फ्लाईंग टू यु.एस.....

U.S.A. युनायटेड स्टेटस ऑफ अमेरिका. सर्वसाधारण प्रत्येक माणसाच्या मनांत ज्या देशाबद्दल उत्सुकता असते तोच हा देश. एकदा तरी अमेरिकेला जायला मिळावं ही प्रत्येक भारतीयाची सुप्त इच्छा असते. मी ही त्याला अपवाद नव्हते. माझा नवरा जगदीश याला कामाच्या निमित्ताने बोस्ट्नला जावे लागणार होते. हे सगळे अचानकच ठरले. त्याचा विसा तयार असल्यामुळे तो मार्च मध्ये अमेरिकेला आला. त्याचे कंपनी मधील सहकारी तिथे आधीपासून होते त्यामुळे त्याची राहण्याची सोय लगेचच झाली. आणि तो लगेचच बोस्टन मध्ये स्थिरस्थावर झाला.


पण आता वेळ होती माझी आणि माझ्या सव्वा दोन वर्षाच्या मुलाची. जगदीशच्या ऑफिसमधून आमच्या विसाचे कागदपत्र अमेरिकन कौन्सिलेट मध्ये पाठवले. आणि मला मुलाखतीसाठी १८ एप्रिल ला सकाळी ९.३० वाजता.. ही वेळ मिळाली. तोपर्यंत मी माझी खरेदी आणि इतर तयारी सुरू केली. मुंबईत सकाळी अमेरिकन कौन्सिलेट मध्ये मी सकाळी ९.३० वाजता पोहोचले. माझा लहानगा थोडा आजारी होता.. थोडा किरकिरत होता. तिथे कौन्सिलेट मध्ये लहान मुले बरोबर असणाऱ्यांना प्राधान्य दिलं जातं ही गोष्ट माझ्या पथ्यावर पडली आणि कोणतेही अडथळे न येता माझी मुलाखत पार पडली. दुसरे दिवशी विसा स्टँपिंग होऊन आमचे पासपोर्ट सुद्धा हातात मिळाले.


माझा परदेशीचा हा पहिलाच विमान प्रवास होता. आंतर देशीय विमान प्रवास खूप केले होते पण हा परदेशीचा आणि तो ही २२ तासांचा प्रवास ..... त्यामुळे कोणीतरी मला सोबत मिळते का ते मी पाहत होते. अमेरिकन कौन्सिलेट मध्ये एक काका-काकू भेटले ते ही बोस्टनला जाणार होते. मी त्यांचा फोन नंबर घेतला. ते काका-काकू ज्या विमानाने जाणार होते त्याच विमानाचं तिकिट बुक करायला मी माझ्या एजंटला सांगितलं. ते विमान २५ एप्रिल ला मध्य रात्री २.५० म्हणजे २६ च्या पहाटे.... असं होतं. मला तिकिट बुक झाल्याचं त्या एजंटनं सांगितलं आणि मग माझी खरी धावपळ सुरू झाली. माझे सासू-सासरे, आई-बाबा आणि घरातले इतर माझ्यासाठी धडपडत पुण्याला आले. मी बाहेरची कामे सांभाळत आणि उरकत होते आणि घरातले सगळे माझी बॅग भरत होते.. माझी आणि मुख्य म्हणजे माझ्या मुलाची. त्याचे कपडे, त्याची औषधे आणि त्याला लागणाऱ्या इतर वस्तू. अशी सगळी तयारी पूर्ण झाली आणि मी २५ तारखेला सकाळी तिकिट घेण्यासाठी त्या एजंटच्या कार्यालयात गेले. तर तिथं समजलं की त्या माझ्या तिकिटावर २६ एप्रिल ऐवजी २६ मे ची तारीख पडली होती.......... झालं !!!!!! माझं धाबं दणाणलं.... काय करावं सुचेना.. तयारी तर पूर्ण झाली होती. कामवाल्यांचे पगार, सगळी बिलं, असं सगळं उरकून मी निघाले होते. इतकंच काय पण पुण्याहून मुंबईला विमान तळावर जाण्यासाठी खाजगी गाडीही सांगून ठेवली होती. पण आता काय? ....


