आमचे सख्खे शेजारी

"यशाचा मार्ग पोटातून जातो,"असं म्हणतात.आमच्या मैत्रीच्या नात्याच्या सुंदर गुंफणीची पायवाटही पोटातूनच गेली..


आजीने सांगून ठेवले होते ना,कधीही ये खाली गप्पा मारायला,मी काय?पडत्या फळाची आज्ञा घेऊन खरचच कधीही जायला लागले खाली. आजी बोलघेवडी, आजोबा समोरच्याशी आपलं जमतं का? याचा अंदाज घेऊन बोलणारे,आणि मग खुलणारेही! त्या दोघांच्या मनात भारताबद्दल कुतुहल अगदी दाटलेलं होतं. त्यांच्या मित्रपरिवाराकडून भारताबद्दल,भारतीय जेवणाबद्दल खूप काही ऐकलेलं होतं.बरेच भारतीय फक्त शाकाहार करतात,अंडी सुद्धा खात नाहीत,मग नक्की खातात तरी काय?(बहुतेक फक्त कंदमूळंच खाऊन राहत असतील गरीब बिच्चारे! असे भाव चेहऱ्यावर!)जेव्हा साध्या कांदाबटाट्याच्या रश्शापासून इडलीसांबार,ढोकळा, गाजरहलवा,बासुंदी पर्यंत अनेक पदार्थ त्यांनी चाखले तेव्हा त्यांना शाकाहार सुद्धा interesting  असतो हे समजले.
इथे भारतीय उपाहारगृहे आहेत, पण सगळी पंजाबी!त्यामुळे इथे लोकांना समोसा माहिती आहे,आवडीने खातात सुद्धा,पण बटाटावडा माहिती नाही.(इथे कोणा जोशी,कुलकर्णीचा वड्याचा गाळा नाही ना!!) आकिम आजोबांची खुल्ली ऑफर आहे,गॅरेज मध्ये बटाटेवड्याचा स्टॉल लावायची.गल्ल्यावर आजोबा बसणार,आजीने जाहिरात करायची आणि आम्ही वडे करायचे!!
पूर्वी चाळीत,वाड्यात जसा शेजार असायचा ना,तसे राहतो आम्ही.कितीतरीदा एकत्र चहाकॉफी,जेवणं तर होतातच,पण कधी लहर आली की न ठरवताही अंगतपंगत असते आमची.गणपती,दिवाळी,होळीला ते हटकून आमच्याकडे असतात, तर नाताळ,३१ डिसेंबर आणि त्या दोघांच्या वाढदिवशी आम्ही त्यांच्याकडे! काहीतरी वेगळे जेवायला केलं,गोडधोड केलं की झाला आपल्या दृष्टीने वाढदिवस साजरा,पण आमचे वाढदिवस विचारून,लक्षात ठेवून त्या पहाटेलाच दाराबाहेरच्या मांडणीत सुंदर सजवलेला केक(आजीमेड),फूलं आणि शुभेच्छापत्र असं पाहिलं आणि खरच भरुन आलं.
आजोबा मूळचे बर्लिनचे तर आजी बायरीश,म्युनशेन(म्युनिक)जवळच्या एका छोट्या खेड्यातली.इथे काही वधुवरसूचक मंडळं नसतात, तर त्या दोघांचे लग्न कसे झाले? असा प्रश्न आम्ही एकदा त्यांना विचारला.दुसऱ्या महायुद्धाच्या काळात तरुणांना युद्धशिबिरात काम करणे सक्तीचे होते,आजी आणि आजोबा दोघे डॉर्टमुंडच्या शिबिरात होते,दोघेही घरापासून लांब,दोघांच्याही ओळखीचे तिथे इतर कोणी नव्हते.त्यामुळे साहजिकच त्यांची मैत्री झाली आणि पुढे प्रेमात रुपांतर आणि लग्न!एकदम मला माहेर,ललना,सकाळ अशी महिलामासिकातली कथा वाचत असल्यासारखंच वाटलं,पण ही खरी प्रेमकथा होती,४८ वर्षांपूर्वीची!आणि आजोबांनी तारीखवारासकट ते दोघं कधी,कसे भेटले ते सांगितल्यामुळे तर फारच कौतुक वाटले आम्हाला.
लगेचच आम्हाला प्रश्न होते,तुमचे लग्न झालेय का? कधी झाले?कसे झाले?आणि तुमचे हे कितवे लग्न?म्हटलं लग्नाशिवाय कोण इथे राहू देईल? हेच पहिले आणि शेवटचे, सात जन्मांच्या ऍडवान्स बुकिंग सकट!इथे लोक बिनलग्नाचे एकत्र राहतात,२,३ मुलं झाल्यानंतरही लग्न करतात,नाही पटलं तर काडीमोड घेतात आणि दुसरा घरोबा करतात.त्यामुळे त्यांचे असे प्रश्न काही गैर नव्हते पण आम्हाला ते त्यावेळी विचित्र वाटले.
कधी रंगात आले की युद्धाच्या काळातल्या अनेक गोष्टी पोतडीतून बाहेर निघतात.त्या काळात रेशनिंग असायचं,सगळ्याच गोष्टींचं.पाव सुद्धा माणशी अमुक पाउंड असा मोजून मिळत असे. जर दुसऱ्या गावाला काही कामासाठी जाणे झाले तर आपले रेशनकार्ड घेऊन शिधादुकानात जायचे,तिथे कोणत्या गावाला,किती दिवस जाणार याची 'एन्ट्री'करून घ्यायची,मग ज्या गावाला जाल तिथे हे कार्ड दाखवले की तिथे आपल्या वाट्याचा पाव,दूध इ.पदार्थ मिळणार!
आपल्याकडे गेल्यावर्षीपासून वीजटंचाई सुरू झाली.रोज २,३ तास वीज नाही. एकदा नेटवर बहिणीशी चॅट करत होते आणि वीज गेल्याने आमचे बोलणे अर्धेच राहिले,त्यामुळे वैतागून गेले होते.एवढ्यात खालून आजोबांनी कशाला तरी बोलावले,मला वैतागलेले पाहून काय झाले? असं विचारले सुद्धा.मी कारण सांगितले तर म्हणाले अग,युद्धाच्या काळात बर्लिन मध्ये फक्त २ तास वीज असायची ,२२ तास वीज नाही! आणि बर्लिनची थंडी तुला माहितच आहे,बोचरे गार वारे,दाराच्या फटीतून सुद्धा तो गारवा आत यायचा,भिंती गार पडायच्या. हिवाळ्यात ८.३०/९ शिवाय नीट उजाडत नाही आणि ३.३०/४ लाच गुडुप..हे तर तुला माहितीच आहे.मी खजिल! किती बारीक सारीक गोष्टीत आपण कुरकुर करतो ते जाणवले.आणि एवढी  प्रतिकुल परिस्थिती अनुभवहून सुद्धा किती आनंदी असतात आजीआजोबा!
रोजच्या अशा अनेक छोट्या छोट्या प्रसंगातून ते दोघं आम्हाला उमगत गेले.
         "सांगा कसं जगायचं?
          रडत,रडत की गाणं म्हणत?
          तुम्हीच सांगा.."
मंगेश पाडगावकर आठवले एकदम!


 


(क्रमशः)