बिहारींसंदर्भात मनोहर जोशी ह्यांचे राज्यसभेत समर्थन

ही बातमी लोकसत्तेत येऊन बरेच दिवस झाले. मात्र लोकसत्तेतील लेख येथे लिहिण्यासाठी कोठे सुविधा आहे का ते पाहण्यात वेळ गेला. शेवटी ती सर्व बातमी येथे उतरवून घ्यावी असे वाटले.

लोकसत्तेतील मूळ बातमी : बिहारींसंदर्भात सरांनी केले राजच्या भूमिकेचे समर्थन
नवी दिल्ली, १३ मार्च/खास प्रतिनिधी

मुंबईत आल्यावर बिहारींनी बिहारींप्रमाणे वागू नये, असा सल्ला शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी आज राज्यसभेत रेल्वे अर्थसंकल्पावरील चर्चेत भाग घेताना बिहारी बांधवांना दिला. त्यांच्या या विधानामुळे राज्यसभेत चांगलाच गदारोळ उडाला.

मुंबईत बिहारींना घाबरविले जात असल्याचे लालूप्रसाद यादव यांनी म्हटले पण तशी मुळीच स्थिती नाही. तसे प्रकार मुंबईत होत नाहीत. पण बिहारी नागरिकांनी मुंबईत आल्यावर बिहारींप्रमाणे वागू नये. केवळ बिहारीच नव्हे तर कोणत्याही परप्रांतीय व्यक्तीने महाराष्ट्रीयन म्हणून राहावे आणि मराठी भाषा व संस्कॄतीशी समरस व्हावे. मराठी माणूसही राज्याबाहेर पडला तर त्याने त्यात्या राज्यातील संस्कॄतीशी अनुरुप वागायला हवे, असे जोशी म्हणाले. त्यावर सभागॄहात गदारोळ झाला. सदस्य उठून त्यांच्या विधानावर आक्षेप घेऊ लागले. त्यावर उठून लालूप्रसाद यादव म्हणाले, आपण बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका सांगितली ते ठीक आहे. पण त्यांचे पुतणे जे बोलत आहेत ती मात्र चुकीची गोष्ट आहे. त्यावरून पुन्हा आरोपप्रत्यारोप झाले. या गदारोळात जोशी यांनी आपले भाषण पुढे सुरु ठेवले. मुंबईत काही वर्षांपूर्वी रेल्वेत खलाशींची भरती करताना सर्व दीडशे बिहारी उमेदवारांची भरती करण्यात आली. हे कितपत योग्य होते? असा सवाल त्यांनी लालूंना केला. शिवसेनेच्या आंदोलनामुळे ही भरती रोखली गेली. अशा स्थितीत मराठी लोकांना राग आला तर त्यात चूक काय आहे, असा प्रश्न त्यांनी केला.


इतरप्रांतियांनी मराठी भाषा आणि संस्कृतीशी समरस व्हावे हे म्हणणे तुम्हाला पटते का?

मनोहर जोशी ह्यांनी राज ठाकरे ह्यांचे समर्थन का केले असावे असे तुम्हाला वाटते?

अवांतर : लोकसत्तेचा फाँट बदलण्यासाठी कोठे सुविधा आहे का?