आगळावेगळा पक्षी -३

दक्षिण अमेरिकेतील पेंग्विन्स
चिली आणि अर्जेंटिनाच्या किनाऱ्यांवर मॅगॅलॅनिक पेंग्विन्स व हम्बल्ट पेंग्विन्स आढळतात. याशिवाय फॉक्लंड बेटांवर जेंटू, रॉकहॉपर,मॅगॅलॅनिक आणि मॅकरोनी पेंग्विन्स आढळतात. यापैकी जेंटू पेंग्विन्सची माहिती आपण आधी करून घेतली आहे.


samap1
नारिंगी ठिपके- हम्बल्ट पेंग्विन्सची वस्ती
लाल ठिपके - मॅगेलॅनिक पेंग्विन्सची वस्ती
निळे ठिपके - रॉकहॉपर पेंग्विन्सची वस्ती
हिरवे ठिपके -जेंटू पेंग्विन्सची वस्ती
काळे ठिपके - मॅकॅरोनी पेंग्विन्सची वस्ती


hum5हम्बल्ट पेंग्विन्स- हम्बल्ट पेंग्विन्सना पेरुवियन पेंग्विन्स म्हणतात. हे चिली आणि पेरूच्या किनाऱ्यावर व लगतच्या बेटांवर आढळतात. हम्बल्ट नावाच्या युरोपियन संशोधकाने ह्यांचा सर्वप्रथम शोध लावला म्हणून त्यांना त्याच नावाने ओळखतात. हम्बल्ट पेंग्विन्स आफ्रिकन पेंग्विनसारखे दिसतात पण हम्बल्ट आकाराने लहान असतात व त्यांचे पंख आफ्रिकन पेंग्विन्सपेक्षा मोठे असतात हा मुख्य फरक आहे




.


mag5मॅगेलॅनिक पेंग्विन्स मॅगेलॅनिक पेंग्विन्स अर्जेंटिना, चिली व फॉक्लंडच्या खडकाळ किनाऱ्यावर राहतात. हे त्यातल्या त्यात उष्ण हवामानात राहणारे सर्वात मोठे पेंग्विन्स आहेत. त्यांच्या मानेवर एक रुंद काळा पट्टा असतो व त्यांच्या पोटावर एक उलट्या घोड्याच्या नालेच्या आकाराचा पट्टा असतो. त्याशिवाय त्यांच्या छातीवर बारीक ठिपके असतात. त्यांची उंची अंदाजे २७ इंच आणि वजन ४ किलो असते. ह्या पेंग्विनची मादी दोन अंडी देते आणि दोन्हीतून पिले बाहेर येतात.

नर आणि मादी आळीपाळीने अंड्याचे रक्षण करतात व पिलांना भरवतात. गरम हवामानाच्या कालखंडात त्याच्या डोळ्याभोवती असणारी पिसे कमी होतात व त्या जागी फिकट गुलाबी पट्टा तयार होतो. हिवाळ्यात त्यांना पुन्हा पिसे पूर्वीसारखी वाढतात. रॉकहॉपर आणि मॅकरोनी पेंग्विन्सची माहिती आता करून घेऊ या.


rock8रॉकहॉपर पेंग्विन्स- अंटार्क्टिक भागातील बेटांवर हे पेंग्विन्स आढळतात. त्यांना हे नाव त्यांच्या दगडावर उड्या मारत जाण्याच्या सवयीमुळे दिले आहे. ते १८-२३ इंच उंच असतात व त्यांचे वजन अंदाजे ५ ते ८ पौंड असते. ( २-३ किलो). त्यांच्या डोक्यावर लक्षवेधक रंगाची पिसे असतात. हे 'क्रेस्टेड पेंग्विन्स' ह्या जातीचे पेंग्विन्स आहेत. ह्यांचा आवाज मोठा व कर्कश असतो. ते चटकन कुणावरही हल्ला करतात. नर आणि मादी आळीपाळीने १० - १० दिवस अंड्याचे रक्षण करतात. साधारण ३०-३२ दिवसात पिलू बाहेर येते.



macaroniमॅकॅरोनी पेंग्विन्स
या बेटांवर आढळणारे मॅकॅरोनी पेंग्विन्स आफ्रिका आणि दक्षिण आफ्रिका खंडाच्या टोकालगत तसेच अंटार्क्टिका भागातल्या बेटांवरही आढळतात.

दगडांच्या फटीत किंवा चिखलात छोटे भोक पाडून मॅकॅरोनी पेंग्विन्स घरटे करतात. ते दोन अंडी घालतात. त्यापैकी आधी घातलेले अंडे आकाराने लहान असते. कित्येकदा त्यातून पिलू बाहेर येत नाही. एकमेकांशी लढण्यात ते फुटते. किंवा इतर प्राण्याने खाल्ल्यामुळे त्याचा नाश होतो. दुसरे अंडे आकाराने मोठे असून त्यातून पिलू बाहेर येते. अंडे उबवण्याचे काम नर आणि मादी दोघे आळीपाळीने दीर्घ काळ करतात. : ३३ ते ३७ दिवसात ह्या अंड्यातून पिलू बाहेर येते. २३ ते २५ दिवस नर नवजात पिलाची काळजी घेतो. त्यावेळी मादी पिलाकरता अन्न आणते. पिलू ६० ते ७० दिवसांचे झाले की पिलाचे पंख तोपर्यंत बळकट होतात आणि ते स्वतः अन्न मिळवू शकते. तोपर्यंत त्याचे माता पिता त्या पिलाची काळजी घेतात आणि दर एक दोन दिवसांनी त्याला अन्न भरवतात. यापुढील भागात आपण दक्षिण आफ्रिकेतील काही पेंग्विन्सची माहिती बघू.


वाचकांनी त्यांना असलेली पेंग्विन्सची माहिती प्रतिसाद जरूर लिहावी अशी त्यांना विनंती.


संदर्भ: भाग १ आणि २ चे.