शनिवार दिनांक ३ मार्चला होळी पौर्णिमा येत आहे हे आधीच हेरून ठेवले होते. त्यात त्या रात्री खग्रास चंद्रग्रहण आहे हे समजताच तर कुठेतरी भटकंतीला जायचे हे नक्कीच केले. या वेळेला होळी, चंद्रग्रहण पहाणे असा एकूण बेत ऐकून बायकोने येण्यात रस दाखवला होता, पण दोनएक तास चढायचे आहे हे ऐकल्यावर मोहिमेस ताबडतोब दुरूनच शुभेच्छा जाहीर केल्या.
ठरल्याप्रमाणे संध्याकाळी सव्वासहा वाजता पुण्याहून आम्ही सहा जण मनोजची मारुती ओम्नी घेउन निघालो. आगामी कार्यक्रम मध्ये जाहिरात देण्याचा फायदा म्हणजे ते वाचून केशवसुमार या शीघ्रविडंबनकारांनी संपर्क साधला आणि तेही सामील झाले. कूल आणि आरती होतेच, शिवाय आजवर तब्बल १८० किल्ले पालथे घातल्यामुळे सकाळच्या एका पुरवणीद्वारे प्रकाशात आलेली किर्तीही होती.
रायगड जिल्हायतल्या सुधागड तालुक्याचे नाव ज्यावरून ठेवले आहे असा हा सुधागड पाली पासून बारा किमी अंतरावर आहे. पुणे, लोणावळा, खोपोली असा प्रवास करत रात्री पावणेनऊला पालीला पोहोचलो, खोपोली पाली हा पस्तीस किमीचा प्रवास जरा कंटाळवाणा होतो. तरी आता रस्ता बऱ्याच चांगल्या स्थितीत होता. चांदण्यान न्हायलेला सरसगड डोळे भरून पहातच पालीत प्रवेश केला. आजपर्यंतच्या गिरिभ्रमणात झालेल्या एकमेव अपघाताच्या आठवणी जाग्या झाल्या. पालीच्या गणपतीचे दर्शन घेउन पुढे निघालो
पालीहून एक रस्ता विळेकडे जातो. त्याच रस्त्यावर सहा सात किमीनंतरच एक फाटा डावीकडे जंगलात शिरतो. पाच्छापूरकडे. पाच्छापूर हे सुधागडाच्या पायथ्याचे गाव. तसा धोंडसे गावाहूनही एक सोपा पण लांबचा रस्ता सुधागडाला जातो. पाच्छापूरजवळ येताच सुढागडाचा आवाढव्य पहाड नजरेत भरतो. पूर्वी पातशहापूर असे नावा असावे असे वाचले होते. संभाजीराहे आणि औरंगजेबाचा मुलगा अकबर याची याच गावी भेट झाली होती. पाच्छापूरला मोठी होळी पेटली होती, तिथून तसेच पुढे जात ठाकूरवाडीला शाळेजवळ थांबलो. रात्रीचे दहा वाजले होते पण लख्ख चंद्रप्रकाशात कबड्डीचे सामने अगदी रंगात आले होते.
गडाला अगदी खेटूनच सह्यादृची मुख्य रांग आडवी पसरलेली दिसत होती. दोन वाटाडे बरोबर घेउन गडाची वाटचाल सुरू केली. गड चांगलाच उंच आहे, खड्या चढणीचे बरेच टप्पे आहेत. वर सापांचा सुळसुळाट आहे आसे ऐकले होते त्यामुळे प्रत्येकाकडे एक विजेरी असावी असा आग्रह धरला होता, पण चंद्राच्या अक्षरशः फ्लडलाईटसारख्या प्रकाशामुळे गरजच भासली नाही. पुण्याला पौर्णिमा कधी आली आणि गेली हेही कळत नाही. एक दोन टप्पे चढुन एका कातळाच्या पायथ्याशी आलो, तिथे वर जायला शिडी लावली होती. नवी शिडी चांगलीच भक्कम आहे, पण जुनी शिडी आणि खोदलेल्या पायऱ्या याही अवश्य जाण्यासारख्या आहेत.
