सध्या शरद पवारांनी काँग्रेसमध्ये परत यावे म्हणून काँग्रेसवाल्यांचे प्रयत्न चालू आहेत. किंबहुना हे अटळ आहे अशी हवा काँग्रेसतर्फे निर्माण केली जात आहे. मनमोहनसिंग पंतप्रधान झाल्यावर 'पवारांचे बंड फसले', 'पवार काँग्रेसमध्ये राहते तर मनमोहनसिंग यांच्या ऐवजी ते पंतप्रधान झाले असते' अशी धूळफेक काँग्रेसतर्फे केली जात होती व पवारांच्या काही हितचिंतकांनाही तसेच वाटत होते. पण पवारांनी बंड केले नसते तर गेल्या सार्वत्रिक निवडणुकींत काँग्रेसचे संख्याबळ कितीतरी वाढले असते, काँग्रेसश्रेष्ठींची पक्षांतर्गत हुकूमशाही वाढली असती, सोनियाजीच पंतप्रधानपदी बसवल्या गेल्या असत्या आणि नंतर आवश्यक ती घटना-दुरुस्ती करण्यांत आली असती. पवारांच्या बंडामुळे काँग्रेसला या योजनेचा फेरविचार करावा लागला. त्याची परिणति सोनियाजींच्या, घटनेंतील तरतुदींमुळे अपरिहार्य असलेल्या, 'पदत्यागांत' व मनमोहनसिंग पंतप्रधान होण्यांत झाली. मनमोहनसिंगांना पंतप्रधानकी मिळण्याचे श्रेय 'आत्मघातकी' बंड करणाऱ्या पवारांना आहे.