आगळावेगळा पक्षी- १

 आगळावेगळा पक्षी- १              


        रंगीबेरंगी पिसारा फुलवणारा मोर, झाडावर टकटक आवाज करत लाकूड तोडणारा सुतार पक्षी, एका पायावर झोपणारा हेरॉन, आपल्या चोचीलगतच्या पिशवीत एक मोठा मासा ठेवू शकणारा पेलिकन, वेगाने पंख हालवणारा हमिंगबर्ड ही काही वैविध्यपूर्ण पक्षांची उदाहरणे आहेत. या सर्वाहून अधिक लक्ष वेधणारा पक्षी म्हणजे पेंग्विन असे आम्हाला वाटते.


आश्चर्य म्हणजे या पेंग्विनला उडता येत नाही पण गोठवून टाकणाऱ्या गार पाण्यात वेगाने पोहता मात्र येते. पाण्यात खोलवर उडी मारता येते, पोहता येते आणि तेवढ्याच वेगाने पाण्यातून कित्येक फूट वर उडी मारता येते. एवढेच नाही तर इतर पक्ष्यांप्रमाणे वाळक्या काटक्या, पाने फक्त याचा वापर ते घरट्यासाठी करत नाहीत तर  काही पेंग्विन पक्ष्यांचे घरटे दगडाचेसुद्धा असते. ह्या लेखात आपण पेंग्विनची आणखी काही वैशिष्ट्ये पाहू.


एका जातीच्या  पेंग्विन पक्ष्याची मादी अंडं देते आणि दूर समुद्रात निघून जाते.  पेंग्विन जोडप्यातील नर आपल्या पायावर अंडं सांभाळून ठेवतो. त्याच्या पोटावरील एका पडद्यामुळे ह्या अंड्याला ऊब मिळते . अंड्यातून पिलू बाहेर यायच्यावेळी मादी परत येते आणि आपल्या चोचीने राखाडी रंगाच्या छोट्या पिलाला भरवते. त्या वेळी नर अन्नाच्या शोधार्थ निघतो.


पेंग्विनचे फिक्क्या रंगाचे पोट आणि गडद रंगाची पाठ त्यांचे शत्रूपासून संरक्षण करते. पोटाच्या फिकट रंगामुळे पोहताना ते पाण्यातील इतर प्राण्यांना चटकन दिसत नाहीत. तर आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांना त्यांची गडद रंगाची पाठ आणि पाण्याचा गडद रंग ह्यातील भेद कळत नाही.


पेंग्विन पक्ष्याची एक जात दगडांचे घरटे करते. एका दुसऱ्या जातीचा पेंग्विन एका वेळी दोन अंडी देतो, एक आकाराने मोठे असते तर दुसरे लहान. फक्त मोठ्या अंड्यातून पिलू बाहेर येते असे आढळले आहे. पेंग्विन मग दुसरे लहान आकाराचे अंडे का देतो याचा उलगडा मात्र झालेला नाही.


पेंग्विनच्या वसाहती


दक्षिण ध्रुवावर जेथे बराच काळ रात्र आणि कडाक्याची थंडी असते तिथे पेंग्विन आढळतात.  उत्तर अमेरिका, युरोप आणि आशिया खंडात पेंग्विन आढळत नाहीत. या प्रदेशातील प्राणिसंग्रहालयात कधी कधी पेंग्विन दिसतात.  उत्तर ध्रुवाच्या आर्टिक भागातसुद्धा पेंग्विन्स आढळत नाहीत.


galapagosगॅलापागोस पेंग्विन्स 
 गॅलापागोस पेंग्विन्स हे उष्ण हवामानाच्या प्रदेशात गॅलापागोस बेटांवर आढळणारे सर्वात लहान पेंग्विन्स आहेत. ह्यांच्या मानेवर एक बारीक पांढरी रेषा असते. त्याच्या पोटावर वरची बाजू खाली दिसणारा घोड्याच्या नालेच्या सारखा आकार असतो.  ह्यांच्या पोटावरचे काळे ठिपके लहान असतात. त्यामुळे आपल्याला मॅगेलेनिक पेंग्विन्स व ह्यांच्यातील फरक समजतो. विषुववृत्ताजवळच्या गरम हवामानात आपल्या शरीराचे तापमान कमी ठेवण्याकरता हे पेंग्विन्स पाण्यात पोहतात व आपल्या अन्न शोधतात.  आपल्या पाय भाजू नयेत म्हणून हे त्यांना आपल्या पंखांनी झाकतात. हे पेंग्विन्स मुख्यतः लहान आकाराचे मासे खातात.
गॅलापागोस बेटे हीच सर्वात उत्तरेकडची पेंग्विनची वसाहत आहे. 


गॅलापागोस पेंग्विन्स


यापुढील भागात दक्षिण अमेरिका व अंटार्टिक भागात आढळणारे पेंग्विन्स व त्यांची माहिती पाहू.