ब्र

कविता महाजनांनी लिहिलेले 'ब्र' हे पुस्तक नुकतेच वाचनात आले. एका सामान्य गृहिणीने नकोशा झालेल्या संसाराचे जोखड दूर करून पूर्णवेळ समाजसेवा करणारी कार्यकर्ती व्हायचे ठरवल्यावर तिला आलेले वेगवेगळे अनुभव, त्या अनुषंगाने तिची स्वत्व शोधायची धडपड, येणाऱ्या कडू-गोड अनुभवांवरून आपण जो काही नवीन मार्ग निवडला आहे तो कितपत योग्य आहे आहे असा पडणारा संभ्रम आणि या साऱ्याला समाजसेवी संस्थांच्या आदिवासी भागात चालणाऱ्या कामाची पार्श्वभूमी असे या पुस्तकाचे स्वरूप आहे.


तोकड्या अनुभवविश्वामुळे मराठीत कसदार साहित्य निर्माण होत नाही, ह्या आरोपाला/समजाला काही प्रमाणात का होईना, हे पुस्तक छेद देते. विभक्त झाल्यावर लेखिकेने स्वतः ठाणे येथील आदिवासी श्रमजीवी संघटनेत आणि टाटा समाजविज्ञान संस्थेच्या प्रकल्पात काही वर्षे काम केले. आदिवासी वस्त्यांत पायपीट करून, तेथे राहून आलेले अनुभव नोंदवले. त्यामुळे लेखनातला सच्चेपणा सहज जाणवतो. आपल्या शहरी खोलीत टेबलापाशी बसून या विषयावर लिहिलेली बरीच पुस्तके 'साच्याबाहेरील आयुष्याची साचेबंद कहाणी' या सदरात मोडतात. सुदैवाने तसे 'ब्र' बाबत होत नाही.


पुस्तकाची सुरुवात आश्वासक आहे. कथानायिका प्रफुल्ला लेखिकेप्रमाणेच फाईन आर्ट्स चे रीतसर शिक्षण घेतलेली, परंतु लग्नानंतर कॅनवासमधे रंग भरायला विसरून गेलेली आहे. पण निसर्गाची रुपे टिपताना नेहमीच्या घासून गुळगुळीत झालेल्या शब्दांपेक्षा एक निराळीच शब्दकळा वर्णनात दिसून येते. वेगळा रस्ता निवडल्यावर, पूर्वी सभोवती असणारे पण न जाणवलेले रंग/पर्याय खुणावू लागतात, त्याचेच हे प्रतीकात्मक वर्णन.



