सुट्टीच्या पर्यटनाचा उद्देश काय असतो? (सुट्टीचे पर्यटन: व्हेकेशन, किती साधा शब्द! आपल्याकडे ही संकल्पनाच नव्हती त्यामुळे त्यासाठी शब्द देखील नसावा.) चार घटका आपल्या रटाळ दिनक्रमातून बाजूला काढून कुठेतरी जाऊन मजा करणे, निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेणे, सगळ्या चिंता, दुखणी विसरून मनाला आणि मेंदूला विश्रांती देणे, काही दिवस एंजॉय करणे आणि मन आणि मेंदू तजेलदार झाल्यानंतर पुन्हा नवीन उत्साहाने आणि जोमाने आपापल्या कामाला लागणे! अस्मादिक पण एकदा ही भाबडी कल्पना डोक्यात घेऊन महाबळेश्वरला गेले. तसं पाहिलं तर फिरायला जाणे, हॉटेलवर राहणे याचा अनुभव गाठीशी आहे पण या खेपेस जरा प्रकर्षाने काही गोष्टी जाणवल्या. महाराष्ट्र टुरिझम डेवलपमेंट कॉर्पोरेशन (एमटीडीसी) च्या संकेतस्थळावर जाऊन त्यांच्या विश्रांतीगृहाचे (रिसॉर्ट) आगाऊ आरक्षण करावे या हेतूने तिथून त्यांचा दूरध्वनी क्रमांक घेऊन आम्ही फोन लावला.
"हॅलो, एमटीडीसी का?"
"बोला"
"मला तुमच्या अमुक-अमुक तारखांसाठी इकॉनॉमी प्रकारच्या खोलीचे आरक्षण करावयाचे आहे."
"असे फोनवरून होत नाही. आमच्या क्षेत्रीय कार्यालयात जा आणि तेथे करा." (यांचे क्षेत्रीय कार्यालय पुणे स्टेशनजवळ, मी राहतो चांदणी चौकाजवळ भुसारी कॉलनीत! ते बंद होतं ५ वाजता, माझे कार्यालय सुटते ६ वाजता! कसं जमणार? )
"कुणी एजंटस वगैरे आहेत का तुमचे पुण्यात?"
"असतील. जरा बघा की, चौकशी करा इकडे-तिकडे" (हॉस्पिटॅलिटी ईंडस्ट्रीमध्ये आहेत की पुण्यात मिसळ-पावचे दुकान चालवत आहेत देव जाणे!)
"साधारण किती दर आहेत खोल्यांचे?"
"ती सगळी महिती मिळेल तुम्हाला तिथे" (कुठे? विचारण्याच्या आत त्या नम्र सेवकाने फोन बंद केला. मी धन्यवाद म्हणालो ते तरी ऐकले की नाही काय माहित त्या विनम्र माणसाने.)
मी संकेतस्थळावरून एक जवळचा एजंट शोधून काढला आणि तिथे फोन केला. तिथल्या बाई म्हणाल्या की ५ वाजेपर्यंत आरक्षण करा कारण ५ वाजता एमटीडीसी चे आरक्षण बंद होते. मी बायकोला फोन केला आणि तिला तिथे जायला सांगीतले. एजंट म्हटल्यावर जास्त चांगुलपणाची अपेक्षा नाही करता येत. मिहीर की असलेच नाव होते एजन्सीचे. जी खोली पाहिजे होती ती मिळणार नाही असे तिथल्या बाई म्हणाल्या. कारण तिचे दर कमी होते. मग महागातली खोली आरक्षित केली. संपूर्ण रक्कम आगाऊ मागितली. सायंकाळी मी जाऊन सगळी रक्कम भरून आलो. त्यांनी भक्कम सेवा कर आणि सेवा मुल्य आकारून माझ्याकडून भली मोठी रक्कम घेतली. आम्ही एकदाचे महाबळेश्वरला पोहोचलो. मस्त गुलाबी थंडी होती. खूप छान वाटत होते. टॅक्सी करून एमटीडीसी च्या रिसॉर्टवर पोहोचलो. टॅक्सीवाला पण सहजासहजी सोडतो की काय, १.