अमराठी प्रांतातील मुलांची मराठी

महाराष्ट्राबाहेर रहाणारे सर्वच जागरुक पालक मुलांना चांगलं मराठी बोलता यावं यासाठी प्रयत्नशील असतात. या मराठी बोलायला शिकवण्यात बर्‍याच गमती जमती देखील घडतात. एकदा लेकराच्या आजोबांची प्रकृती जरा बरी नव्हती. त्यांना उकळवलेलं पाणी प्यायला सांगितलं होतं. आपल्या मराठी मित्राला हे सांगताना माझं लेकरु म्हणालं,'' माझे आजोबा आजकाल उकडलेलं पाणी पितात.''


असचं एकदा त्याच्या आजीला म्हणालं,' आजी ते भांड हलकट आहे. रॅक वरुन खाली पडलं तर तुला लागेल.'' सासूबाई अचंभित.... त्यांनी परत विचारलं,'' कसं आहे भांडं?'' लेकरु म्हणालं,'' ह ल क ट, म्हणजे लाइट वेट.'' या '' च्या वापरात बर्फट, (आंबट, कडवट, खारट सारखं) गोडट, (काळपट, हिरवट, पांढरट सारखं) लालट, निळट असे विचित्र शब्द त्याने बनवले.
एकदा ''चेंगट कुठचा'' असं म्हटल्यावर हात वेगाने चालवत म्हणाला,'' आता वेगट कुठचा म्हण नां !!!''.
आपलेही असे काही मजेदार अनुभव वाचायला आवडेल.