माझी शाळा

आंबेडकर चौकातून थोडं पुढे गेलं की खंडेलवालचं सुप्रसिद्ध दुकान लागतं, त्याच्या समोर 'प्रधान बिल्डिंग' मध्ये आमची शाळा भरायची. छोटीशीच टुमदार इमारत,मैदान किंवा पटांगण म्हणता सुद्धा येणार नाही असं छोटसं अंगण आणि ५,६ खोल्यांमध्ये भरणारे वर्ग असं अगदी घरेलू स्वरुप होतं.
माझं नाव शाळेत घालायला आई घेऊन गेली मला के.बी. जोशी सरांकडे. धारदार नाक, भेदक घारे डोळे, धोतर,कोट,टोपी असे त्यांच्या केबिन मधील खुर्चीत बसलेले सर मला पुण्याच्या आजोबांसारखेच वाटले.माझे ठाण्याचे आजोबा धोतर नव्हे तर 'पाटलोण'वाले होते.(हा त्यांचाच शब्द!)मी आपली त्यांच्याशी गप्पा मारायला लागले.(असं आई सांगते.)त्यांनी मला बिस्कीटांचा पुडा खाऊ म्हणून दिला आणि आमची शाळेत नावनोंदणी झाली. मुलांचे,पालकांचे इंटरव्ह्यू,डोनेशनं.देणग्या असलं काही नव्हतं.
मला वाटलं छान आहे की शाळा! आजोबा खाऊबिऊ देतात,गोष्टीही ऐकायला मिळतील बहुतेक‌. शाळेच्या पहिल्या दिवशी त्या छोट्याशा अंगणात हीऽऽ गर्दी... सगळी मुलं आपापल्या आईबाबांबरोबर आली होती आणि रडत होती.मला रडाबिडायला नाही आलं पण मी आपली आजोबांना शोधत होते.मग आईच म्हणाली," अग, ते आजोबा नाहीत.मोठे सर आहेत.ते इथे नसतात,मोठ्या शाळेत असतात"आणि तिने मला शीलाताईंच्या ताब्यात दिले.
खेळ,गाणी वगैरेतून हळूहळू आम्ही पाटीपेन्सिलीवर आलो. डबा,वॉटरबॅगेपुरतं दप्तर न राहता त्यात दगडी डब्बल पाटी,पेन्सिलीचे अख्खे रूळ,स्पंजाची इवलीशी डबी आली.(कित्येक वर्षात नाही पाहिल्या ह्या गोष्टी!हल्ली तर या गोष्टी हद्दपारच झाल्या आहेत की काय? असं वाटतं.)मग पुढे वह्यापुस्तकं आणि पेन्सिल आली.तिला शिसपेन म्हणायचो आणि टोक करण्यातच ती अर्धी व्हायची.त्या टरफलांची फूलं,चॉकलेटच्या चांद्या,मोरपिसं,बांगड्यांच्या काचा, रंगीत गोट्या असा खजिना हळूहळू जमा व्हायला लागला.मित्रमैत्रिणींशी ह्या गोष्टींची देवाण घेवाण व्हायला लागली.
प्रत्येक विषयाला वेगळे शिक्षक,वर्गशिक्षक वगैरे मोठ्या शाळेत म्हणजे ५वी पासून! गोखलेबाई मुख्याध्यापिका होत्या.त्यांना मोठ्या बाई म्हणायचे सगळे जण! खेळताना कोणी धडपडले की त्यांच्या खोलीत नेऊन कमळाबाई नाहीतर ताराबाई या शिपाईबाई ते लाल औषध लावायच्या.आठवलेबाई आम्हाला १ लीला शिकवायच्या‍‍. जसा उच्चार करतो तसं लिहायचं,उच्चार आत घेतला की ऱ्हस्व आणि लांबवला की दीर्घ असा सोपा नियम त्यांनी तेव्हा शिकवला होता.अक्षर 'सुवाच्य'च हवं यावर त्यांचा कटाक्ष! १लीतल्या मुलांकडून 'हस्तलिखित' तयार करून घेणाऱ्या त्या एकट्याच असाव्यात!२री आणि ३री मध्ये फडकेबाई होत्या. अतिशय स्पष्ट उच्चार, शुद्धलेखनाचा आग्रह आणि १ली वेलांटी,२ रा उकार ही भाषा बदलून ऱ्ह्स्व,दीर्घच कटाक्षाने वापरायला लावायच्या. गणितात पैकीच्या पैकी मार्क मिळाले(बाईंच्या बारीक नजरेतून चूक सुटणं अतिअवघड!)की बाई कौतुक म्हणून खाऊ द्यायच्या.४थीत मराठे बाई होत्या.आमच्या पुढे एक वर्ष असलेल्या अमिताला शिष्यवृत्ती मिळाली होती. शाळेत तिचा सत्कार झालाच पण बाईंनी तिला आमच्या वर्गात मुद्दाम बोलावून तिचे कौतुक केले होते,तिला डेअरीमिल्क चॉकलेट दिले होते.(असे चॉकलेट बाईंकडून मिळणे म्हणजे खूप कौतुकाची गोष्ट तिने केली आहे एवढेच कळले होते!)
मग आमचाही स्कॉलरशिपचा वर्ग सुरू झाला,तो सुद्धा बाईच घ्यायच्या पण आमच्या विद्वान ग्रुपमधल्या कोणालाच शिष्यवृत्ती मिळाली नाही! दिवसभराची परीक्षा,एकेक तासाचा पेपर आणि २ पेपरांच्या मधल्या वेळात आम्ही शिवाशिवी खेळत होतो आणि वॉटरबॅगेतून नेलेले रसना ऑरेंज पित होतो हे मात्र ठळकपणे आठवत आहे.
दरवर्षी एक दिवसाच्या सहली जायच्या, अगदी माँटेसरीतल्या मुलांची सुद्धा कुठेतरी जवळपास सहल नेत असत. ४ थीत आम्हाला एक माथेरान वर धडा होता.त्यातले वर्णन वाचून आम्ही बाईंकडे धोशा लावला,या वर्षी आपण माथेरानला जाऊ सहलीला. "अरे एक दिवस पुरणार नाही,२ तरी दिवस हवेत.तुम्ही रहाल कसे आईबाबांना सोडून?कसं जाता येईल आपल्याला?"त्यावर आम्ही एकटे राहू,पण तुम्ही आम्हाला तिकडेच न्या सहलीला अशी गळ घातली आणि बाई चक्क तयार झाल्या! ४ थीतली माकडं नेरळपर्यंत लोकल ट्रेनने आणि नंतर त्या सुंदर फुलराणीगाडीतून माथेरानला नेली बाईंनी.बरोबर आमच्या फडकेबाई आणि गोडसेबाई होत्या.ताराबाई आणि कमळाबाई या दोन शिपाईबाईसुद्धा होत्या,पण तरीही कसं काय सांभाळलं बाईंनी आम्हाला? त्याच जाणे!
४थी नंतर आमच्या वर्गातली काही मुलं दुसऱ्या शाळेत गेली,आमचा ग्रुपही फुटला आणि मोठ्या शाळेत 'आम्ही छोटे' रवाना झालो.त्या १२ वी पर्यंतच्या शाळेत आम्ही छोटेच होतो! आता नवे ऋणानुबंध जुळणार होते याची त्या वेळी मात्र आमच्या बालवयाला जाणिव नव्हती..