 माझं नशीब जोरावर होतं म्हणून  की काय मला त्याच दिवशीचे पण दुपारी १२ वाजताचे ब्रिटिश एअरवेज चे तिकिट मिळाले. पण मला आता सोबत कोणी नव्हतं. एकटीनेच सगळं सांभाळावं लागणार होतं. २५ तारखेची रात्र ही माझ्यासाठी खूप महत्त्वाची होती. माझे आई-बाबा, सासरे आणि सगळेचजण मला वेगवेगळ्या सूचना करत होते. शेवटी मला खूप दडपण आलं आणि मग रडू यायला लागलं. तेव्हा माझ्या सासूबाईंनी मला, 'तू नक्की व्यवस्थित जाशील, तुझ्यात तेवढे धाडस नक्की आहे, माझी खात्री आहे' असा मला धीर दिला, आणि मग खूप बरं वाटलं. पहाटे पुण्याहून सहारा विमानतळावर नेण्यासाठी तीच गाडी सांगितली, सगळी तयारी करून आम्ही सगळे झोपलो.


दुसऱ्या दिवशी पहाटे निघालो. ही वेळ अतिशय महत्त्वाची होती. सगळ्यांचा निरोप घेताना डोळ्याची धार थांबत नव्हती. शेवटी आम्ही विमानतळावर जाण्यासाठी निघालो.


विमानतळावर माझे बाबा आणि भाऊ बोस्ट्नला जाणारं कोणी भेटतंय का ते पाहत होते. शेवटी एक गृहस्थ त्यांच्या ५ वर्षांच्या मुलाला घेऊन चालले होते हे समजलं. बाबांनी माझी त्यांच्याशी ओळख करून दिली. विमानात नाही पण connecting flight (मराठी शब्द ??) घेताना मला त्यांचा उपयोग झाला. पण एकटीने प्रवास करण्याची माझीही पूर्ण तयारी झाली होती.


विमानतळावर सगळे check in चे सगळे सोपस्कार आटोपून पुन्हा एकदा भरपूर रडून सगळ्यांचा निरोप घेतला आणि मग मी imigration च्या खिडकी पाशी आले. तिथून आत प्रतीक्षालयात जाऊन बसले. तिथंही मला बोस्टनला जाणारे एक काका-काकू भेटले.... पण आता माझी मानसिक तयारी झाली होती.... एकटीनेच जाण्याची.


flight announcement  झाली आणि मी विमानाच्या दिशेने खोट्या का होईना पण आत्मविश्वासाने निघाले. एकेक पाऊल टाकत लाल रंगाच्या वेलड्रेस्ड हवाई सुंदरींकडून स्वागत (??) करून घेऊन आत विमानात जाऊन स्वतःच्या आसनावर जाऊन बसले.


मनात प्रचंड खळबळ सुरु झाली. आता काही क्षणांत मी माझा देश.... माझा भारत देश.... माझी जन्मभूमी... .. माझी मायभूमी सोडणार होते. किमान एक वर्ष तरी मी परत येणार नव्हते. मला माझं कोल्हापुरंच घर .. जिथं मी लहानाची मोठी झाले.. बागडले.. नाचले.... घरातल्या कुत्र्या-मांजरांसोबत खेळले...... ते माझं माहेर, माझं सांगलीचं घर जिथं मला... सामावून घेणारी माणसं होती.... ज्या घरची मी लक्ष्मी आहे... जिथं माझ्या प्रत्येक गोष्टीचं अतोनात कौतुक झालं... ते माझं सासर... आणि.......... आणि ज्या घरी मी संसाराची स्वप्नं खरी होताना पाहिली... ज्या घराला मी सजवलं..... ज्या घरानं आजपर्यंत मला एखाद्या लहान मुली सारखं सावरलं.... ज्या घरानं माझ्या मुलाला पहिली पाउलं टाकताना गोंजारलं.... ज्या घरात गेली पाच वर्षं मी सतत काहीतरी करत होते.........ते माझं पुण्यातलं घर.. सगळं आठवायला लागलं मला. आत माझ्या घरावरून कोणाचा हात फिरेल.... कोण आवरेल सगळं.....???? माझ्या त्या घराला मी पोरकं करून निघाले होते. मनातली ही खळबळ न कळत डोळ्यातून अश्रू बनून गालावर ओघळली. माझा छोटा मात्र त्याची दुपारची झोपायची वेळ झाल्यामुळे निवांत माझ्या मांडीवर झोपला होता. त्याला काय कळणार होतं.. भारत-अमेरिका? मनांत विचारांचं काहूर माजलं की अथर्वशीर्ष म्हणावं असं माझी आई नेहमी म्हणते. मी अथर्वशीर्ष म्हणायला सुरुवात केली. विमानाने run way घेतला........ थोडा वेग जास्ती.... आणखी जास्ती..... खूप जास्ती..... आणि मग........ बस्स!!!! take off.................. माझा माझ्या मातीशी संबंध तुटला..... आणि अखेर मी यू. एस. कडे प्रस्थान केलं.