५ किमी अंतरासाठी ४० रुपये घेतले. आम्हाला खोली दाखविण्यात आली. आम्ही सामान टाकले. ३ पलंग होते. प्रत्येकाची लांबी आणि रुंदी वेगवेगळी होती. दोन पलंगांमधली फट साधारणपणे एक मध्यम आकाराचा उंदीर सहज जाईल एव्हढीच होती. टीव्हीच्या खालच्या टेबलाचे ड्रॉवर मोडलेले होते. मधल्या खोलीत एक जुनाट सोफा होता आणि एक मोडके टेबल होते. कोपऱ्यात पाण्याचे पिंप होते. फायरप्लेस होते पण त्याचा वापर करणे निषिद्ध होते. भिंतींचा रंग उडालेला होता. पडदे होते पण असे होते की बाहेरच्या खिडकीतून आतले सगळे स्वच्छ दिसावे. एका खिडकीला पूर्ण बंद करायची सोय नव्हती. रात्री तापमान ४-५ डीग्री से. जात असे. विचार करा त्या खिडकीमुळे काय हाल होत असतील. थंडीमुळे मरायची वेळ येत होती. कुठलाच दरवाजा (टॉयलेटचा देखील!) लागत नव्हता. आमच्यापैकी गाणं ही कुणाला चांगलं येत नव्हतं. २-३ वेळा रिसेप्शनला तक्रार करूनही काहीच झाले नाही. शेवटी आमच्या खोलीतून भसाड्या आवाजात गाणी ऐकू यायला लागली. सकाळी विशेषतः गाण्यांची संख्या जास्त असायची कारण टॉयलेट आणि बाथरूम एकत्र होते. रिसेप्शनवरून तत्परतेने आमची बॅग घेऊन एक कर्मचारी खोलीत घेऊन आला होता. खोलीचा अवतार बघून माझा जरा विरसच झाला. कर्तव्यदक्ष कर्मचारी जायला तयार नव्हता.
"इकडे टीव्हीचं बटन आहे, तिकडे गिझर आहे, इकडे लाईटचं बटन आहे, इकडे टीव्हीचं..." त्याचं चऱ्हाट सुरु होतं. त्याचा आशाळभूतपण माझ्या लक्षात आला. मी दाद देणार नव्हतो. ५० मीटर एक बॅग आणण्याचे कसले पैसे? तो निघून गेला. आम्ही जेवायला म्हणून एमटीडीसीच्या हॉटेलमध्ये गेलो. खुर्च्यांचे रेग्झीन फाटलेले, लाकूड कुजलेले असल्या खुर्च्या होत्या. मी विचार करू लागलो की असल्या खोलीचे भाडे या लोकांनी खुशाल ८०० रुपये/दिवस घ्यावे! यांना लाज ही वाटू नये? १८९१ मध्ये ब्रिटीशांनी हे रिसॉर्ट बांधले. थोडक्यात रया गेलेल्या संस्थानासारखी त्या रिसॉर्टची अवस्था होती. एकेकाळी खूप वैभव उपभोगलेली आणि नंतर नाकर्तेपणामुळे कफल्लक झालेली घराणी आपण पुष्कळ बघतो, तसलीच गत या एमटीडीसीच्या रिसॉर्टची होती. गतवैभवाच्या खुणा दिसत होत्या पण शासनाच्या हाती पडल्यावर त्याचं वैभव गेलं आणि नुसत्याच खुणा राहिल्या. शिवाय कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांनी आपल्या उद्धटपणामुळे आणि अधाशीपणामुळे त्याची आणखी वाट लावली होती. रिसेप्शनला अजून कसलासा टॅक्स भरावा लागला होता. लग्झरी टॅक्स होता तो! किती मोठा विरोधाभास, जे नाही त्याचा ही टॅक्स भरावा लागतो आजकाल. मला हसू आले. अजून यावर कडी म्हणजे रोज ५ तास लोडशेडींग होते. हाय रे देवा! रिसेप्शनला एक नुसता बघूनच ओळखू यावा की हा सरकारी कर्मचारी आहे, असा इसम बसला होता. मला वाटते की ग्राहकाशी मग्रुरीत, गुर्मीत बोलून त्याला घाबरविणे, त्याच्याशी सतत असहकार पुकारल्याप्रमाणे बोलणे, त्याच्या अडचणींचा जराही विचार न करणे ईत्यादी विशेष कौशल्यांचे एक खास प्रशिक्षण शासकीय कर्मचाऱ्यांना देत असावेत जेणेकरून सामान्य माणसाने सरकारच्या वाटेला जाऊच नये.