अजून एकदोन टप्पे पार केले, आणि गिरीभ्रमणात पडलेला खंड आणि वाढलेले वजन चांगलेच जाणवू लागले. दोन चांगलेच मोठे विश्रांतीचे थांबे घेउन, पाच्छापूर दरवाजाला पोहोचलो. वाट अगदी सुस्पष्ट आणि न चुकण्यासारखी होती, वाटाडे उगाच आणले असे वाटत होते. पण अजून बरेच चालायचे होते असे नंतर लक्षात आले. पाच्छापूर दरवाजावर उभे राहून खाली कोकणात बघू लागलो. खालच्या अंधारात दूरवर पाड्यापाड्यांवर धडधडुन पेटलेल्या होळ्या इवल्याशा ज्योतींएवढ्या दिसत होत्या, ती ठाकरांची, ही मराठ्यांची.. आमच्या बरोबरचा बारक्या माहिती पुरवत होता.
सुधागडाच विस्तार प्रचंड आहे, अजून अर्धा तास चढुन गेल्यावर एक विस्तीर्ण माळ दिसला, आम्हाला पंतसचिवांचा वाडा गाठायचा होता, तो पार माळ ओलांडुन पलिकडे दाट झाडीत होता. गडावर आल्यावर नक्कीच वाटाड्याची गरज भासली असती. वरचेवर डागडूजी झाल्यामुळे वाडा सुस्थितीत आहे. आमच्या आधीच पालीचे काही ग्रामस्थ देवीच्या दर्शनासाठी येउन मुक्कामी थांबलेले होते, पण एक मोकळी भिंत आम्हाला 'ऍलॉट' करण्यात आली.
रात्र दीड वाजेपर्यंत जेवणे आटोपली आणि मग बाहेर एक फेरफटका मारून तीनचा गजर लावून दोनच्या सुमारास झोपलो. तीन वाजता मी आणि कूल दुर्बीण घेउन माळावर येउन बसलो. ग्रहणस्पर्श झाला होता, थोड्याच वेळात मनोजही त्याच्या स्टँडसह कॅमेरा घेउन दाखल झाला, आणि मग किर्तीही आली. पुढे दीड एक तास तो सगळा ग्रहणाचा सोहळा बघण्यात कसे गेले ते कळलेच नाही, मध्येच कधीतरी आडवे झालो आणि जशी जशी पृथ्वीची सावली चंद्राला ग्रासू लागली तसे तसे लक्षावधी ताऱ्यांनी उजळून निघणारे आकाश एकटक बघत राहिलो. अशा वेळेला आकाशदर्शनातले काही कळणाऱ्या एखाद्या सहकाऱ्याची उणीव फार जाणवते. मला साधारण कुठलेही सात तारे सप्तर्षीसारखे दिसतात. ग्रहणात चंद्र पूर्ण गुडूप झालाच नाही काळसर तांबूस रंगात दिसत राहिला. ग्रहणाचा प्राणीसृष्टिवर काय परिणाम होतो का हे बघायचे होते, पण तसे काहीच आढळले नाही. गडावरच्या गाईही शांतपणे रवंथ करत आमच्या बाजूलाच उभ्या होत्या.
सकाळी केशवाने गडबड करत उठवले. त्याने भाविकांशी संधान बांधुन सगळ्यांसाठी चहाची व्यवस्था केली होती आणि आम्हाला पोहे करण्यासाठी एक पातेलेही मिळवले होते. सुधागडावर सरपण अगदी विपुल आहे. बाहेरच चूल मांडली आणि केशवानेच गरम गरम कांदेपोहे तयार केले. ते फस्त करून गड बघायला बाहेर पडलो. सुधागड अगदी प्राचीन गडापैकी एक आहे, भृगू ऋषींच्या वास्तव्याने पुनीत झालेला अशी त्याची ख्याती, जवळपास अनेक लेणीही आहेत. राजधानी म्हणून सुधागडचाही विचार राजांनी केला होता असे इतिहास सांगतो.