ठराविक उंचीवर विमान गेल्यावर flight stuards  ची ये-जा सुरू झाली. ज्यूस, पाणी, बियर, कोल्डड्रिंक्स..... जे हवं ते देण्यास सुरुवात झाली. समोर स्क्रीनवर आपण जमिनीपासून किती उंचीवर आहोत आणि भारतापासून किती लांब आलो आहोत तसंच लंडन ला पोहोचायला किती वेळ लागणार आहे हे सगळं दिसत होतं. विमानात २ भारतीय हवाईसुंदरीही होत्या.... मला थोडं बरं वाटलं. दुपारच्या जेवणात 'इंडियन फूड' आणि 'पास्ता" असे २ प्रकार होते. जेवण जरा कमीच जेवावं अशा प्रकारचं होतं... पण काही इलाज नव्हता. भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ६ वाजता नाश्ता आला. आणि त्यानंतर १ तासाने लंडन आलं... इथं माझा पहिला थांबा (हॉल्ट) होता.


ब्रिटनच्या त्या भूमीवर पाऊल ठेवताना मनात काही फार उत्साह नव्हता. कदाचित शाळेत असताना इतिहासात ब्रिटिश राजवटीबद्दल जे काही वाचले त्यामुळेही असेल. connecting flight ला जाण्यासाठी हिथ्रो विमानतळावर व्यवस्थित सूचना, बाण आणि फलक असल्यामुळे अडचण आली नाही. माझ्या बाबांनी ओळख करून दिलेल्या त्या प्रकाश नावाच्या गृहस्थाची मला फार मदत झाली. माझ्या छोट्याने 'मी अजिबात चाल चाल करणार नाही' असा निषेधात्मक पावित्रा घेतला.... मग काय मी बिचारी ती हॅन्डबॅग आणि कडेवर माझं दुसरं पार्सल (मुलगा) अशी कसरत करत निघाले... पण त्या प्रकाशनी माझी बॅग घेतली आणि मग मी माझ्या मुलाला कडेवर घेऊन भराभर चालत निघाले. कारण मध्ये वेळ फक्त १ तास च होता. कुठेही न थांबता आम्ही सरळ विमानातच जाऊन पोहोचलो. परत एकदा त्या लाल पोशाखातल्या हवाईसुंदरींकडून स्वागत करवून घेऊन , मी आणि प्रकाश दोघेही आपापल्या आसनावर जाऊन बसलो. आज प्रकाश कुठे आहेत मला माहीत नाही पण मी जन्मभर त्यांची आभारी राहीन.


आता मात्र मी खूप शांत होते. मनात कुठल्याही प्रकारचं वादळ नव्हतं की विचारांचं काहूर माजलं नव्हतं. आता फक्त जगदीशला भेटण्याची आस लागली होती. एकेक तास पुढे सरकत अमेरिकन वेळेप्रमाणे रात्री ९.४५ ला बोस्टनला पोहोचले. जगदीश मला न्यायला विमानतळावर येणार होता. Imigration करून बॅगेज ताब्यात घेऊन बाहेर आले. जगदीशला बघून माझा छोटा एकदम खूश झाला. टॅक्सी करून आम्ही घरी आलो. हो घरी..... आता काही दिवसांसाठी का होईना पण आता हे माझं घरंच आहेना???...............


  


प्राजु.