बेला कांसा

आम्ही राहतो त्या कोपऱ्यावरच एक छोटेसे कौलारू घर आहे. फरसबंद अंगणात कडेने मेपल्स लावले आहेत आणि त्यांच्या सावलीत उन्हाळ्यात टेबलखुर्च्या मांडलेल्या असतात आणि रंगीत छत्र्या त्यावर सावली धरत असतात. हिवाळ्यात मात्र टेबलेखुर्च्या आणि छत्र्या गुंडाळून ठेवलेल्या दिसतात.बाहेरची 'बेला कांसा' ही पाटी आणि त्या अंगणातल्या खुर्च्या आणि तिथे खातपीत बसलेली माणसे  यावरून समजते की ते कोणाचे राहण्याचे घर नाही तर उपाहारगृह आहे. बाहेरगावाहून आलो की तिथून पिझापार्सल घेऊन घरी जाणे किवा तिथे खाणे यातून आमची त्या मालकाशी ओळख व्हायला लागली.मालक इटालियन,बायको जर्मन त्यामुळे दोन्ही देशातले पदार्थ मिळतात.
आतल्या हॉलमध्ये लहान मुले  घेऊन आलेले आईबाबा,सिनियर मंडळी, घोळक्याघोळक्याने मित्रमंडळी बिअर, कॉफीचा आस्वाद घेत  बसलेली असतात.प्रत्येक टेबलवर पांढराशुभ्र कागदी मेजपोस आणि तेलकट खडू ठेवलेले असतात,लहान मुलं पिझा येईपर्यंत चित्र काढण्यात,रेघोट्या ओढण्यात गुंग होतात. हा फिलिपो प्रत्येक टेबलापाशी जातो. सगळं नीट आहेना? विचारतो,कोपऱ्यातल्या इटालिअन ग्रुपबरोबर दंगा करतो.मध्येच मागे ठेवलेल्या आपल्या कॉफीच्या नाहीतर बिअरच्या पेल्यातून एखादा घोट घेतो आणि पुढच्या पाहुण्याचे स्वागत करतो. हो,गिऱ्हाईकाचे नाही पाहुण्याचेच.नेहमीचे लोक त्याचे मित्रच होऊन जातात.कोण नेहमी काय मागवतो, कोणाला काय आवडते हे त्याच्या बरोबर लक्षात असते.त्यापेक्षा वेगळे काही मागवले किंवा मेन्युकार्ड मागितले की विस्मयचकित नजरेने पाहतो.
आपल्याला कोणत्याही उडप्यापासून अगदी तारांकित उपाहारगृहात गेले तरी पाण्याचे पेले आधी टेबलावर येतात त्याची सवय, इथे जर्मनीत मात्र तुम्ही काय पिणार? असे विचारून त्यानुसार पेय येते.पाणी मागितले तरी 'सोडाच' येतो बरेचदा! गॅसविरहित पाणी बऱ्याच ठिकाणी नसतेच.मी 'नळाचे पाणी' मागितले की विचित्र नजरेने लोक पाहतात,त्याची आता मला सवय झाली आहे.फिलिपोने सुद्धा आधी माझ्याकडे असेच पाहिले,सोडा आणून दिला आणि म्हणाला याचे पैसे नाही घेत तुझ्याकडून.त्याला मोठ्या मुष्किलीने समजावले,बाबारे,मला साधे पाणीच हवे आहे! आम्ही त्याच्याकडे जवळच आहे,सोयीचे पडते म्हणून गेलो आणि त्याचे काही लाजबाब पदार्थ खाण्यासाठी परत परत जायला लागलो, आमची मित्रमंडळीही तिथे घेऊन जायला लागलो.काँबीनात्सिऑन-(त्याला दिनेश बहूच्या देशातली मिसळ म्हणतो)पास्त्याचे २,३ प्रकार शिजवून एकत्र करून चीझ आणि टोमॅटोबरोबर बेक करतात.ते इथे मी अनेक इटालिअन पिझ्झेरियात खाल्ले,पण बेला कांसातली चव काही निराळीच! मी लगेच घरी पाकप्रयोग सुरू केले,पण तसे जमेना! मग एकदा त्यालाच विचारले आणि भटारखान्यात जाऊन तो ते कसे करतो ते 'याची डोळ्यांनी' पाहिले.मग काहीसे त्याच्यासारखे जमले.
त्याला वाटते आम्ही एकाच होडग्यातले प्रवासी आहोत.आपल्या गावापासून, आपल्या माणसांपासून पोटासाठी दूरदेशी आलेले.. त्याच्या इटलीतल्या रम्य खेड्याची,तिथल्या लोकांची वर्णने तो ऐकवायला लागला की आमच्याही मनाचे विमान भारतात लँड होते. त्याची ८४ वर्षांची आई दरवर्षी त्याच्याकडे एखाद महिना येते,काटे चमचे पुसत तिथे गल्ल्यावर बसते.येणाऱ्या नेहमीच्या लोकांची विचारपूस करते.पण ना तिला इंग्रजी येत ना जर्मन ,तरीही आमचा संवाद चालतो. काही समजले नाही की ती इटालिअन मधून काहीतरी भरभर  बोलते आणि मग फिलिपो त्याचा अर्थ सांगतो.एकदा गेलो तर नेहमीच्या पांढऱ्या कागदी मेजपोसांऐवजी फुलाफुलांचे झालरवाले मेजपोस आणि गल्ल्यावर ही इटालिअन आजी! बघ,मी स्वतः शिवून आणले यावेळी हे सगळे मेजपोस,सांग बरं मला कसे आहेत ते?माझा वासलेला 'आ' मिटेचना किती वेळ!
'आज माझा वाढदिवस आहे' त्यानिमित्त ही 'ग्रापा'!! असं सांगून आम्हाला ग्रापाचा आग्रह तर कधी "सिन्योऽऽरा आज  पार्सलच घेऊन जा,मी लवकर बंद करणार आहे हं.आमच्या लग्नाचा आज १५वा वाढदिवस आहे." आणि लगेच तुमच्या लग्नाचा वाढदिवस कधी असतो? आणि किती वर्ष झाली तुमच्या लग्नाला?अशी विचारणा होते."ते बघ तू दिलेले हत्तीचं चित्र मी या भिंतीवर लावलं आहे‌. सगळयांना सांगतो मी माझ्या भारतीय मित्रांनी ते मुद्दाम माझ्यासाठी तिकडून आणलं आहे !!" असं उत्साहाने सांगत तिथे असलेल्या आणि चार जणांशी आमची ओळख करून देतो.
एका शुक्रवारी रात्री असंच आम्ही ५,६ जण बेलाकासात जेवायला गेलो. दंगामस्ती करत खाल्लंप्यायलं आणि बिल देऊन घरी आलो आणि मग लक्षात आलं की त्याने चुकून कमी पैसे घेतले आहेत.दुसऱ्या दिवशी दुपारी परत तिथे गेलो.आधी त्याला पटेचना की त्याने कमी पैसे घेतले आहेत‌. सगळा हिशोब त्याला समजावला तरी त्याने तो परत स्वतः केला आणि त्याच्या लक्षात झालेली चूक आली पण पठ्ठ्या उरलेले पैसे मात्र घ्यायला तयार नाही!'रात गयी बात गयी..'असं म्हणून वर आम्हालाच कॉफी पाजली,आणि आम्हाला अजून एक छान मित्र मिळाला.