सकाळी दार उघडलं आणि खिळून राहिले.
उजळलेलं आकाश आणि डोंगरांची रांग. रात्री आले, तो वळणं घेत येणारा डांबरी रस्ता स्वच्छ दिसत होता. त्याच्या दोन्ही बाजूंनी डोंगरापर्यंत पोचलेली हिरवी झाडं. काही गुच्छागुच्छांनी उभी तर काही एकएकटी. मध्ये सगळीकडे पसरलेलं पिवळं गवत... गुडघाभर उंचीचं असणार. झुडपंही वाळून गेलेली. पण हिवाळ्याच्या गेल्या दोन महिन्यांत गवतात जो लालसरपणा दिसत होता, तो उन्हाळ्याच्या चाहुलीनं वितळला होता. मध्यंतरी एकदा असंच फिरतीवर असताना सलग काही दिवस हा व्हॅन गॉगच्या चित्रांमधला लालसर पिवळा रंग पाहून पाहून डोकं भणाणून गेलं होतं. डोळे दुखायचे. वाटायचं, महिनाभर या गवतासोबत राहण्याची वेळ आली, तर मी नक्की वेडी होणार. आता बदल होताहेत हे पाहून डोळे निवळले.
मधल्या पठारांवर लहान लहान वाड्या दिसत होत्या. मधून नदी वाहत असावी असा अंदाज येत होता, पण पाणी दिसत नव्हतं. बारीक धार असावी. कातकऱ्यांची काही सुटी सुटी घरं दिसत होती. दारू गाळण्यासाठी नदीकाठ सोयीचा. आणि महादेव कोळ्यांप्रमाणे येथील कातकऱ्यांकडे स्वतःचा काही जमीनजुमला नाही, असं महावीर सांगत होता रात्री. एका घरातून पहिला धुराचा लोट उठला. चूल पेटली असणार.
हळूहळू मला समोर कागद असल्याचा भास होऊ लागला.
बोटांमध्ये शिरशिरी उठली.
जलरंगांच्या छटा शुभ्र बशीमध्ये तयार होऊ लागल्या. रंगाचा एकेक पातळ हलका थर कागदावर उमटू लागला.
ही आकाशाच्या फिकट निळेपणापासून उजळ सुरुवात.
ढगांच्या पांढुरक्या तुकड्यांच्या जागी ब्रश अलगद उचलून कागद तसाच पांढरा सोडून द्यायला हवा.
मग डोंगरावरच्या मातकट लाटा.
यलो ऑकर, इंडियन रेड, सॅप ग्रीन, सेपिया... रंगांची नावंही आठवू लागली. किती वर्षांनी.
रस्ता ओलांडून रंग अलीकडे येतायेता मध्येच एका उंच पर्णहीन झाडावर तीन भलेमोठे तुरे होते... एखाद्या उत्सवाच्या सजवलेल्या काठ्या असाव्यात तसे फुलांनी माखलेले. फिकट जांभळी फुलं. पांढऱ्यासोबत थोडा जांभळा, थोडा लाल, मधूनच जाणवेल न जाणवेल अशी निळी छटा.
रंगांचे थर वळत वळत कागदाच्या खालच्या उजव्या टोकाकडे आले. थांबले.
समोर पायरीजवळच्या कुंडीत एक मोठं लालस पान दोन नव्या पानांना वाढू देण्यासाठी अंग मुडपून घेऊन बसलं होतं. नव्या कोवळ्या पानांचा पारदर्शकपणा अजून गेला नव्हता, त्यांतून प्रकाश पाझरत होता.
चहूबाजूंना पाहिलं. किती चित्रं! कधीच संपणार नाहीत कितीही जणांनी रंगवली तरी.
म्हटलं, आता दुसरा कागद घ्यावा...


यापुढे मग कथानायिकेला आदिवासी पाड्यांवर आलेले वेगवेगळे अनुभव, तथाकथित समाजसेवी संस्थांची प्रत्यक्ष कामाऐवजी अहवाल आणि सादरीकरणावर भर देऊन अधिकाधिक मदत पदरात पाडून घ्यायला चाललेली धडपड, वाडवडिलांची संस्कृती आणि नवीन यंत्रयुग यात नवीन आदिवासी पिढीची होणारी कुचंबणा असे वेगवेगळे टप्पे घेत पुस्तक पुढे सरकते.


तसं पाहिलं तर आदिवासी स्त्रियांची आणि शहरी स्त्रियांची दु:खं वेगळी, तणाव वेगळे. पण कुठेतरी दोघींचा सांधा जुळलेला आहे. शिकून-सवरून, कमावत्या होऊनही स्त्रियांच्या वाट्याला येणारे शोषण काय किंवा इतर समाज ज्यांना पायदळी तुडवतो त्या आदिवासी समाजाच्या स्त्रियांना घटनादुरुस्तीनंतर राजकीय अधिकार मिळूनही वाट्याला येणारी अवहेलना काय; दोन्ही गोष्टी म्हणजे प्रस्थापितांकडून होणाऱ्या अन्यायाचेच वेगवेगळे स्वरूप. अंगावर येणाऱ्या अलिप्ततेने लेखिका आपल्या जिवलग मैत्रिणीचा बळी घेणाऱ्या मुंबईतील त्या अपघाताचे वर्णन करते. [बहुधा कॉनरॅड रिक्टरच्या 'द ट्रीज' या कादंबरीचा येथे संदर्भ आहे. जी. एं. नी तिचा मराठीत 'रान' म्हणून अनुवाद केला आहे. कृपया जाणकारांनी अधिक प्रकाश टाकावा.]