खोलीमध्ये मी जरा बेसावध होऊन पलंगावर स्वतःला झोकून दिले. इतका भयंकर आवाज रामसे बंधुंच्या चित्रपटांमध्ये देखील वापरला नसेल असा त्या पलंगाने चित्कार टाकला आणि पलंग गदागदा हलला. माझा विरस बघून त्यालाही गदगदून आलं बहुधा. पहिल्या खोलीतल्या ३ दिव्यांपैकी २ बंद होते. खोलीत कुठल्या गोष्टीसाठी कुठे फोन करावा याची माहिती पुस्तिका, कँटीनचे मेनू कार्ड वगैरे साध्या साध्या गोष्टी देखील नव्हत्या. फार खर्चिक आहेत या गोष्टी असे वाटत नाही. दुपारी एक सरकारी कर्मचारी खोली साफ करण्यासाठी आला. ५ मिनिटात त्याने खोली साफ केली किंबहुना तसे भासवले आणि माझ्याकडे आशाळभूतपणे पाहू लागला. मी सरळ दुर्लक्ष केले. पैशासाठी इतके लाचार होणे यापेक्षा किळसवाणी आणि लज्जास्पद गोष्ट ती काय असावी? तो निघून गेला. खूप चांगली सेवा मिळाली तर खूश होऊन कधीतरी चुकून बक्षिस देणे मी समजू शकतो पण काहीही चांगले न देता पैशाची अपेक्षा ठेवायची याचं समर्थन कसं करता येईल? हॉटेलमध्ये जेवण संपत आल्यावर वेटर टेबलापाशी घुटमळत असत. हे सगळीकडेच असते. टॅक्सीवाले अव्वाच्या सव्वा पैसे घेऊन लुबाडत असत. जिथे जाऊ तिथे गाईड या उपद्रवी प्राण्यांनी उच्छाद मांडला होता. त्यांना काही फार माहित होते असे ही नाही, पण गराडा घालून पर्यटकांना कसे लुबाडावे हे चांगलेच माहित होते. हे माहित असणे म्हणजेच यशस्वी असणे हे समीकरण आजच्या जगात रुढ झाले आहे.
रिसॉर्ट सोडतांना रिसेप्शनपासून टॅक्सी पर्यंत माझी बॅग घ्यायला अजून एक तत्पर सेवक अदबीने आला. मला त्याचा कावा कळला. खोलीपासून तर रिसेप्शन पर्यंत मी ती बॅग आणली ते कुणालाच नाही दिसले पण टॅक्सीपर्यंत जातांना मला अनेकांनी पाहिले. त्यांची जणू शर्यतच लागली. त्यातल्या त्यात एका चपळ सेवकाने माझी बॅग घेतली आणि तब्बल १० मीटर दूर असलेल्या टॅक्सीमध्ये ठेवली. परत तिच आशाळभूत, अधाशी नजर डोळ्यात आणून तो माझ्याकडे अतिअदबीने, अतिनम्रतेने आणि कमालीच्या आदराने बघू लागला. मी भारावलो, एमटीडीसी चा माझ्याविषयीचा आदर बघून मी हरखलो आणि त्याच्या हातावर १० ची नोट टेकवली. तो कृतकृत्य झाला. पंढरपूरला विठोबारायाचे याचि देही याचि डोळा दर्शन झाल्यावर जे तृप्ततेचे भाव एखाद्या वारकऱ्याच्या चेहऱ्यावर येतात, तसले "धन्य जाहलो" छाप भाव त्या सेवाशील कर्मचाऱ्याच्या चेहऱ्यावर आले. माझ्या डोळ्याच्या कडा पाणावल्या आणि वियोगाचे दु:ख कसेबसे पचवत मी निघालो.
-- समीर