अवलंबित्वाचा शोध!

शैशवावस्थेत असतांना, मनुष्य जिवंत राहण्यासाठी, भरण-पोषणासाठी, आणि देहविधींसाठीही इतरांवर अवलंबून असतो. ह्या अवलंबित्वापासून, स्वावलंबन शिकत शिकत मनुष्य बाल्य, तारुण्य, प्रौढत्व आणि वृद्धत्वापर्यंत पूर्णपणे स्वावलंबी, स्वतंत्र जीवन जगण्यास सरावतो. मात्र वृद्धत्वासोबत पुन्हा एकदा, क्रमाक्रमाने प्राप्त होत जाणारे अवलंबित्व मनुष्याला मानसिकदृष्ट्या क्लेशकारक असते. एवढे की त्याऐवजी किंवा त्यापेक्षा तो मृत्यूस आनंददायी समजू लागतो. मात्र अवलंबित्वावर मात करणे प्रयत्नसाध्य असू शकते तर मृत्यू स्वीकारण्याची मानसिक तयारी होऊनही तो आपल्या हातात नसतो. म्हणून वृद्धावस्थेतील किंबहुना साऱ्या आयुष्यभरातीलच परावलंबित्व कमी राखण्यासाठी, सुसह्य राखण्यासाठी तरूणपणातच काही पथ्ये, काही सवयी जडवून घेतल्यास, तसे साधेल का? हा स्थूलमानाने ह्या लेखाचा विषयभाग आहे.

नव्याने नोकरीस लागलेला नव्या गावात जाऊन राहिलेला तरूण सुरूवातीस बऱ्यापैकी स्वावलंबी असतो. आपले कपडे स्वत: धुतो, इस्त्री करून आणतो, जेवणाची व्यवस्था स्वत: करतो, इतर बिले भरणे, खरेदी, जनरहाटी सगळे स्वत: सांभाळतो. तोच इसम लग्न होताच श्रमविभागणी करून पुष्कळशी कामे अंगाबाहेर टाकतो. कालांतराने तो त्या त्या कामाचेबाबतीत हळूहळू पण निश्चितस्वरूपाने परावलंबी होत जातो.

नोकरी-व्यवसायात ज्येष्ठता, अनुभव वाढत जातो तसातसा माणसाचा स्वत:ची वैयक्तिक कामे स्वत: करण्याकडील कल नाममात्रच काय तो उरतो. अती महत्त्वाची, अती उत्पादक कामे केवळ तोच करू शकत असल्याने, इतर वैयक्तिक कामे श्रमविभागणीच्या तत्त्वांनुसार इतरांकडे सुपूर्द केली जातात. कालवशात, अवकाशप्राप्त केल्यावर अशा अनैसर्गिक विभागणीची गरज राहत नाही पण प्रथा सुरूच राहते. परावलंबित्व दृढमूल होते.

देहधर्म, गृहकृत्य, उपजीविकाअर्जन, मनोरंजन, विचार आणि अनुभवांकन स्वत:चे स्वत: करायचे ठरविल्यास आपण नेहमी जी कामे सामान्यत: इतरांकरीता करीत असतो ती करणे आपल्याला शक्य तरी होईल का? सर्वसाधारणपणे नाही. मात्र वयपरत्वे अशा इतरांसाठी करावयाच्या कामापेक्षाही स्वावलंबनास अधिकाधिक महत्त्व प्राप्त होत जाते. वैयक्तिक कामांकरता इतरांच्या सेवा विकत घेण्याचे प्रमाण भारतीय समाजात जरा जास्तच आहे. ह्यामुळे परावलंबित्व वाढते. पाश्चात्य देशांमध्ये परिस्थिती जास्त चांगली असावी. म्हणून तरूण वयातच वैयक्तिक बाबतींमध्ये इतरांच्या सेवा विकत घेण्याचे प्रमाण कमीतकमी ठेवल्यास वयपरत्वे अडचणी निर्माण होणार नाहीत.

मुबलक वीज, पाणी, दूरसंचार, दूरश्रवण, दूरदर्शन आणि परिवहन सुविधा यांवरचे आपले अवलंबित्व आज घडीला अफाटच वाढले आहे. ह्या सुविधा उपलब्ध नसतांना आपल्याला कसे दिवस काढता येतील? तरीही काय काय आपण करू शकू? यांचा शोध घेण्यासाठी अशा परिस्थिती निर्माण करून त्यांमध्ये काही मर्यादित काळपर्यंत राहण्याचा प्रयासही प्रत्येकाने उदाहरणार्थ करायला हवा. पदभ्रमण सहलींमध्ये हे सारेच खूपशा प्रमाणात साधता येते.

व्यक्तिगत क्षमता/सामर्थ्ये आणि उपलब्ध सुविधा घटत जातील तसतसे आयुष्य विपन्नावस्थेकडे चालू लागते. वार्धक्याची ही वाटचाल सुसह्य व्हावी, समाधानी व्हावी आणि त्यादृष्टीने मानसिकता तयार व्हावी, ह्यासाठी अवलंबित्वाचा सतत शोध घेत राहायला हवा. तरच शेवटल्या श्वासापर्यंत सर्व शारीरिक क्षमतांसह समाधानाचे मार्गक्रमण शक्य होईलसे वाटते.

तुम्हाला ह्याबाबतीत काय वाटते? काय म्हणायचे आहे?