"त्या जंगलात चोविसोतास रात्रीसारखा अंधार असतो. प्रचंड उंचीची झाडं प्रकाशाला प्रवेशबंदी करीत असतात. जेव्हा पानगळ असते, तेव्हाच सूर्यकिरण पाचोळ्यावरून पावलं टाकू शकतात. असंख्य प्रकारचे पशूपक्षी तिथं अर्थातच मुक्तपणे वावरत असतात. अशा या प्रचंड जंगलाला अचानक वणवा लागतो. आगीची धग लागताच प्राणी सैरभैर होतात.
शेकडो-हजारो खारींच्या झुंडी जीव वाचवण्यासाठी वणव्याच्या विरुद्ध दिशेनं धावू लागतात. इकडंतिकडं मागंपुढं न पाहता तोंडातून चित्कारही बाहेर पडू शकणार नाही अशा अफाट वेगानं त्या धावत सुटतात. एका झुंडीमागोमाग दुसरी झुंड... भयाच्या स्थितीत वेगाच्या नादात जंगल मागे पडून ओढा लागल्याचं त्यांच्या ध्यानातही येत नाही. झुंडीमागोमाग झुंडी त्या खळाळत वाहणाऱ्या पाण्यात कोसळतात.
काही वेळानंतर चपळ हालचालींच्या, लुकलुकत्या डोळ्यांच्या, झुबकेदार मोठ्या शेपट्यांच्या खारींची असंख्य इवली इवली प्रेतं त्या पाण्यावर तरंगत असतात."
पाच-सात वर्षांपूर्वी वाचलेल्या कॉनरॅड रिक्टरच्या एका कादंबरीतील हा प्रसंग पुन:पुन्हा मनावर आघात करीत आठवत राहिला.
पुन्हा तसंच डोळ्यांत पाणी उभं राहिलं.
प्रसंग तोच होता. तशीच पुनरावृत्ती होती. फरक एवढाच की, झाडांच्या जंगलाऐवजी इमारतींचं जंगल होतं. वाहनांचा गजबजाट होता. पाचोळ्यासारखी माणसं होती. त्यांना उद्दामपणे तुडवणारे असंख्य यांत्रिक राक्षसी पाय होते.
एक लेडीज स्पेशल लोकल होती. आगीची आशंका होती. धुराची खूण होती. मृत्यूची भीती होती. जीव वाचवण्याची नैसर्गिक ओढ होती. पाऊस होता. अंधार होता. मृत्यूचं आमंत्रण घेऊन समोरून येणाऱ्या दुसऱ्या लोकलचं भान नव्हतं. नंतर कोलाहल होता. भयाण विचित्र शांतता होती. प्रेतांचीही रांग होती. अस्फुट हुंदके होते. हंबरून रडणं होतं.
सगळं तेच तसंच पुनरावृत्त झालेलं होतं संदर्भ बदलून. खारीसारखी चपळाई देहात मुरवलेल्या या तमाम नोकरदार बायका, जिवंत डोळ्यांच्या, झुबकेदार कर्तृत्वाच्या... भयानं त्यांना मृत्यूच्या हवाली केलं होतं...


पुढे मात्र स्त्रियांच्या नागरी-ग्रामीण समस्यांचे हे समांतर चित्रण मागे पडून  स्थानिक स्वराज्य संस्थांत स्त्रियांसाठी राखीव ३३% जागांमुळे प्रस्थापित राजकारण्यांची झालेली तगमग; स्त्री सरपंच हे आपल्या हातातले कळसूत्री बाहुले म्हणून रहावे म्हणून त्यांनी अवलंबलेले मार्ग आणि या साऱ्यांना ज्या स्त्रिया पुरून उरल्या त्यांचे वेगवेगळे अनुभव हा वर्णनाचा मुख्य भाग बनतो. नवऱ्याला किंवा सासूला फूस लावून घरातूनच स्त्री सरपंचाचे खच्चीकरण करणे, नियमांची व हक्कांची अपुरी माहिती देणे, स्वातंत्र्यदिनी झेंडावंदन करायला अटकाव करणे इत्यादी अनेक गोष्टी मग वेगवेगळ्या स्त्रियांच्या अनुभवकथनातून पुढे येतात. त्यातच मग समाजसेवी संस्थांत झालेली कार्यकर्ता आणि व्यवस्थापक अशी दुफळी, आदिवासी - शहरी/स्थानिक - बाहेरचे असा कार्यकर्त्यांतच होणारा संघर्ष, पती-पत्नी संबंधांना आलेले व्यावसायिक स्वरूप असे निरनिराळे भाग या अनुभवांच्या कोलाजाचा एक भाग बनतात.


