समजा एखाद्या पक्षाने गुरुद्वारा, चर्च यासारख्या लोकप्रिय गोष्टींवर लक्ष केंद्रित न करता खालीलप्रमाणे जाहीरनामा काढला तर तो पक्ष निवडून येईल काय?
१. एका विशिष्ट कालमर्यादेत लोकसंख्या आटोक्यात आणण्यासाठी निश्चित उपायांची अंमलबजावणी. खेडोपाडी जाऊन लोकांना संततिनियमनाचे उपाय, फायदे याविषयी माहिती देणे.
२. एच. आय. व्ही. विषाणू कसा पसरतो, त्याला प्रतिबंध कसा करता येतो याविषयी जनजागृती, विशेषतः: शहरांमधील वेश्यावस्तींमध्ये.
३. एका विशिष्ट कालमर्यादेत देशात १०० % साक्षरता आणण्यासाठी उपाययोजना.
४. एका विशिष्ट कालमर्यादेत भारतातील सर्व गावांमध्ये पिण्याचे पाणी, वीजपुरवठा, शहरांना जोडणारे पक्के रस्ते, दूरध्वनी, वाचनालये, आंतरजाल यासारख्या सोयी आणण्यासाठी उपाययोजना.
५. विनासरकारी संस्थांना जी अनुदाने मिळतात त्यांची तपासणी करून बाबा आमटे, डॉ. बंग यांच्यासारख्या उपक्रमांना अनुदान, सवलती देणे.
६. देशात नित्यनेमाने येणारे पूर, दुष्काळ याबाबत सकारात्मक दृष्टिकोनातून उपायांची अंमलबजावणी. उदा. दरवर्षी पावसाळ्यात मुंबईची होणारी अवस्था टाळण्यासाठी काय करता येईल?
७. देशातील शिक्षणपद्धतीचा फेरविचार. शाळेतील मुलांना विषयात गोडी वाटण्याच्या दृष्टीने उपाय. विद्यार्थ्यांना वेगळ्या वाटेने जाण्यासाठी विशेष सवलती, अनुदाने.
८. देशातील उर्जासमस्येवर उपाय. सौरऊर्जा, अणुशक्ती यासारखे उर्जास्त्रोत कसे वापरता येतील?
९. भ्रष्टाचार निर्मूलनाच्या दृष्टीने कडक उपायांची अंमलबजावणी.
१०. देशातील जंगलांचा सफाया थांबवणे, शहरांमधील प्रदूषण आटोक्यात आणणे. संरक्षित प्राणी खरोखरच संरक्षित राहायला हवेत.
हा एका एक-सदस्य समितीच्या १५ मिनिटांच्या मीटिंगचा निष्कर्ष आहे. अजून बरीच कलमे राहिली आहेत. आठवल्यास सांगावीत.
हॅम्लेट