आम्ही सिनेमा पाहतो...

२००४ च्या ऑक्टोबर मधली गोष्ट‌. सहज एकदा T.V. लावला तर शाहरुख खान! इथे जर्मनीत BBC व CNN हीच काय ती दोन सायबाच्या भाषेतली चॅनेल्स,एक फ्रेंच आणि बाकी सगळी जर्मन चॅनेल्स! शाहरुख कसा असेल? ही शंका मनात, म्हणून नीट पाहिले,तर खरंच तोच आणि ती होती K3G अर्थात 'कभी खुशी कभी गम' ह्या सिनेमाची जाहिरात!हा सिनेमा जर्मन मध्ये डब करून (नावासहित- त्याचे जर्मन नाव: guten tagen wie in schweren tagen!)RTL2  या चॅनेलवर दाखवला जाणार होता दिवाळीत,आणि त्याची जाहिरात १५ /२०दिवस आधीपासून चालू होती.मला आणि दिनेशला आमच्या मित्रमैत्रिणींचे फोन,मेल्स यायला लागले "हा सिनेमा पहायला आम्ही तुमच्या कडे येणार!"


हा काही महान सिनेमा नव्हे.कचकड्या महालातल्या  श्रीमंती दुःखाला भरजरी आवरणात पेश केलेला सिनेमा! त्यातल्या कलाकारांमुळे जरा सह्य होतो इतकेच; पण इतर सिरियलमधल्या फिरंग्यांनी तो आपल्याला का आणि कित्ती,कित्ती आवडलाय हे डोळे टिपत सांगायची चढाओढच लावली आणि आमचे मित्रमंडळ आणि तमाम जनतेची उत्सुकता वाढू लागली.


शुक्रवारी ८वाजता सिनेमा सुरू होणार तर मंडळी ७.३० वाजताच आमच्याकडे हजर!ख्रिश्चनने सिनेमा रेकॉर्ड करण्याचा फतवा काढला.मला सगळी गंमतजंमतच वाटत होती, या टुकार सिनेमाला इतके फुटेज?पण सुझनचा फोन आला की तिला येता येणार नाहीये तरी तिच्यासाठी सिनेमा रेकॉर्ड करा..यावियर (हे लोक झेवियरला यावियर म्हणतात.आणि ja= जा ला या! ) तर यावियरची "भारतीय जेवण कर ."अशी 'आर्डर' देऊन झाली.आपापल्या फर्माइशी पण यायला लागल्या. हा प्राणी पुलावावर अडून बसला होता, ख्रिश्चनला ब.वडे हवे होते तर श्वेन,रोमेन 'काहीही कर पण भरऽऽ पूर कर आणि मस्त चमचमीत कर' या गटातले होते.आमचे हे मित्र बकासुराचे अगदी सख्खे नसले तरी मावस,चुलत,आते इ,इ भाऊ आहेत त्यामुळे सकाळपासूनच माझी स्वैपाकाची धांदल सुरू होती आणि जोडीला पसारा आवरणे सुद्धा.


असा सगळा सरंजाम तयार झाला,मंडळी जमली.पूर्वी रामायण पहायला लोक TV  समोर भक्तीभावाने जमायचे, हारबिर घालायचे (टीव्हीला!), रस्ते ओस पडायचे तेच दृष्य डोळ्यासमोर यायला लागलं... सिनेमा सुरू झाला. अमिताभ पासून ह्रतिक पर्यंत सगळे जर्मन बोलायला लागले आणि आमचे वीर टक लावून पहायला लागले.(आणि त्यांच्या शंकांचे निरसन करताना पुरेवाट झाली..) अमिताभ हेलीकॉप्टर मधून उतरतो तो प्रसंग चालू होता. अरेऽऽ हे लोक फारच श्रीमंत दिसतायत...तिकडे सिनेमा,इकडे एक्सपर्ट कमेंटस, जाहिरातींच्या ब्रेक मध्ये शंकानिरसन आणि गाण्यांचे इंग्रजी,जर्मनमध्ये अर्थ समजावणे (कारण संवाद डब केले होते पण गाणी हिंदीत german subtitles सहित होती) असे सिनेमा संपेस्तोवर चालू होते.


'शाहरुख जयाला खाली वाकून नमस्कार करतो.'   तो खाली का वाकला? 'ग्रीट' करताना पायाशी का वाकतात?तिने त्याच्या कपाळाला काय लावलं? या सगळ्या बायकांनी कपाळाला पिअर्सिंग का केलय?मी देवातलं कुंकू आणि माझ्याकडच्या टिकल्या दाखवल्या." ह्या तर खडे वाल्या नाहीत,त्या बायकांनी जे लावलय ते वेगळं आहे.ते पिअर्सिंगच आहे.तुलाच नीट माहिती नाही."पुढचा बराच वेळ मी खडेवाल्या टिकल्या शोधण्यात घालवला,आणि जेव्हा त्या दाखवल्या तेव्हा या महाशयांची खात्री पटली.


'आलोकनाथ मरतो' तो प्रसंग.." तुमच्या धर्मात अंत्ययात्रेला पांढरे कपडे घालतात,आमच्यात काळे घालतात"अशी सांस्कृतिक देवाण घेवाणही झाली.


जेवता जेवता हात तसाच ठेवून टी.ही.वरची नजर न हटवता सिनेमा पाहणे सामुदायिकरीत्या चालू होते.काजोलला करीनापेक्षा जास्त मार्क देऊन झाले, ब्रेक मध्ये गाणी शिळेवर वाजायला लागली, चुडीदार,झब्बा पाहून "किती छान कपडे आहेत? तू असे कपडे हपिसात का नाही घालून येत?" अशी दिनेशची विकेट निघाली,आणि  "पुढच्या वेळी तिकडे जाल तेव्हा असे कपडे आणा" असा आदेश आला.आमची करमणूक ही मंडळी करत होती.शेवटी अमिताभ, शाहरुख,ह्रतिक यांचे भावनिक प्रसंग आले.यावियर उठून म्हणाला "मला डॅडला फोन करावासा वाटतोय,आता मी रडेन.."मला हसूच यायला लागलं. त्यावर त्याचा ओरडाही खायला लागला.आमच्या बऱ्याच हिंदी सिनेमात रडायला 'फूल्ल स्कोप' आहे हे त्याला सांगता सांगता आणखीच हसू यायला लागलं.


यश चोप्रा,करण जोहर आणि मंडळींनी त्यानंतर इथे बॉलिवूड सिनेमांचा सिलसिलाच चालू केला.मोहब्बते,वीर-झारा,काल, कल हो ना हो,लगान,स्वदेस असा दरमहा एका सिनेमाचा जर्मन रतिब सुरू झाला.(त्यांची नावं पण जर्मनाळली.)त्यांच्या DVD दुकानातून दिसायला लागल्या. त्यातले बरेचसे सिनेमे 'कचकड्याच्या महालातले' ,हिंदीत पहातानाही कष्ट होणारे होते,तर जर्मन मध्ये कोण पहात बसणार?पण 'स्वदेस मात्र जर्मन मध्येही भावला.अर्थात आता त्यातलं नाविन्य आता संपलं आहे,तरीही 'आता कोणता हिंदी सिनेमा जर्मन मध्ये येतो आहे?'याची एक उत्सुकता उगाचच असते.