अशीच एक वेगळी हकीकत --



हिराबाईला पहिलाच मुलगा झाला आणि त्याच्या अंगावर पांढरे डाग असल्याचं लक्षात आलं. पाड्यापाड्यावर चर्चा सुरू झाली. शेवटी भगताला बोलावलं. भगतानं सुपात तांदूळ पाहून सांगितलं की पोरगा बरंभ्याचा [भुताचा] आहे.

हिराबाईनं मुकाट्यानं प्रायश्चित्त घ्यायचं मान्य केलं. पंचांना दारू न् कोंबडीचं जेवण यासाठी सांगितलेले पैसे दिले. गावाबाहेर सात भोंगे -- म्हणजे वाळलेल्या गवताच्या लहान झोपड्या एका रांगेत तयार करण्यात आल्या. त्या एकदम पेटवल्या आणि त्या पेटलेल्या साती झोपड्यांतून आरपार धावत हिराबाई पलीकडे गेली. अंग भाजलं, पण जातीबाहेर काढलं जाण्याची नामुष्की टळली.
हा अनुभव हिराबाई कधीच विसरू शकणार नव्हती. पण वाईट घटनाही चांगले धडे शिकवून जातात अनेकदा, तसं तिच्याबाबतीत झालं.
निवडणुकीच्या वेळी तिनं थेट भगतालाच हाताशी धरलं.
त्याच्या अंगात देव संचारले... आणि देवानं सांगितलं, गावात फार व्याटव्याट कामं होत आहेत. कणसरी कोपणार आहे. यंदा पिकं बरी नाही यायची. सगल्यांच्या कणग्या रिकाम्या दिसतील.
लोक घाबरले. शरण गेले. मग देवानं सांगितलं की, आपल्या गुन्ह्याचं प्रायश्चित्त घेतलेल्या एका बाईला खुर्चीवं बसवा.
आणि गावात अशी एकच बाई होती -- हिराबाई!
बाकीच्या लोकांनी मानलं नाही, तरी एकूणएका वारल्याची मतं डोळे झाकून हिराबाईलाच पडली.
त्यानंतर पहिली घरकुल योजना आली, त्यातलं पहिलं घर भगताला मिळालं.
"गावात कोनाला म्हाईत नाही आजूक. पण मनात आणलं ना, तं भुताचेच क्याला, आपलेपण हात लांब होऊ शकतात... आणि सगल्या बाया एकदुसरीचं हात धरून राहिल्या तं कामं चांगली होणारच." हिराबाई गालातल्या गालात हसत म्हणाली. 


येथे एक प्रकर्षाने जाणवणारा दोष म्हणजे, पुस्तकाला आलेले एखाद्या अहवालाचे (रिपोर्ताजचे) स्वरूप  आणि काही ठिकाणी जाणवणारी पुनरुक्ती. अर्थात, गोदावरी परुळेकरांच्या 'जेव्हा माणूस जागा होतो' नंतर स्वानुभवावर आधारित मराठीतले हे (बहुधा) पहिलेच पुस्तक असल्याने, असे होणे काहीसे क्षम्य मानता येईल. असो.


वेगळी वाट सुद्धा मग काही वेळाने रुळलेली वाट बनत जाते. बंडखोरांचे सुद्धा त्यांच्या नकळत प्रस्थापितांत रुपांतर होत असतेच. पुस्तकाच्या शेवटी, अशा या 'द वन लेस ट्रॅव्हल्ड बाय' रस्त्यावरदेखील जुन्याच खाचखळग्यांची प्रचीती येऊ लागल्यावर, प्रफुल्ला येथेही आपला वेगळा मार्ग चोखाळण्याचा निर्णय घेते.


काहीसा त्रोटक आणि अपेक्षित शेवट असला, तरी ही वेगळ्या वाटेवरची कादंबरी नक्कीच वाचनीय आहे. 


[हाच लेख येथेही वाचता येईल.]