ट्यूलिप्सच्या गावा...(३)

आता पवनचक्क्या पहायच्या होत्या,आणि चीजचा कारखाना..


युरोपातला प्रवास नेहमीच सुखकर असतो,वाहन कोणतेही असो.एकतर प्रदूषण कमी,घाण,कचरा नाही,रस्ते बिनखड्ड्यांचे! वाहन चालवायलाही सुख आणि आजूबाजूला पहायला सृष्टीचा खजिनाच. चीज म्युझियम,कारखाना आणि जुन्या पवनचक्क्या पाहण्यासाठी फुलांच्या राज्यातून नाइलाजानेच निघालो.


आणि काय सांगू? चित्र काढावे ना,तस्सा देखावा दिसायला लागला. जुन्या पद्धतीच्या पवनचक्क्या,सगळीकडे 'हरिततृणांच्या मखमालीचे गालिचे', रंगीबेरंगी तृणफूले,पाण्याचा खळखळाट करणारे झरे आणि मागे विस्तीर्ण जलाशयही!सगळी कडे स्तब्ध शांतता आणि त्या शांततेचा भंग करणारा पक्षांचा कलरव,मध्येच बदकांचे 'क्वॅक,क्वॅक' आणि हा निसर्गाचा देखावा आपल्या कागदावर चितारणाऱ्या हौशी आणि पट्टीच्या कलाकारांची समाधी...आमचीही भावसमाधी लागू लागली.


चीजची आधुनिक फॅक्टरी आहेच आणि म्युझियमही आहे,पण तिथे पारंपारिक पद्धतीने गवळी,शेतकरी चीज कसे करतात हे सुद्धा पहायला मिळते.आणि ताज्या चीजचे असंख्य प्रकार चाखायलाही मिळतात. जुन्या पद्धतीच्या युरोपियन घरातच ही फॅक्टरी आहे.तिथे चीज तयार करणे चालू होतेच. ती एक मोठ्ठी प्रक्रिया आहे.आतल्या एका खोलीमध्ये चीजविक्री चालू होती.कुतुहलाने आम्ही पाहत होतो.smokecheese ला धुराचा वास येत होता. जिरे,मिरे,ऑलिव्हज,पाप्रिका(ढोबळी मिरची),पेप्रोनी (मिरची),लसूण,कांदा असे अनेक पदार्थ घालून वेगवेगळ्या प्रकारची चीज तिथे होती.(कॅलरींचा हिशेब चीजफार्मच्या बाहेरच ठेवून आत यावे,हेच खरे!)सकाळी नयनसुख झाले ,आता रसनासुख !


तिथेच एका ठिकाणी मला मेथीदाणे घातलेले चीज दिसले आणि मी उडालेच!कारण या लोकांना मेथी माहिती नाही.तिथल्याच एका चीजसुंदरीला विचारले तर ती म्हणाली ह्या बिया भारतातून येतात.'मेथी' मला अशी हॉलंडमध्ये चीजच्या आवरणात भेटेल असं वाटलंच नव्हतं.(एरवी मेथीकडे फारशा प्रेमाने न पहाणारी मी इथे आनंदून गेले होते)


तिथे आलेल्या इतर फिरंग्यांनाही मेथी माहिती नव्हतीच.fennugreek चे भारतीय  नाव methi असे मी तिला लिहून दिले आणि ती पण This is methi cheese. असे येणाऱ्या पाहुण्यांना सांगू लागली. चीजच्या मिश्र चवी तोंडात घोळवत आपापल्या पिशव्या जड करून आणि पैशाचे पाकीट हलके करुन आम्ही ऍमस्टरडॅम कडे निघालो.


हॉलंडचा स्वातंत्र्यदिन होता‌. सगळीकडे 'केशरी' प्रभाव दिसत होता. लोकांचे कपडे केशरी रंगाचे,केशरी आणि पांढऱ्या रंगाचे फुगे,पताका रस्तोरस्ती डोलत होत्या.रस्त्यांवर भरपूर  केशरी गर्दी (मला तर शिवसेनेच्या बालेकिल्ल्याचीच आठवण झाली!)समुद्रकिनारी तर जत्राच होती.विजेचे पाळणे,मेरी गो राउंड,एकीकडे डोंबाऱ्याचे खेळ चालले होते,कुठे गाण्यांच्या तालावर तरुणाई डोलत,थिरकत होती.खुद्द ऍमस्टरडॅम शहरात सुद्धा काही वेगळे चित्र नव्हते.कालव्यांच्या या शहरातील सगळ्या कालव्यांमधून बोटी ओसंडून वहात होत्या‌. संगीताच्या तालावर आबालवृद्ध डोलत,नाचत होते‌. संध्याकाळ केव्हाच झाली होती,पण उन्हाळ्यात दिवस मोठा असतो.९ पर्यंत सूर्यप्रकाश असतो. हवेतही उबदारपणा असतो.त्यामुळे सगळीकडे केशरी आल्हाद दाटला होता.


मागच्या वेळच्या आठवणी जाग्या करीत आम्ही चक्कर मारत होतो. हा रस्ता स्टेडियम कडे जातो,ते बघ व्हॅन गॉग म्युझियम, हा तर डॅम स्क्वेअर इथून थोडे चालत गेले की मादाम तुसाँच्या बाहुल्या.आणि अरे याच्या पुढच्या चौकात तर ऍन फ्रँक हाउस! असे आमचे सारखे एकमेकांना सांगणे चालू होते.त्या स्मृती जागवण्यात मोठी गंमत होती.त्याच भारलया अवस्थेत असताना घड्याळाचे काटे परतीच्या प्रवासाकडे खुणावू लागले.