म्हाताऱ्याची काठी, ह्या महान खेळाडूंसाठी चेंडूफळी ही तशीही म्हाताऱ्याच्या काठीसारखीच असते ना?)
१०. आकांक्षा क्र. ४, ७ आणि ९ च्या अनुषंगाने यापुढील लेखामध्ये कंसात व्याख्या लिहिण्याऐवजी संपूर्ण लेखच कंसात लिहिणे.

त्वरा करा, त्वरा करा आणि या संग्रहात आपणही भर घाला, :)

 

(शैलेश श. खांडेकर)